लोकप्रियता हे पैशांचे नव्हे, गुणांचे गुपित!

0
95

अग्रलेख
स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रियतेचे गमक आत्मसात करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटली नाही. ‘काम हीच पूजा’ या मंत्राच्या जपसामर्थ्याने त्यांनी भारतातीलच नव्हे, तर जगातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेे आणि त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आता तोच मंत्र, पण वेगळ्या पद्धतीने आळवत योगी आदित्यनाथ यांचीही अल्पावधीत लोकांच्या गळ्यातील ताईत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
••
लोकप्रियता कशाने मिळते? ती कशी मिळवायची? लोकप्रियता मिळवण्याचे काही गणित आहे का? असल्यास ते कसे आत्मसात करायचे? हे सारे प्रश्‍न प्रत्येक राजकारणी व्यक्तीला भविष्यात कधी ना कधी पडतातच. जिंकून येण्याचे जसे काही तंत्र असते तसेच ते लोकप्रियता मिळविण्याचेदेखील असते. जिंकून येण्यासाठी जसे हातखंडे वापरले जातात तसेच काहीसे प्रकार नेतेमंडळी लोकप्रियता मिळविण्यासाठी करतात. पण, तरीदेखील प्रत्येकाला लोकप्रियता मिळतेच असे नाही. पैसे वाटून, साड्या वाटून, कूकर वाटून, जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन, स्वस्त धान्य देण्याची आश्‍वासने देऊन आणि मोफत वीज, पाणी देण्याची घोषणा करूनही उमेदवार आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रियतेसाठी कुठल्याही थराला गेलात तरी ती मिळतेच असे नाही, त्यासाठी मुळात शब्दाला जागणारी माणसं हवी असतात. प्रामाणिकतेचा गंध, मातीशी जुळण्याचे गणित असते, लोक जोडण्यासाठी बेरीज गरजेची असते आणि अवगुणांची वजाबाकी करण्याची आवश्यकता असते, सद्गुणांचा गुणाकार आणि संतापाचा भागाकारदेखील करावा लागतो. असेच सारे गुण योगी आदित्यनाथ यांच्यात लोकांना आढळले आणि भाजपाने त्यांच्या नावाला पसंती दिली! त्यासाठी योगींनी कुठल्या एजन्सीला पैसे दिले नाहीत, की त्यांनी स्वतःची लोकप्रियता ‘मॅनेज’ करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले नाहीत. पण, असे सारे न करताही त्यांनी जी लोकप्रियता अल्पावधीत अर्जित केली, त्यास तोड नाही. अशी लोकप्रियता मिळवण्यासाठी मुळातच चांगला माणूस होण्याची गरज असते. ते मनुष्यत्व योगींमध्ये साधनेतूनच आले आहे, ते त्यांना कुणाकडून ओढून-ताणून आणावे लागले नाही. पण, लोकप्रियतेवर स्वार होण्यासाठी अखिलेश यादव यांना, मोफत वाटलेल्या लॅपटॉपवर स्वतःची छायाचित्रे छापून घेण्याची हौस भागवावी लागली. राज्यातील जनतेला केंद्रीय योजनेतून सब्‌सिडाईज्ड एलईडी बल्ब वितरण करण्याची वेळ आली, तेव्हा त्यावर अखिलेशची छायाचित्रे प्रिंट करण्याचा हट्‌ट पुत्रप्रेमापोटी आंधळ्या झालेल्या मुलायमसिंहांनी धरल्याने, उत्तप्रदेशातील जनतेला कमी किमतीतील एलईडी बल्बपासून तब्बल अडीच वर्षे मुकावे लागले. शाळांची दप्तरेदेखील अखिलेशच्या छायाचित्रांपासून सुटली नाहीत! दफ्तरांवर महापुरुषांची छायाचित्रे मुद्रित करण्याऐवजी मुलांना, दफ्तर उघडले की अखिलेशची मोठ्या नाकाने कांदे सोलणारी छायाचित्रे दिसायची! असो. पण, तरीदेखील लोकांनी अखिलेशला जमिनीवर लोळविले आणि लोकप्रियतेच्या गणिताचे त्याला रामगोपाल यादव यांनी शिकविलेले सूत्र अपयशी ठरले. सतीश मिश्रा यांनीदेखील मायवतींना लोकप्रियतेसाठी सोशल इंजिनीअरिंगचा फंडा दिला. त्याने थोडेबहुत काम केले. पण, या सूत्रातून उत्तरप्रदेशात जागोजागी जेव्हा हत्तीचे पीक उगवायला सुरुवात झाली, तेव्हा जनतेची तळपायाची आग मस्तकात गेली आणि पुढच्याच निवडणुकीत इंजिनीअरिंगचे सोशॅलिझम् करून जनतेने मतांचे समसमान वाटप करीत मायावतींच्या बसपाला धूळ चारली. लोकप्रियतेसाठी इंदिरा गांधींनीदेखील काही कमी करामती केल्या नाहीत. त्यांच्या काळात भारत जगाच्या खिजगणतीतही नव्हता. विकासाचे वारे शहरांमध्येच नव्हते तर ग्रामीण भागात कसे वाहणार? त्या वेळी इंदिराजी जेव्हा खेडोपाडी जात तेव्हा त्या प्रदेशातील, त्या लोकांच्या पारंपरिक वेशभूषेत अवतरत आणि त्यांची लोकनृत्ये करून, त्यांच्या पंरपरांनुरूप रूढिपालन करून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत. त्यांना लोकप्रियतेचे गणित चांगलेच गवसले. म्हणूनच त्यांनी या देशावर बराच काळ राज्य करण्याचा विक्रम केला. इंदिरा गांधींनाही लोकप्रियता विकत घ्यावी लागली नाही. पण, नंतरच्या काळात कॉंग्रेस पक्षानेच ‘इंदिरा इज इंडिया’चा अतिरेक केल्याने त्यांच्या लोकप्रियतेत घट आली. शदर पवारांनी लोकप्रियतेसाठी मराठा कार्डाचा आधार घेतला आणि केंद्रीय राजकारणात त्यांनी उंच छलांग मारली. पण, त्यांनाही विसर पडला की, जातीचे सूत्र हे काही काळापुरते किंवा विशिष्ट अंतरापुरते कामात येते. वरच्या पातळीवर जातीचा मुद्दा हळूहळू गौण ठरायला हवा आणि सर्वसमावेशकतेची बीजं विस्तृत व्हायला हवीत, हे गणिताचे सूत्र त्यांना शेवटपर्यंत न सापडल्याने, देशाचा पंतप्रधान होण्याच्या लायकीचा हा नेता संरक्षणमंत्रिपदापर्यंतच पोहोचू शकला आणि नंतरच्या काळात त्यांची अधोगतीच झाली. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर लोकप्रियतेचे शिखर पादाक्रांत करण्यासाठी नक्षलवाद्यांची आणि घुसखोरांची मदत मिळवण्यातही मागेपुढे पाहिले नाही! त्यांना गणिताच्या या सूत्राने सत्तासुंदरीची फळे चाखायला मिळाली. पण, आता लोकप्रियतेची घसरण सुरू झाली आहे. कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या लोकप्रियतेसाठी अनेक हातखंडे वापरले. पांढर्‍या स्वच्छ झब्बा-पायजाम्याने ते स्वतःचे ब्रँडिंग करू इच्छित होते, भाषणाचे विशिष्ट तारसप्तकातील सूर त्यांनी आळवून पाहिले, मनभिन्नता असलेल्या राजकीय पक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न केले. पण हाय रे देवा! त्याला जनेतेने साथच दिली नाही. मनसेचे नेते राज ठाकरे यांनाही लोकप्रियता मिळाली, पण त्याचे त्यांना मतांमध्ये परिवर्तन करता आले नाही. त्यांच्या सभेला लाखांची गर्दी झाली, पण मते मात्र ओंजळभरच! त्यामुळे त्यांचे ‘इंजीन’ लोकप्रियतेची इलेक्ट्रिक देऊनही काळा धूरच सोडत राहिले. स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रियतेचे गमक आत्मसात करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटली नाही. ‘काम हीच पूजा’ या मंत्राच्या जपसामर्थ्याने त्यांनी भारतातीलच नव्हे, तर जगातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेे आणि त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आता तोच मंत्र, पण वेगळ्या पद्धतीने आळवत योगी आदित्यनाथ यांचीही अल्पावधीत लोकांच्या गळ्यातील ताईत होण्याच्या दिशने वाटचाल सुरू आहे. सत्तेवर येताच त्यांनी लावलेला निर्णयांचा सपाटा आणि त्याला मिळणारा जनतेचा पाठिंबा बघता, भविष्यात त्यांची प्रतिमा अधिक उजळल्याशिवाय राहायची नाही. ‘नर सेवा, नारायण सेवा’ या मंत्राचे जपसामर्थ्यच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवल्याशिवाय राहायचे नाही. सत्तेवर येताच त्यांनी पहिल्याच दिवशी सडकछाप मजनूंना धडा शिकविण्यासाठी रोडरोमिओविरोधी पथक स्थापन केले. व्हीव्हीआयपी संस्कृतीचा त्याग, पान मसाला, गुटखा व तंबाखू यांसारखे पदार्थ खाण्यावर बंदी, कार्यालयात वेळेत येणे, अवैध कत्तलखान्यांविरोधात उचललेली धडक पावले, यांसारख्या त्यांच्या लोकोपयोगी निर्णयांनीच जनतेला ते भावले असून, त्यांची पसंतीच लोकप्रियतेसाठी त्यांना पावली आहे.