सुब्रतो रॉय बेसहारा

0
176

ऍम्बी व्हॅलीचा लिलाव होणार
सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्ट अधिकार्‍यांना आदेश
नवी दिल्ली, १७ एप्रिल 
पाच हजार कोटी रुपये जमा करण्यास सहारा उद्योग समूहाला अपयश आल्याने संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी पुण्याजवळील लोणावळा येथे असलेल्या सहाराच्या ऍम्बी व्हॅलीची सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची संपत्ती विक्रीला काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार्‍यांना दिला. सोबतच, सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी २८ एप्रिल रोजी स्वत: न्यायालयात हजर व्हावे, असा आदेशही दिला.
आता बस्स झाले. आज काही तरी एक सांगायचे आणि दुसर्‍या दिवशी वेगळेच काही बोलायचे, हे आम्ही मान्य करणार नाही, अशा कठोर शब्दात न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने सहारा समूहावर संताप व्यक्त केला.
सुब्रतो रॉय यांना स्पष्ट इशारा देताना न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, तुम्ही न्यायालयाच्या आदेशाशी खेळत आहात. आमचा आदेश अंमलात न आणल्यास तुम्ही स्वत:च कायद्याच्या कचाट्यात अडकाल आणि त्याचा त्रास तुम्हालाच होईल.
याचवेळी न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयातील अधिकार्‍यांना असाही आदेश दिला की, सहारा समूहाची पुण्याच्या ऍम्बी व्हॅलीतील सुमारे ३४ हजार कोटी रुपये किमतीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात यावा आणि त्याबाबतचा अहवाल आमच्याकडे सादर करावा. या संपत्तीचा संपूर्ण तपशील सहारा समूह आणि सेबीने पुढील ४८ तासांत उच्च न्यायालयातील अधिकार्‍यांना उपलब्ध करून द्यावा.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी २१ मार्च रोजीच्या सुनावणीत सहाराला ५,०९२.६० कोटी आज १७ एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम जमा न झाल्यास ऍम्बी व्हॅलीतील ३४ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. याच सुनावणीत न्यायालयाने सहाराला अशा सर्व मालमत्तांची माहिती द्यायला सांगितली होती, ज्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. जेणेकरून या संपत्तीच्या लिलावाद्वारे गुंतवणूकदारांच्या ठेवी त्यांना परत मिळवून देण्यासाठी रक्कम जमा करण्यास मदत होईल. यासाठी सहाराला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती.