१ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून महाभारत

मोहनलाल भीमाच्या भूमिकेत, दिग्दर्शक बी.आर. शेट्टी

0
135

नवी दिल्ली, १८ एप्रिल
महाभारत हे भारतातील असे महाकाव्य आहे, जे मोठ्या पडद्यावर आणण्याची इच्छा आजवर अनेकांनी व्यक्त केली. बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांची सुद्धा महाभारत चित्रपटाच्या रूपात साकार करण्यात रुची दाखविली आहे. तथापि, हे स्पप्न साकार करून दाखविले दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल याने. लोकप्रियतेचा उच्चांक गाठणार्‍या या अभिनेत्याने फेसबूकवर एक पोस्ट टाकून १ हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित असलेल्या महाभारत चित्रपटात माझाही खारीचा वाटा राहणार आहे, असे स्पष्ट केले आहे. मोहनलाल यात पाच पांडवांमधील मधला भाऊ ‘भीम’ याची भूमिका साकारेल.
आजवर मनोरंजन वाहिन्यांवर महाभारताशी संबंधित ज्या मालिका दाखविल्या गेल्या त्यात कौरव- पांडवांमधील युद्धावरच भर दिला गेला आहे. तथापि, १००० कोटींच्या भांडवलातून निर्माण होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भिमाच्या नजरेतून (दृष्टिकोनातून) बघावा लागणार आहे.
‘महाभारत’ हा चित्रपट तयार होणार हे आता निश्‍चित झाले असून, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी संयुक्त अरब अमिरातमधील अरबपती बी. आर. शेट्टी १००० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरुवात होणार असून, २०२० च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. दोन भागांत बनणार्‍या या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आल्यानंतर ९० दिवसांनी दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध निर्माते वी. ए. श्रीकुमार मेनन करणार आहेत.
चित्रपटाचे निर्माता बी. आर. शेट्टी म्हणाले की, इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये हा चित्रपट बनविला जाईल. ऍकॅडमी पुरस्कार विजेत्यांसह काही नामांकित कलाकारांचा या चित्रपटात समावेश करण्यात येणार आहे. भारतीय कलाकारांसह हॉलिवूडमधील काही चेहरेदेखील यात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. सोमवारी १ हजार कोटींची गुंतवणूक करून महाभारात साकारण्याची घोषणा करणारे, मुळचे भारतीय उद्योजक बी.आर. शेट्टी एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांचा व्यवसाय ३० देशांमध्ये विखुरलेला आहे.
शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासारख्या कलाकारांनी देखील महाभारतावर चित्रपट साकारण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. शाहरुखने तर पैसा असता तर महाभारतावरील चित्रपटाचे काम हाती घेता आले असते, असे म्हंटलेले आहे. पण या दोघांनाही ते काम जमले नाही.
१००० कोटींच्या भांडवलातून साकारला जाणारा हा चित्रपट बजेटचा विचार करता आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा चित्रपट ठरणार आहे. बजेटमध्ये हा चित्रपट रजनीकांतचा ‘२.०’ आणि एस. एस. राजमौली यांच्या बाहुबलीला देखील पछाडून टाकेल. मोहनलालने फेसबूकवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये म्हंटले आहे की, मी किती वेळा महाभारत वाचले याची मलादेखील कल्पना नाही. पण मी नेहेमीच यावरील चित्रपट मोठ्या पडद्यावर आणू इच्छित होतो. आणि आज त्यांची ही इच्छा बी. आर. शेट्टी यांच्या गुंतवणुकीमुळे सत्यात उतरणार आहे.