दिल्लीसमोर हैदराबादचे आव्हान

0
126

आजचा सामना
सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेेव्हिल्स
हैदराबाद येथे, रात्री ८ वा.
हैदराबाद, १८ एप्रिल 
पंजाबविरुद्ध डेव्हिड वॉर्नर शानदार फॉर्ममध्ये दिसला, परंतु आता त्यांच्यासमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान राहणार आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ प्रत्येक सामन्यात पूर्ण ताकदीनिशी खेळला, परंतु विजय त्यांच्या पदरी पडला नाही. किंग्ज इलेव्हनवर रोमांचक विजय नोंदविल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघचा आत्मविश्‍वास बळावला आहे.
हैदराबाद संघाचे पाच सामन्यात ३ विजय व २ पराभव असून ते ६ गुणांसह गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्स प्रत्येकी ८ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे चार सामन्यात २ विजय व २ पराभव असून ते किंग्ज इलेव्हन पंजाब व रायझिंग पुणे सुपरजायण्ट्‌ससोबत प्रत्येकी ४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला कोलकाता नाईटरायडर्सकडून ४ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. आता हैदराबादच्या भूमीवर दिल्ली संघाला हैदराबाद संघाशी झुंजायचे आहे. गत सामन्यात दिल्लीच्या संजू सॅमसन, रिषभ पंत या युवा फलंदाजांसह बिलिंग, के.के. नायर, श्रेयस अय्यर यांनी उत्तम फलंदाजी केली, मात्र आता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अशाच कामगिरीची अपेक्षा कर्णधार झहीर खान बाळगत आहे. कारण हैदराबादकडून सामन्याचे चित्र बदलविण्याची क्षमता असलेला गोलंदाज म्हणजे भुवनेश्‍वर आहे. झहीर खानसह पॅट कमिन्स, ख्रिस मॉरीस, अमित मिश्रा, मोहम्मद शमी यांनाही आपल्या गोलंदाजीची कमाल दाखविण्याची गरज आहे.
हैदराबादचा धाकड फलंदाज आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरला रोखणे दिल्लीच्या गोलंदाजांपुढे आव्हान राहील. गत सामन्यात सलामी फलंदाज वॉर्नरने नाबाद ७० धावांची खेळी केली होती. हैदराबादकडे शिखर धवन,
हेन्रीक, नमन ओझा, युवराज सिंगसारखे तडाखेबंद फलंदाज आहे. (वृत्तसंस्था)