धर्माधारित आरक्षण देशहिताच्या विरोधात

0
88

तेलंगणा सरकावर टीका
भोपाळ, १८ एप्रिल 
धर्मावर आधारित आरक्षण भारतीय राज्यघटनेला अनुसरून नाही, तसेच अशा प्रकारचे आरक्षण देशहिताच्या विरोधात आहे, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे विशद केली आहे.
मुस्लिम धर्मातील मागासवर्गीय जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणात वाढ करण्याचे विधेयक तेलंगणा विधानसभेत नुकतेच मंजूर करण्यात आले. या आरक्षणाला प्रदेश भाजपाने सडकून विरोध केला असतानाच, नायडू यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना आपले मत मांडले. भारतीय न्यायव्यवस्थेनेही धर्मावर आधारित आरक्षणाचे प्रयत्न हाणून पाडले असल्याचे नायडू यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेचे निर्माते देखील अशा प्रकारच्या आरक्षणाविरोधात होते. त्यामुळेच त्यांनी घटनेत अशी कोणतीही तरतूद केली नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. अशा आरक्षणावर भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. अशा आरक्षणाला आमचा विरोध आहे. तथापि, आम्ही आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. मग ते हिंदू असो किंवा अन्य कोणत्याही धर्माचे, त्यांच्या प्रगतीसाठी आरक्षण देण्याकरिता भाजपा वचनबद्ध आहे, असे नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)