दोन दिवसांत संपत्तीचा तपशील सादर करा

0
88

योगी आदित्यनाथ यांचा मंत्र्यांना अल्टिमेटम
लखनौ, १८ एप्रिल 
आदेश दिल्यानंतर बहुतांश मंत्र्यांनी आपल्या संपत्ती व दायित्वाचा तपशील सादर न केल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतप्त झाले आहेत. ज्या मंत्र्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील दिला नाही, त्यांनी दोन दिवसांत तो सादर करावा, असा अल्टिमेटमच आदित्यनाथ यांनी आज मंगळवारी दिला.
आदित्यनाथ यांनी तपशील जाहीर करण्यात अपयशी ठरलेल्या सर्व मंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. मी तुम्हाला हा अंतिम इशारा देत आहोत. यानंतर कोणतीही मुदत मिळणार नाही, केवळ कारवाईच होईल, असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर केवळ १३ मंत्र्यांनी आपल्या संपत्तीची विस्तृत माहिती सादर केली आहे. इतर मंत्र्यांनी मात्र अद्याप कोणतीही माहिती दिलेली नसल्याबद्दल आदित्यनाथ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भेटवस्तूंवरही मर्यादा
एकीकडे मंत्र्यांना संपत्तीचा तपशील सादर करण्यासाठी अल्टिमेटम देतानाच, आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना आणखी एक कडक संदेश दिला आहे.
कोणत्याही मंत्र्याने पाच हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या भेटवस्तू स्वीकारू नये, अशी ताकीद त्यांनी दिली. सोबतच, सभा व समारंभापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. मंत्र्यांनी शासकीय दौर्‍याच्या काळात आपल्या घरी किंवा विश्रामगृहात थांबावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)