जवाहिर्‍याला दोन वर्षे सक्तमजुरी

0
58

स्विस बँकेतील गुप्त खात्याची माहिती लपविली
डेेहराडून, १८ एप्रिल 
येथील एका प्रसिद्ध जवाहिर्‍याला स्विस बँकेतील गुप्त खात्याची माहिती न दिल्यामुळे दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्विस बँकेतील खात्याची माहिती आयकर खात्यापासून लपवून ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. डेहराडूनमधील प्रसिद्ध पंजाब ज्वेलर्स या पेढीचे मालक राजू वर्मा यांना या प्रकरणी सक्तमजुरीबरोबरच २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
१४ मार्च २०१२ मध्ये राजू वर्मा यांचे स्विस बँकेत गुप्त खाते असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. स्विस बँकेतील त्या खात्यात तब्बल ९२ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. ही माहिती त्यांनी आपल्या आयकर विवरणात नमूद केली नव्हती.
यामुळे त्यांच्यावर आयकर कायद्याच्या कलम २७६ सी (१) आणि कलम २७७ नुसार खटला दाखल करण्यात आला. त्यामध्ये राजू वर्मा हे दोषी असल्याचे सिद्ध झाले. ही कलमे करचोरी आणि चुकीचे आयकर विवरण दाखल करणे यासाठीची आहेत.
आयकर खात्याने दाखल केलेल्या या खटल्यात वर्मा दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर, त्यांना दोन वर्षांची सक्तमजुरी आणि २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे.
या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदतही देण्यात आली आहे. तोपर्यंत त्यांना तुरुंगात जावे लागणार नाही. या प्रकरणी वर्मा यांच्यासह १६ जणांवर दोषारोप सिद्ध झाले असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
२०१२ मध्ये एका निनावी पत्राद्वारे राजू वर्मा यांची स्विस बँकेत खाते असून त्यांनी ही माहिती आयकर खात्यापासून लपवून ठेवली असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरू केली.  (वृत्तसंस्था)