व्यवहार असावा असा!

0
155

शतश्‍लोकी
तिष्ठन् गेहे गृहेशोऽप्यतिथिरिव निजं धाम गन्तुं चिकीर्षु-
र्गेहस्थं दु:खसौख्यं न भजति सहसा निर्ममत्वाभिमान:|
आयात्रायास्यतीदं जलदपटलवद्यातृ यास्यत्यवश्यं
देहाद्यं सर्वमेेव प्रविदितविषयो यश्‍च तिष्ठत्ययत्न:॥
आपल्याला आपल्या घरी जायचे आहे, असा विवाद करून घरात राहणारा पाहुणा अभिमान वा ममत्व न बाळगता राहतो तथा सुख वा दु:ख भोगत नाही. तथा देहादिक सर्व बाबी ढगाप्रमाणे येवो वा जावो अशा रीतीने विषयांच्या बाबतीतही विचार करीत (ज्ञानी पुरुष) धडपड न करता सुखाने जीवन जगतो. व्यवहारात जगताना ज्ञानी माणूस कसा जगतो, याचे आचार्यश्रींनी दोन सुंदर दृष्टान्ताधारे येथे विशद केले आहे. प्रथम दृष्टान्तात ते सांगतात की, या जगात एखाद्या पाहुण्याप्रमाणे राहावे. आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो. ते घर कितीही भव्य, दिव्य, प्रशस्त असले, तरी आपल्या मनात आपल्या घरी परतण्याची इच्छा सदैव जागृतच असते. समोरचे घर आपल्या घरापेक्षा अप्रतिम असले, तरीही आपले मन तेथे कायमचे लागत नाही. मग ते घर जर आपल्या घरापेक्षा असुविधाजनक असेल तर मग सांगायलाच नको!
तद्वत आपण या जगतात आलो. या देहात आलो. जरी सध्या या देहात निवास करीत असलो, तरी हे आपले कायमचे घर नाही. कधी ना कधी येथील मुक्काम हलवणे अनिवार्य आहे. पण, हे समजून न घेता आपण या देहरूपी घरालाच कायमचे समजू लागतो. एखादा पाहुणा जर आला आणि घर आपलेच समजून कायमचा चिकटू लागला, तर त्या घरचे मूळ मालक नाराज होतील की नाही? अशा वेळी काही काळानंतर का होईना, पण ते पाहुण्याला त्रास देतीलच की नाही? किमान त्याच्या सुविधांची काळजी घेणेतरी बंद करतीलच की नाही? अगदी तीच रचना आहे या देहाची. हा देह पंचभौतिक आहे. पंचमहाभूतांपासून तो बनलेेला आहे. अर्थात, त्यावर खरी मालकी त्यांचीच आहे. आलेला अज्ञ जीव जेव्हा तेथे अत्याधिक आसक्त होतो, त्या वेळी शेवटी ते त्याची सुख-सुविधा पाहणे बंद करतात. यालाच व्यवहारात व्याधी म्हणतात. त्यामुळे हे घर आपले कायमचे नाही. आपण येथे पाहुणे आलो आहोत, हे प्रथम ध्यानी घ्यायला हवे.
पाहुणपणाचा सहज परिणाम हा असतो की, तो पाहुणा त्या घरातील सुख-सुविधांनी तर समाधानी होतो, पण असुविधांनी दु:खी मात्र होत नाही. आपण पाहुणा म्हणून गेलो आणि तेथील भिंतीचा गिलावा पडला, प्लॅस्टर आवडले, पीओपी पडले, तर आपण व्यथित होतो का? समजा एखादे बटन खराब असेल, एखादा नळ बिघडला असेल, तर आपली सहज भूमिका असते- ‘‘जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे? दोन दिवसांचा तर प्रश्‍न आहे.’’ अगदी हीच भूमिका ज्ञानी माणसाची या देहात असताना असते. देहाचे वार्धक्य, केसांचे पिकणे, अंगाच्या सुरकुत्या या सगळ्यांकडे तो ज्ञानी असाच पाहतो. जाऊ दे! आपल्याला राहायचेच किती आहे? या वृत्तीत नैराश्य नाही. स्वीकार आहे. बरे, या गोष्टी नाही स्वीकारल्या तरी घडणारच आहेत ना? मग अस्वीकृतीने केवळ शोकाशिवाय हाती काय लागणार? ‘जीवनाच्या वास्तविकतेची अस्वीकृती कण्हणारा शोक निर्माण करते, तर सहज स्वीकृती गुणगुणणारा श्‍लोक प्रसविते.’ निवडायचे काय? हाच आहे विवेक. हा विवेक ज्याच्याजवळ असतो तोच ज्ञानी! असा ज्ञानी जीवनातील घटनांकडे आकाशस्थ मेघाप्रमाणे पाहतो. मेघाला ना आपण थांबवू शकतो, ना घालवू शकतो. त्याचे येणेजाणे जर आपल्या हातातच नसेल, तर त्याच्या आगमनाचा आनंद वा गमनाचे दु:ख करण्यात कोणती बुद्धिमत्ता? ढगाच्या बाबतीत हे सहज कळते. पण, गृहादिक पदार्थ तथा स्त्री-पुत्रादिकसंबंधी यांच्याही बाबतीत हीच द्रष्टावृत्ती स्थिर होणे, हे खरे ज्ञान!
ढगाच्या येण्या-जाण्याचा फायदा वा हानी हा विषय संपला की, मग एकच मजा उरते ती म्हणजे, ढगांच्या आकाराची गंमत पाहत राहणे. कमालीचे सुंदर दर्शन घडवितात ढग. त्यांचा आस्वाद घेता यावा. त्या आकारांचे साकारणे आणि विरघळणे दोन्ही आनंद देत राहते. कारण आता त्यातून मिळवायचे काहीच नसते. अशाच एका रम्य सायंकाळी ढगांचा हा रंगोत्सव पाहणारा एक सहयात्री पू. स्वामी विवेकानंदांना म्हणाला- ‘‘स्वामीजी, डोळे उघडा. पाहा काय सुंदर दृश्य आहे.’’ स्वामीजी आत्ममग्न स्थितीत डोळे मिटूनच म्हणाले- ‘‘डोळे उघडल्यावर मायेच्या राज्यातील दृश्य इतके सुंदर दिसते, तर मग डोळे मिटून कधीतरी मायापतीच्या सौंदर्याचा विचार कर.’’ ढग पाहता पाहता असा अंतरीचा मळभ जातो, त्याला खरा ज्ञानी म्हणतात…
– प्रा. स्वानंद गजानन पुंड