सुप्रीम कोर्टाने दिला श्रीनिवासन् यांना दणका

0
94

अमिताभ चौधरी, राहुल जौहरी आयसीसीच्या बैठकीला जाणार
नवी दिल्ली, १७ एप्रिल 
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना मोठा झटका दिला आहे. श्रीनिवासन पुढील आठवड्यात होणार्‍या आयसीसीच्या बैठकीत बोर्डाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. कारण ते आधीच बोर्डाच्या हिताच्या संघर्षात दोषी आढळलेले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना २४ एप्रिल रोजी होणार्‍या आयसीसीच्या बैठकीत बोर्डाचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी दिली. चौधरीसोबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी बैठकीत जातील, असाही आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
न्या. दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर व न्या. धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने म्हटले की, वास्तविक श्रीनिवासन हे सुप्रीम कोर्टातील एका प्रकरणात आधीच दोषी आढळले आहे. त्यामुळे त्यांना आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे असे आदेश देण्यात येते की, आयसीसीच्या बैठकीत अमिताभ चौधरी हे बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील व त्यांच्यासोबत सीईओ जौहरीसुद्धा बैठकीत सहभागी होतील.
एक व्यक्ती, जे बीसीसीआय व राज्य क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी होण्यास अपात्र आहे, त्यांची आयसीसीच्या बैठकीत सहभागासाठी शिफारस केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने १० एप्रिलच्या सुनावणीत स्पष्ट केले होते. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या वकिलाने एक प्रश्‍नाच्या स्पष्टीकरणासाठी दाखल
केलेल्या अंतरिम अर्जावर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती. (वृत्तसंस्था)