होरपळणार्‍या जिवांना ओलसर दिलासा पाऊस यंदा चांगला नांदणार म्हणतात…

0
131

– हवामान खात्याचा अंदाज जाहीर
– •अल् निनोचा विशेष प्रभाव नाही
नवी दिल्ली, १८ एप्रिल
एप्रिल महिन्यातच उष्णतेचा कहर सुरू असताना, भारतीय हवामान खात्याने आज मंगळवारी देशवासीयांना सुखावणारी बातमी दिली आहे. यावर्षी देशभरात मान्सूनचा समाधानकारक पाऊस पडेल. चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस ९६ टक्के इतकी सरासरी गाठेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
कृषी हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. यावर्षी देशाच्या सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे, असे हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
यावर्षीही अल् निनो हा घटक सक्रिय राहणार असला, तरी त्याचा मान्सूनच्या प्रवासावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. अल् निनोच्या प्रभावाला तटस्थ ठेवणारी ‘इंडियन ओसेन डायपोल ही विशेष प्रणाली सक्रिय असल्याने अल् निनो आता आपला प्रभाव पाडू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी भारतीय हवामान खात्याने सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. पण, देशभरात ९७ टक्के पाऊस झाला होता. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती.
विशेष म्हणजे, हवामानाचा अंदाज वर्तविणार्‍या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी यावेळी अल् निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे. शिवाय स्कायमेट या खाजगी संस्थेनेही अल् निनोमुळे सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
स्कायमेटच्या मते, कमी पाऊस
स्कायमेटने अलीकडेच यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात ९५ टक्के इतका पाऊस पडेल, असे स्कायमेटचे मत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती सामान्य असेल. देशात जूनमध्ये सर्वाधित १०२ टक्के पाऊस पडेल, तर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा ९६ टक्के पाऊस पडण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)