महाआघाडीचे स्वप्न!

0
137

वेध
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून, कॉंग्रेससह सगळेच विरोधी पक्ष अस्वस्थ आहेत. मध्यंतरी तर १३ पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि मोदी सरकारमुळे देशात दहशत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. गेल्या महिन्यात पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये, पुन्हा चार राज्यांत भाजपाचीच सरकारे आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच आता २०१९ साली होणार्‍या निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी महाआघाडी तयार करण्याच्या हालचाली विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत. उत्तरप्रदेशात तर आता बसपाच्या मायावती यांनी समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करण्याचे संकेतही दिले आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून अखिलेश यादव यांनीही, आघाडी होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. पण, अशी युती मुलायमसिंहांना मान्य नाही. मुलायमसिंहांना अशी युती मान्य नसली, तरी ती होऊ शकते, कारण मुलायम यांना आता फार अधिकार राहिलेले नाहीत. आणि हो, राजकारणात काहीही होऊ शकते! त्यामुळे उद्या चालून मायावती आणि अखिलेश यांची युती झाली तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. इतिहासात आपण डोकावलो, तर आपल्याला असे लक्षात येईल की, कॉंग्रेसला रोखण्यासाठी अशी महाआघाडी झाली होती. त्यामुळेच व्ही. पी. सिंह, देवेगौडा, चंद्रशेखर आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे नेते पंतप्रधान होऊ शकले. त्यांची पात्रता नव्हती असे अजीबात म्हणायचे नाही; पण महाआघाडी झाली नसती तर कदाचित त्यांना संधीच मिळाली नसती. महाआघाडीचा हा इतिहास लक्षात घेतला, तर भाजपाला रोखण्यासाठी भविष्यात कॉंग्रेसादी पक्षांची महाआघाडी अस्तित्वात येऊ शकते. पण, या महाआघाडीचा नेता म्हणजे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हाही प्रश्‍नच आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे सर्वमान्य उमेदवार राहू शकतात, अशी चर्चा आहे. पण, ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा लक्षात घेता त्या आपला दावा सोडतील, याची शक्यताही कमीच वाटते. दुसरीकडे, लालूप्रसाद यादव यांची महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेली नाही. पण, बिहारचे मुख्यमंत्रिपद लालूपुत्र तेजस्वी यादव यांना मिळाले तर ते पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांना पाठिंबा देतील, ही शक्यता नाकारता येत नाही. २०१९ पर्यंत मोदीलाट कायम राहते, महाआघाडी जन्म घेते की घेणारच नाही, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, आज तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा नेता राजकीय क्षितिजावर नाही, हे तेवढेच खरे…!

भारताची वाढती ताकद
भारताला विश्‍वगुरू बनविण्याचे स्वप्न आम्ही कित्येक वर्षांपासून पाहतो आहोत आणि प्रयत्न केलेत तर हे स्वप्न प्रत्यक्षात येणे कठीण नाही. भारताकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि ती वेळोवेळी दिसूनही आली आहे. सुदैवाने केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार आल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढली आहे. नरेंद्र मोदी यांनी जगातल्या सर्व प्रमुख देशांचे दौरे केले, तिथल्या राष्ट्रप्रमुखांसोबत त्यांनी चर्चा केली आणि प्रत्येक देशासोबत भारताला दृढ संबंध प्रस्थापित करायचे आहेत, अशी इच्छाही प्रदर्शित केली. त्याचे अपेक्षित परिणाम आता दिसायला लागले आहेत. शेजारचा पाकिस्तान सातत्याने सीमेपलीकडून घातपाती कारवाया करीत भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानचे हे कारस्थान सुरू आहे. भारताने अनेक वेळा पाकला चारीमुंड्या चीत केल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. आताही खोर्‍यात जे काही सुरू आहे, ते पाकचेच कारस्थान आहे. दुसरा शेजारी चीनसुद्धा वारंवार भारताकडे डोळे वटारून पाहात असतो. सातत्याने भारताला धमकावण्याचे उद्योगही चीनकडून सुरू असतात. असे असले तरीही भारताने कधीही कुणाच्या दबावाला बळी न पडण्याचे ठरविले असल्याने दिवसेंदिवस भारताची प्रगतीच होत आहे. नुकत्याच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद या भारताच्या दौर्‍यावर येऊन गेल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल हेही भारत दौर्‍यावर आले होते. पण, त्यांच्या दौर्‍याची फार चर्चा झाली नाही. कारण, कुलभूषण जाधव या भारतीयाला पाकने अचानक फाशीची शिक्षा सुनावली अन् संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी कुलभूषण जाधव हेच राहिले! ते भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. ते पाकमध्ये कसे गेले, की पाकने त्यांचे अपहरण केले, याचा शोध अजून लागलेला नाही. पण, कुलभूषण जाधव यांना पाकने फाशीची शिक्षा सुनावल्याने दोन विदेशी पंतप्रधानांचा दौरा मीडियाकडून दुर्लक्षितच राहिला, हे तेवढेच खरे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातल्या प्रमुख देशांचा दौरा केल्यानंतर भारताच्या प्रतिष्ठेत वाढच झाली आहे. भारताकडे पाहण्याचा जागतिक दृष्टिकोन बदलत चालला आहे. भारताबद्दलचे जे गैरसमज होते, ते दूर करण्यात आणि जगाला आपल्याकडे आकर्षित करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत.
जगाला भारताकडून अपेक्षा आहेत. भारताचे नेतृत्व जग मान्य करेल की नाही हे माहिती नाही; पण भारताने अनेक बाबतीत पुढाकार घ्यावा, अशी इच्छा असणारे समर्थक देश दिवसेंदिवस वाढत जातील, यात शंका नाही! चीनची महत्त्वाकांक्षा भारतापासून लपून राहिलेली नाही. चीनचा स्वभाव हा विस्तारवादी असल्याचे अनेकदा लक्षात आले आहे. असे असले तरी भारताच्या ताकदीकडेही कुणाला दुर्लक्ष करता येणार नाही, अशी स्थिती भारताने स्वबळावर निर्माण केली आहे!
नंदकिशोर काथवटे
९४२३१०१९३८