डोळसांना सागरदृष्टी

बंगळुरूच्या बाहेतीची बोस्टन मॅराथॉनवर मोहर

0
128

नवी दिल्ली, १८ एप्रिल 
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा आनंदाश्रू पाझरणारा क्षण आहे. बंगळुरूचा सागर बाहेती हा ऐतिहासिक बॉस्टन मॅराथॉन पूर्ण करणारा पहिला दृष्टिहीन भारतीय धावपटू ठरला आहे. बॉस्टन मॅराथॉन ही जगातील जुनी, सर्वात स्पर्धात्मक व पात्रता मिळविण्यास अवघड असलेली ही प्रतिष्ठेची दौड स्पर्धा आहे.
मस्साशूसेट्टीस असोसिएशन फॉर ब्लाईंड व एमएबीव्हीआय या संघटनेच्या सहकार्याने ३१ वर्षीय सागर बाहेती अमेरिकेला गेला आणि त्याला प्रसिद्ध मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यास त्याचे महाविद्यालयीन मित्र बॉस्टनस्थित देविका नारायण अयर्ट्‌स यांचेही सहकार्य लाभले. त्यामुळेच तो बॉस्टन मॅराथॉनमध्ये सहभागी होणारा पहिला दृष्टिहीन भारतीय धावपटू ठरला.
उष्ण वातावरणात झालेल्या या १२१ व्या बॉस्टन मॅराथॉनमध्ये ३० हजार धावपटूंमध्ये सागर बाहेती हा एक होता. २०१७ची ही बॉस्टन मॅराथॉन दशकातील दुसरी उष्ण मॅराथॉन म्हणून नोंद झाली, हे येथे उल्लेखनीय.
सागरने सुमारे ४२.१६ कि.मी. अंतर अवघ्या चार तासात पूर्ण केले. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे आई-वडील विष्णुकांता व नरेश बाहेती हेसुद्धा बॉस्टनला गेले होते.
सागर बाहेती हे पेशाने व्यावसायिक असून २०१३ मध्ये आजारपणामुळे त्यांना अंधत्व आले व त्याचे निदान होऊ शकले नाही. सागर लहानपणापासूनच खेळकरवृत्तीचा होता. बॉस्टन मॅराथॉनमध्ये सहभागी होता यावे म्हणून त्याला एमएबीव्हीआय संघटनेतर्फे थोडे फार दिसण्यासाठी एक उपकरण घेऊन दिले होते. दररोज धावण्याचा सराव करण्यासाठी हे उपकरण त्याला उपयोगी पडत होते. सागरला क्रिकेटचीही आवड आहे. तो म्हणाला की, मी माझ्या वडील व काकांना क्रिकेट खेळतानाच वाढलो. ते क्लब पातळीवर क्रिकेट खेळत होते. म्हणून मलाही
क्रिकेटचे वेड लागले. मीसुद्धा क्लबकडून क्रिकेट खेळायचो, तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. अगदी डोळ्यांवर उपचार सुरू होईपर्यंत खेळलो. (वृत्तसंस्था)