ऑस्ट्रेलियाने केला वर्क व्हिसा रद्द

0
330

हजारो भारतीयांना बसणार फटका
मेलबर्न, १८ एप्रिल 
भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करीत असलेला वर्क व्हिसा ऑस्ट्रेलियाने आज मंगळवारी अचानक रद्द केला. यामुळे भारतीयांसह अनेक देशांतील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
सुमारे ९५ हजार विदेशी नागरिक या व्हिसाचा नियमितपणे वापर करीत असतात. यात भारतीयांचा समावेश जास्त आहे. ऑस्ट्रेलियातील वाढत्या बेरोजगारीवर उपाय करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या ऐवजी नवा नियम लागू केला आहे. या नियमामुळे इंग्रजी भाषेवर प्रभूत्त्व असणार्‍या आणि कुशल कामगारांनाच ऑस्ट्रेलियात रोजगाराची संधी मिळू शकणार आहे.
ऑस्ट्रेलियन कामगारांची संख्या कमी असलेल्या कौशल्यावर आधारित क्षेत्रांमध्ये चार वर्षाच्या कालावधीसाठी विदेशी नागरिकांना रोजगार देण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ‘४५७ व्हिसा’ हा कार्यक्रम अंमलात आणला होता. भारतीय नागरिकांनंतर ब्रिटन आणि चीनमधील नागरिक या व्हिसाचा वापर करीत होते. गेल्या वर्षी ३० सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियात ९५,७५७ विदेशी कामगार हंगामी तत्त्वावर येथे आले होते. यात भारतीय कामगारांचे प्रमाण सर्वाधिक होते.
ऑस्ट्रेलिया हा निर्वासितांचा देश आहे. पण ऑस्ट्रेलियात नोकर्‍यांमध्ये स्थानिक तरुणांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे. ज्या व्हिसाच्या आधारावर विदेशातून नागरिक आमच्याकडे येत आहेत, तो बंद करण्याचा निर्णय आम्हाला नाईलाजाने घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी व्यक्त केली. ‘ऑस्ट्रेलियन फर्स्ट’ असा नाराही त्यांनी यावेळी दिला.  (वृत्तसंस्था)