व्हिक्टोरिया सेतुबलकडून भारताचा २-१ ने पराभव

0
89

नवी दिल्ली, १८ एप्रिल 
युरोप दौर्‍यावर गेलेल्या भारतीय अंडर-१७ विश्‍वचषक फुटबॉल संघाचा पहिल्या सराव सामन्यात पोर्तुगालच्या व्हिक्टोरिया डी सेतुबल संघाकडून १-२ अशा गोलफरकाने पराभव झाला.
भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळावा, या उद्देशाने आयोजित या युरोप दौर्‍यात मंगळवारी लिस्बन येथील जोस मॉरिन्हो ट्रेनिंग सेंटर येथे सराव सामना आयोजित करण्यात आला. भारतीय युवा खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज दिली. त्यांनी गोल नोंदविण्याच्या अनेक संधीही निर्माण केल्या, परंतु त्या गोलमध्ये परावर्तित करण्यात अपयश आले. ३८ व्या मिनिटाला ब्रुनो व्हेंच्यूराने पेनॉल्टी कीकवर गोल नोंदवून मध्यांतरापर्यंत व्हिक्टोरिया संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यांतरानंतर अनिकेत जाधवने ४७ व्या मिनिटाला जोरकसपणे फटका मारला, परंतु बारला लागून परतला. नंतर पुन्हा एका मिनिटाने चेंडूवर ताबा घेत त्याने ६७ व्या मिनिटाला पुन्हा फटका मारला आणि भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. भारताने आघाडी मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न केला, परंतु गोल नोंदविण्यास यश मिळत नव्हते. ८५ व्या मिनिटाला व्हिक्टोरिया सेतुबलने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताचा अंडर-१७ फुटबॉल संघ आता पुढील सामना २५ एप्रिल रोजी पोर्तुगालच्या जामोर येथे बेलेनेन्सेसविरुद्ध खेळणार आहे. (वृत्तसंस्था)