कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्लीवर रोमांचक विजय

0
100

मुंबई इंडियन्स सोबत कोलकाता संयुक्त आघाडीवर
नवी दिल्ली, १७ एप्रिल 
अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या आयपीएल सामन्यात मनीष पांडे (नाबाद ६९) व युसुफ पठाणची (५९) शानदार अर्धशतकी खेळी आणि त्यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या अठराव्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ४ गड्यांनी विजय नोंदविला. कोलकाता संघाचा पाच सामन्यातील हा चौथा विजय असून, गुणतालिकेत ८ गुणांसह मुंबई इंडियन्ससोबत संयुक्तपणे आघाडीवर आहे.
फिरोजशाह कोटला मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सने मर्यादित २० षटकांत कोलकाता संघासमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार गौतम गंभीरच्या केकेआरने १९.५ षटकांत ६ गडी गमावीत हे लक्ष्य गाठले.
कोलकाता नाईट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज मनीष पांडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने ४९ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६९ धावांची विजयी खेळी केली. त्याला युसुफ पठाणची चांगली साथ लाभली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. केकेआरला विजयासाठी अंतिम षटकात ९ धावांची गरज होती. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने अमित मिश्राकडे चेंडू सोपविला. मिश्राच्या पहिल्या चेंडवर ख्रिस वोक्स धाव काढू शकला नाही. दुसर्‍या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टिचित झाला. त्यानंतर सुनील नारायण आला. त्याने मिश्राच्या तिसर्‍या चेंडूवर एक धाव घेत मनीष पांडेला स्ट्राईक दिला. मनीषने चौथ्या चेंडूवर षटकार हाणला. आता केकेआरला विजयासाठी २ चेंडूत २ धावा काढायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर मनीष पांडेने २ धावा घेत आपल्या संघाला ४ गड्यांनी विजय मिळवून दिला. घ(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स ः २० षटकांत ७ बाद १६८ (संजू सॅमसन ३९, सॅम बिलिंग २१, करूण नायर २१, श्रेयस अय्यर २६, रिषभ पंत ३८, मॉरीस १६, कमिन्स नाबाद ३, मोहम्मद शमी नाबाद शून्य, नॅथन कटलर निले ३-२२, वोक्स, उमेश यादव, सुनील नारायण प्रत्येकी १ बळी).
कोलकाता नाईट रायडर्स १९.५ षटकांत ६ बाद १६९ (गौतम गंभीर १४, मनीष पांडे नाबाद ६९, युसुफ पठाण ५९, सुनील नारायण नाबाद १, झहीर खान, कमिन्स प्रत्येकी २ बळी, मॉरीस व अमित मिश्रा प्रत्येकी १ बळी).