आत्महत्या : एक गंभीर समस्या!

0
124

वास्तव
मी मेल्यानंतर माझ्या कुटुंबाचे काय होईल, याचा विचार आत्महत्या करणारा करत नाही आणि त्याच्या जाण्यामुळे इतरांना काही फरक पडत नाही. मीच माझ्या कुटुंबाचा विचार करणार नसेल तर इतरांनी तरी तो का करावा?

आत्महत्या, मग ती कुणीही आणि कुठल्याही कारणास्तव केलेली असो, तिचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. पेपर अवघड गेला, कर आत्महत्या! प्रेमभंग झाला, कर आत्महत्या! सोयरिक मोडली, कर आत्महत्या! अपयश आले, कर आत्महत्या! अपमान झाला, कर आत्महत्या! निसर्ग कोपला, कर आत्महत्या! हल्ली आत्महत्या इतक्या स्वस्त कशा काय झाल्या आहेत? आत्महत्येची जी कारणं आज सांगितली जात आहेत, ती पूर्वीही होतीच की! परंतु, त्या काळी आजच्याइतक्या आत्महत्या होत नव्हत्या. आत्महत्या करणारांविषयी सहानुभूती जरूर असायची, परंतु त्याचे भांडवल सहसा कुणी करत नसे. अशा घटना अपवादात्मक परिस्थितीतच घडत असत. आज एवढ्या तेवढ्या कारणांवरून कुणीही आत्महत्या करत आहे. याला समाजाचा कुठलाच घटक अपवाद नाही. आत्महत्येचे प्रमाण कमीजास्त असू शकेल, इतकेच. आर्थिक आघातापेक्षा मानसिक आघातामुळे अधिक आत्महत्या होतात, असे समाजशास्त्रज्ञ म्हणतात. अवास्तव वाढलेल्या-वाढवलेल्या अपेक्षा, वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना, आत्मकेंद्रित व्यवहार आणि पराभूत मनोवृत्ती ही आजकालच्या आत्महत्यांमागील प्रमुख कारणं आहेत. संकटांशी दोन हात करण्याची जिद्दच आम्ही हरवून बसलो आहोत. मी मेल्यानंतर माझ्या कुटुंबाचे काय होईल, याचा विचार आत्महत्या करणारा करत नाही आणि त्याच्या जाण्यामुळे इतरांना काही फरक पडत नाही. मीच माझ्या कुटुंबाचा विचार करणार नसेल तर इतरांनी तरी तो का करावा?
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोलीच्या विवाहोत्सुक तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. वरपक्षाकडून आलेल्या मागण्या आपला बाप पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे आपल्या विवाहाला विलंब होत असल्याची बाब जिव्हारी लागल्यामुळे तिने जीव दिला. आजकाल विवाह हा संस्कार राहिला नसून तो एक बाजार झाला आहे. दोन जिवांचा, कौटुंबिक-सामाजिक इभ्रतीचा-प्रतिष्ठेचा किळसवाणा बाजार! बाजार म्हटलं की रोकडा व्यवहार! ज्यांची ऐपत नाही त्यांनी बाजारात जाऊ नये- खरेदी-विक्री करायला! एरवी सहसा न दिसणारी घराण्याची प्रतिष्ठा लग्नाच्या बाजारात अचानक उफाळून येते. घराणं तोलामोलाचं हवं! आमच्या प्रतिष्ठेला शोभणारं हवं! ही प्रतिष्ठा कशात तोलायची, तर देण्याघेण्यात! वा रे प्रतिष्ठा! या सार्‍यांचा मनस्वी तिटकारा असणारे तरुण-तरुणी, आई-बाप, कुटुंबं या समाजात नाहीत असे नाही, परंतु त्यांचीही कधीकधी गोची होते. आम्हाला तुमच्याकडून काहीही नको. फक्त मुलगी आणि नारळ द्या. वरपक्षाकडून असा प्रस्ताव आला तर वधूपक्ष संशयाने बघतो. वधूपक्षाकडून कोरा चेक ऑफर केला गेला, तर वरपक्ष साशंक होतो! काहीतरी गडबड दिसतेय! अशा दुष्टचक्रात अडकल्यामुळेच शीतल वायाळ या तरुणीने आत्महत्या केली असावी. अन्यथा तिला अनुरूप जोडीदार मिळणे अवघड नव्हते. तिच्या पंचक्रोशीतच एखादा ध्येय्यवेडा तरुण तिला मिळाला असता.
आपल्यावर कुणीच प्रेम करत नाही, कुणीच आपले लाड करत नाही म्हणून बारामतीच्या सायली उर्फ संध्या या १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटनाही ताजी आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या तर रोजच होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा ही कारणं सांगितली जात आहेत. ती खरीही असतील, परंतु आत्महत्या हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग होऊ शकत नाही. सर्वात धैर्यशील, सोशीक असणारा शेतकरी अलीकडे इतका हळवा, निराश का होत आहे, याची मानसशास्त्रीय कारणं शोधून त्यावर कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे. कर्जमाफी हा त्यावरचा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे सारेच राजकीय पक्ष ज्या पद्धतीने बिनव्याजी भांडवल म्हणून वापर करत आहेत, ते अत्यंत निंदनीय आहे. सर्व शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून विरोधक इरेला पेटले आहेत, तर आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही, असे सत्ताधारी म्हणत आहेत. वस्तुस्तिथी सांगून शेतकर्‍यांना दुखवायला कुणीच तयार नाही. आम्हाला कर्जमाफी नको. आम्ही आमचे कर्ज स्वबळावर फेडू. तुम्ही आम्हाला तशी परिस्थिती निर्माण करून द्या, असे म्हणायला शेतकरी तयार नाही. संपावर जायची भाषा करतो आहे. या गोंधळलेल्या परिस्थितीत शेतकरी-आत्महत्या सुरूच आहेत. कर्जमाफी आज ना उद्या होणारच असेल, तर उर्वरित हप्ते कशाला फेडायचे, असा विचार, आजपर्यंत इमानेइतबारे कर्ज फेडणारा शेतकरी करत असेल, तर त्याचे काय चुकले? सरकारचा निर्णय काहीही झाला, तरी आत्महत्या संपूर्णपणे थांबतील याची सुतराम शक्यता नाही. कारण आत्महत्या स्वस्त झाल्या आहेत. आजची बिघडलेली समाजव्यवस्था आणि सरकारची गेल्या कित्येक वर्षांतली धरसोड वृत्ती याला कारणीभूत आहे. शेतकरी अन्नदाता असला, तरी ‘अन्नदाता सुखी भव’ असं त्याच्या दारात जाऊन कुणी म्हणतच नाही.
मनात विचार आला आणि केली आत्महत्या, असे कधी होत नसते. आत्महत्येचा विचार बरेच दिवस मनात खदखदत असतो. नैराश्याच्या टोकावर पोहोचले की आत्महत्या केली जाते. नैराश्य हा मानसिक आजार आहे आणि तो कुणालाही होऊ शकतो.
‘मन करा रे प्रसन्न,’ हे या आजारावरचे आणि आजार होऊच नये यासाठीचे प्रभावी औषध आहे. ‘अचपळ मन माझे, आवरता आवरेना,’ अशी मनाची अवस्था असल्यामुळे, त्याला सदोदित प्रसन्न ठेवणे सोपे नसते. प्रत्येक व्यक्ती केव्हा ना केव्हा निराश होतेच. अपेक्षापूर्ती नाही झाली की नैराश्य येते. रोजच्या जीवनात थोडेजरी मनाविरुद्ध घडले तरी नैराश्य येते. कारण सामान्य माणूस निरपेक्ष वृत्तीने कृती करूच शकत नाही. अहो, कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही देवालाही हात जोडत नाही! म्हणूनच गीता सांगते की, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन…’
वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शारीरिक, मानसिक आघात झाले असतील, तर अशी व्यक्ती फार लवकर नैराश्यग्रस्त होऊ शकते. लैंगिक छळ, मायेचा अभाव, प्रेमात-नात्यात प्रतारणा, धकाधकीचे जीवन, अस्थिरता, व्यसनाधीनता इत्यादी कारणांमुळेही व्यक्ती या आजाराला बळी पडू शकते.
आत्महत्येसंबंधी विचार येऊ लागतात. नैराश्यग्रस्ताशी प्रेमाने, आपुलकीने बोलणे, त्याला बोलते करणे, त्याच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवणे, यासाठी त्याच्या जवळचं कुणीतरी सतत त्याच्या जवळ असायला हवं. हे कुटुंब, हा समाज, हा गाव माझा आहे. सरकार माझे आहे. हे मला उघडं पडू देणार नाहीत. माझ्यावर मायेचे, आपुलकीचे पांघरूण घालतील, याची खात्री पटली तर सहसा कुणी आत्महत्या करणार नाही. असे वातावरण निर्माण करणे, ही आपल्या सार्‍यांची जबाबदारी आहे.
– सोमनाथ देविदास देशमाने
९७६३६२१८५६