अटकेनंतर तीन तासात मल्ल्याची जामिनावर सुटका

भारताकडे सोपविण्याचा प्रश्‍न अनुत्तरीतच

0
147
London: Industrialist Vijay Mallya leaves Westminster Magistrate's Court in London after getting bail on Tuesday. He was arrested earlier on Tuesday by Scotland Yard on an extradition warrant. PTI Photo (STORY FGN20) (PTI4_18_2017_000110B)

लंडन, १८ एप्रिल
भारतातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेले मद्यसम्राट विजय मल्ल्याला स्कॉटलॅण्ड पोलिसांनी आज मंगळवारी एका नाट्यमय घडामोडीत अटक केली. तथापि, काही तासांतच न्यायालयाने त्याला जामीनही मंजूर केला. यामुळे मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करण्याचा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे.
विजय मल्ल्याला आज सकाळी सेंट्रल लंडन येथील पोलिस ठाण्यात हजर झाले होते. यानंतर त्याला लगेच अटक करण्यात आली. तीन ते चार तास कोठडीत ठेवण्यानंतर त्याला वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्याच्यासोबत यावेळी वकिलांचा फौजफाटा होता. त्यांनी मल्ल्याच्या मुक्ततेची औपचारिकता तातडीने पूर्ण केली.
विजय मल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गेल्या ९ फेबु्रवारी रोजी ब्रिटिश सरकारकडे औपचारिक प्रस्ताव पाठविला होता. मल्याविरोधात भारतात खटला चालविण्यासाठी त्याला भारताकडे सोपविण्यात यावे, असे या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान, स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांनी सांगितले की, आज आम्ही एका भारतीय व्यावसायिकाला अटक केली. भारताने ज्या फरार व्यावसायिकाच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारला विनंती केली आहे, ती हीच व्यक्ती आहे. त्याचे नाव विजय मल्ल्या असे आहे. भारत सरकारच्या विनंतीनुसारच आम्ही ही कारवाई केली आहे.
बँकांचे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळ काढणारे विजय मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने बरेच त्यांचा पासपोर्ट रद्द केला होता. याच काळात मुंबईतील विशेष न्यायालयाने मल्ल्यांना फरार आरोपी म्हणून घोषित केले होते.
भारत दबाव आणणार
विजय मल्ल्याने भारतातील कायदे मोडले आणि लंडनमध्ये आश्रय घेतला. आम्ही त्याला असे सहजासहजी सोडणार नाही. त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी सीबीआय आणि ब्रिटनमधील उच्चायोग तेथील न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
भारतात गुन्हा केल्यानंतर कोणत्याही आरोपीने सीमा पार केल्यानंतर तो सुरक्षित होतो, हा समजच आता आम्ही दूर करणार आहोत. मल्ल्याला कोणत्याही स्थितीत भारतात आणले जाईल आणि यासाठी केंद्र सरकार सर्वच पर्यायांची चाचपणी करणार असल्याचे अधिकारी म्हणाला.
मल्ल्याला आणणे कठीण : उज्ज्वल निकम
विजय मल्ल्याला आरोपी प्रत्यार्पण कायद्यानुसार भारतात आणणे खूपच कठीण आहे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. तेथील न्यायालयात आपल्या तपास यंत्रणेचे पुरावे टिकाव धरू शकत नाही. या देशातील आरोपी प्रत्यार्पण कायदा किचकट आहे. गुलशन कुमार हत्याकांडात नदीम सैफबाबत मी चांगला अनुभव घेतला आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार गुन्हा होत असला तरी तो ब्रिटिश कायद्यानुसार गुन्हा ठरतोच, असे नाही, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय मीडियाचा उतावीळपणा : मल्ल्या
जामिनावर सुटका होताच मल्ल्याला जणू बळच मिळाले. माझ्या अटकेनंतर आता मला भारताच्या स्वाधीन करण्यात येईल, असे वृत्त भारतातील प्रसारमाध्यमांनी लगेच प्रकाशित केले. त्यांचा हा उतावीळपणाच आहे, असे ट्विट मल्ल्याने केले.