जमीन से जन्नत तक

0
79

रोखठोक
सध्या अवघे विश्‍व दहशतवाद्यांच्या सावटाखाली जगत असून, रोज कुठे ना कुठे रक्तपात झाल्याच्या घटना हमखास ऐकायला येतात. मग त्या लहान मुलांच्या शाळा असो, की कडक सुरक्षा असलेली विमानतळे. सर्वत्र रक्तामांसाचा चिखल करणे दहशतवाद्यांचा आवडता उद्योग आहे.
दहशतवादी कोण, त्यांचा धर्म कोणता, त्यांचा उदय कसा झाला, त्यांना कोण पोसत आहे, शस्त्रे पुरवीत आहे, याची इत्यंभूत माहिती आता जगातील सर्वच देशांना झाली आहे. यात पाकिस्तान हा अतिरेक्यांचे पोषण करणारा अव्वल नंबरचा देश म्हणून पुढे आला आहे. कारण, या देशात ७८ दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या पैशावर पोसल्या जात आहेत. इतकेच नव्हे, तर तालिबान आणि इसिस या अतिशय क्रूर दहशतवाद्यांनाही पाकिस्तान मुक्तहस्ते मदत करीत आहे. कुख्यात ओसामा बिन लादेन याला लपवून ठेवल्यानंतरही पाकिस्तानने त्याची माहिती अमेरिकेला दिली नाही. पण, जेव्हा हे अमेरिकेला कळले तेव्हा आपल्या सर्वात चपळ आणि कार्यक्षम तुकडीला अबोटाबादमध्ये पाठवून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. यावरून पाकिस्तानचे खरे छुपे रूप त्या वेळी जगापुढे आले. त्यामुळे सर्वच प्रमुख देश आता पाकिस्तानपासून अतिशय सतर्क आहेत. कारण, पाकिस्तानच्या या नापाक कारवायांना मदत करण्यासाठी अधिक नापाक असणार्‍या चीनचीही त्याला साथ मिळत आहे. याबाबतीत अमेरिका आणि इस्रायल हेे तर कमालीचे जागरूक दिसतात.
जग काय म्हणेल, मानवाधिकार आयोग काय असतो, याची जराही भीड वा तमा न बाळगता, आपल्या शत्रूला ते घरपोच सेवा देतात. अगदी कालपरवा अमेरिकेने पाक सीमेजवळ अफगाणिस्तानात नॉन न्यूक्लिअर अर्थातच मदर ऑफ ऑल बॉम्बस् (जीबीयु ४३) दहशतवाद्यांच्या माहेरघरी फोडून, आपले आद्यकर्तव्य पूर्ण केले. तब्बल दहा हजार किलोचा बॉम्ब टाकताना ना पर्यावरणाची काळजी घेतली, ना फालतू निरपराधांची चिंता केली गेली. कारण त्यांचे टारगेट क्लीअर होते. या हल्ल्यात किती गेले, किती जखमी झाले याची आकडेमोड न करता, आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतल्याचे त्यांनी जाहीरसुद्धा केले. अफगाणिस्तानातील ज्या भागात हा बॉम्ब टाकण्यात आला, तेथील गुफांमध्ये इसिसच्या जहाल दहशतवाद्यांनी आपला तळ स्थापन केला होता. हे अमेरिकेला कळताच तिने थेट कारवाई केली. दहशतवाद्यांशी लढताना ताकाला जाताना भांडे लपवण्यात काही अर्थ नाही, हे अमेरिका आणि इस्रायलला पक्के ठाऊक आहे. इस्रायलसाठी त्यांचा एक सैनिक हजार सैनिकांच्या बरोबर असतो आणि त्यामुळेच ते एका सैनिकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणत्याही मर्यादा पार करण्यासाठी सदैव तत्पर असतात.
जिथचा मुर्दा तिथेच गाडणे, या न्यायाने आजवर अमेरिकेने सद्दामला इराकमध्ये, लादेनला अबोटाबाद पाकिस्तानात, कर्नल गद्दाफीला लिबियात, तर इतर उरलेल्यांना जागा मिळेल तिथे सुपुर्दे खाक केले. बरं, एवढे सर्व करताना ना कुठल्या सरकारची परवानगी घेतली ना, आंतरराष्ट्रीय समुदायाची काळजी केली. ‘टिट फॉर टॅट’ या युक्तीनुसार दहशतवाद्यांची नांगी ठेचून काढली. या सर्व प्रकरणात अमेरिकेला ना कधी दहशतवाद्यांचे समर्थक आड आले, ना दहशतवाद्यांचा धर्म. या बाबतीत अमेरिकेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कमीतकमी दहशतवाद्यांना थेट लष्करी कारवाई करून ठेचून काढणारे एकतरी राष्ट्र या भूतलावर अस्तित्वात आहे, याचे समाधान पूर्ण जगाला आहे. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प हे जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले, तरी जगभरातल्या शांतिपूर्ण जनतेच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत!
भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाचे चटके जेवढे सहन केले, त्यांची यादी एवढी लांबलचक आहे की, ती येथे सांगणे कठीण आहे. मोदींचे सरकार आल्यावर मानवतावाद वगैरे सरकारने सोडून दिला आहे. दहशतवादी जिवंत असेपर्यंत दहशतवाद्यांना धर्म नसतो, पण अंतिम संस्कार मात्र अफाट गर्दीला साक्षी ठेवून यथोचित रीतिरिवाजनुसार कसे कााय पार पाडले जातात, हे मात्र कधीही न सुटणारे कोडे असते.
या निमित्ताने का होईना, अमेरिकेने दहशतवाद्यांचा मुकाबला कसा करायचा, याचा आदर्श पाठ घालून दिला आहे. आपल्या सरकारने यापूर्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून आपल्या खंबीरपणाचा परिचय दिलाच आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर राज्यकर्ते योग्य बोध घेतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही…
– डॉ. अनिल पावशेकर
९८२२९३९२८७