भुतं… मानगुटीवरच बसलेली!

0
106

यथार्थ

आणिबाणीनंतर, ‘तुम्ही केवळ मतदान करा (अर्थात आम्हाला) बाकी तुमचे काय करायचे ते आम्ही बघू,’ ही मानसिकता तयार करण्यात आली. त्यामुळे हा देश, हा समाज यांच्याबद्दलची आमची कर्तव्ये आणि त्यासाठी करावयाचा संघर्ष यांची भूल पडणे, ही सामान्य बाब झाली आहे. पण, माणूस म्हणून तुमच्या जाणिवा, सभ्यता, संस्कार यांचे काय? ही सारीच भुतं आमच्या मानगुटीवर बसली आहेत…!

माणसं फारच संवदेनशील झाली आहेत. त्यांच्या अस्मिता वगैरे फार म्हणजे फारच टोकदार झाल्या आहेत, असे म्हटले जाते. सरकार, शासन, राजकीय व्यक्ती, पक्ष हे सारेच त्यांच्या गरजेनुसार जनसामान्यांच्या अस्मिता वगैरे कुरवाळतात, असे आरोप एकमेकांवर केले जातात. कुणीतरी कुणाच्या कलाने घेते आहे आणि हा माझ्यावर अन्यायच आहे, अशा ठाम समजुतीनं काळवंडलेली, करपलेली माणसं सतत भेटत राहतात. त्यातून कामकरी माणसं स्वत:ची अक्षमता लपविण्यासाठी काही पडदे (खरेतर आडपडदे!) आपल्या समोर उभारत असतात. नंतर त्यांच्या भिंती तयार होतात. या भिंती निर्बुद्ध आणि कावेबाज असतात. माणसांनी स्वत:चा नालायकपणा लपविण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे अस्मिता का? माणसांची संधी व्हायला हवी, तर विग्रह केला जातो. विग्रहाच्या परंपरा उभ्या राहतात. अर्थात, अशा बेगडी अस्मितांना कुरवाळण्याचे राजकारण या परंपरा आणखी मजबूत करतात. वर्गविग्रहाचे लढे त्यातूनच उभे राहतात. माणुसकी संपली, असे म्हणत असताना माणसं ‘माणूस’ म्हणून जगणे नाकारत असतात. ते कुठल्या धर्माचे, जातीचे, प्रांताचे, भाषेचे, वर्ग आणि वर्णाचे असतात. हे सगळे नाकारतो, असे सांगण्याचा अहं मिरविणारी माणसे कुठल्या संघटनेची, नव्या आध्यात्मिक बाबा, बुवांच्या पंथाची असतात… या सार्‍यात माणूस म्हणून बुद्धीची समंजस तरीही कणखर अशी भूमिका स्वीकारत जगणे बहुतांश लोकांनी सोडलेले असते. माणुसकीला काळवंडून टाकणार्‍या व्यभिचारांना दैनंदिन जीवनात माणसं सहज स्थान देऊन टाकतात…
मागच्या आठवड्यात व्हॉटस्‌ऍप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर दोन चित्रफिती फिरत होत्या. बहुतांश लोकांनी स्वत:च्याही नकळत त्या समोर ढकलल्या असतील. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कशी भुते स्वच्छंद नांदत असतात, हे दाखविणार्‍या त्या चित्रफिती होत्या. मोबाईल हाताळणार्‍या सुबुद्ध नेटकर्‍यांच्या मनावर याचा काहीएक परिणाम होणारच नाही, असा सोयिस्कर अर्थ लावून त्या चित्रफितींच्या बाबत आपली जबाबदारी टाळून पुढे जाता येते.
त्या चित्रफिती कुठल्या धर्मावर, जातीवर, भाषा, प्रांत या अस्मितांच्या गडांवर हल्ले करणार्‍या अजिबातच नव्हत्या. त्यामुळे ‘आम्ही’ त्यावर चिडण्याचे, संतापण्याचे अन् त्यासाठी आमच्या अस्मिता दुखावण्याचे काहीच कारण उरत नाही…
हे असले व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरविणे म्हणजे समाजविघातक कृत्य आहे, असे पहिल्या प्रतिक्रियेत कुणालाच वाटत नव्हते. नागपूरचे मेडिकल कॉलेज म्हणजे गरिबांच्या वैद्यकीय उपचारांचे आश्रयस्थान आहे. तिथल्या व्यवस्थांबद्दल, सुनियोजित गैरव्यवस्थांबद्दल बोलता येईल. त्यावर वर्तमानपत्रांत अधूनमधून टीकाही होतच असते. इलेक्ट्रानिक्स माध्यमांना असल्या गैरव्यवस्थांबद्दल तसेही काही सोयरसुतक नसते. एक्स्लुझिव्ह, ब्रेकिंग असे त्यात काहीच नसते. सामान्य माणसे भरडली जातात. ते आम्ही स्वीकारलेले आहे. त्यामुळे त्यावर न बोलता आपण इतकाच विचार करू या की, मेडिकल कॉलेजला वैद्यकीय उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे त्याच परिसरात आश्रयाला असलेले नातेवाईक यांच्यात या व्हिडीओमुळे घबराहट पसरणार नाही का? आजकाल सार्‍यांकडेच स्मार्ट फोन आले आहेत. ते हाताळण्याचा स्मार्टनेस त्यांच्याकडे नसला तरीही…
हे असले व्हिडीओ कोण पसरवीत आहे, त्यामागे त्याचा नेमका काय उद्देश आहे, हे तपासून पाहणे, ही आपली जबाबदारी आहे, असे कुणालाच वाटत नव्हते. स्मार्टफोन हाताळणे, (खरेतर ‘वापरणे’) हा आपला अधिकार आहे, मात्र त्यातून निर्माण होणार्‍या जबाबदार्‍यांशी आपले काही सोयरसुतक नाही, अशीच सार्‍यांची भावना आहे. ‘‘अहो, हे असले व्हिडीओ दिवसाला किमान १०० तरी व्हायरल होतात. प्रत्येकाच्या बाबत आपण गंभीर व्हायचे का?’’ असा सवाल केला जात होता.
या गोष्टीची नेमकी दखल घेत त्याची सायबर सेलकडे तक्रार करून हा व्हिडीओ कुठून जनरेट झाला, हे शोधून काढत संबंधिताच्या कानफटीत सणसणीत चपराक लगावणे, ही आपली जबाबदारी आहे, असे प्रथमदर्शनी कुणालाच वाटत नव्हते. खरेतर ज्याच्या हातात मोबाईल आहे आणि त्याच्या मोबाईवर हा व्हिडीओ आला आहे, अशा प्रत्येकाची ही जबाबदारी होती. ज्याच्याशी या संदर्भात संवाद साधला ते दुसर्‍याकडे बोट दाखवीत होते. ‘‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांना का नाही सांगत तुम्ही? खरेतर ही त्यांचीच जबाबदारी आहे.’’ अशी सूचना केली गेली. ‘‘खरेतर मेडिकलच्या व्यवस्थापनानेच याची दखल घ्यायला हवी.’’ असेही प्रत्युत्तर मिळाले. हे असले व्हिडीओज् व्हायरल झाले, अशा बातम्या देणार्‍या बातमीदारांचे काय? त्यांची ही जबाबदारी नव्हती का? मेडिकल हे शासकीय रुग्णालय आहे. एखाद्या कॉर्पोरेट- व्यवसायी इस्पितळासंदर्भात हा व्हिडीओ का व्हायरल नाही झाला? तसा तो करण्यात आला असता, तर संबंधित इस्पितळाच्या व्यवस्थापनाने गजहब केला असता. तक्रार केली असती, पत्रपरिषद घेऊन हा कुणाचातरी खोडसाळपणा आहे, हेही सांगितले असते. त्या बातम्या छापून आणल्या असत्या. मेडिकलच्या व्यवस्थापनाला असे काहीच करावेसे वाटले नाही. तिथे उपचार घ्यायला येणार्‍या गरीब, सामान्य माणासांबद्दल आपली काही जबाबदारी आहे, असे सामान्यपणे कुणालाच वाटत नव्हते. उलट, ‘‘तुम्ही कशाला या भानगडीत पडता?’’ असा सवाल करण्यात आला. वाक्यांच्या अव्यक्त अवकाशात, ‘‘बराच रिकामा वेळ दिसतो.’’ असा टोमणाही होता.
बहुतांश लोकांची भूमिका हीच होती की, हे फार सामान्य असेच आहे. इतके ढवळून निघण्याचे काहीच कारण नाही… माणूस म्हणून ही बाब अस्मिता दुखवणारी आहे, ही जाणीव कुठेच दिसत नव्हती. अशा अनेक विसंगती आम्ही सहजभाव म्हणून स्वीकारल्या आहेत. त्या संदर्भात साधा संतापही आमच्या मनात उमटत नाही, निषेध ही फार दूरची बाब झाली. आम्ही स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरक्षितता स्वीकारली आहे आणि त्या बदल्यात आमच्या जबाबदार्‍यांतून सुटका मिळविल्या आहेत. गुलामांच्या मानसिकतेची ही दुसरी बाजू आहे. गुलाम सरकार आपले मानत नाहीत अन् मग अन्यायाविरुद्ध थेट लढा देण्याइतकी त्यांची माणूस म्हणून अस्मिता तरतरीत नसते. मग ते सरकारी म्हणून जे काय आहे त्याचे नुकसान करतात. रेल्वेच्या सिटा फाड, सार्वजनिक नळ सुरू ठेव, दिवे फोड… दुसरी बाजू ही की, मग व्यवस्थाशरण व्हायचे अन् त्याचीही चलाख पाठराखण करायची. सध्या या दुसर्‍या अवस्थेत आम्ही आलो आहोत. महागाई वाढतच असते, शासकीय कार्यालयात पिळवणूक होतच असते, सामान्यांच्या हक्कांवर गदा येणे, ही अत्यंत सामान्य बाब आहे… हे आणि असेच आम्ही स्वीकारून टाकले आहे. ‘तुम्ही केवळ मतदान करा (अर्थात आम्हाला) बाकी तुमचे काय करायचे ते आम्ही बघू,’ ही मानसिकता तयार करण्यात आली. त्यामुळे हा देश, हा समाज यांच्याबद्दलची आमची कर्तव्ये आणि त्यासाठी करावयाचा संघर्ष यांची भूल पडणे, ही सामान्य बाब झाली आहे. पण, माणूस म्हणून तुमच्या जाणिवा, सभ्यता, संस्कार यांचे काय? ही सारीच भुतं आमच्या मानगुटीवर बसली आहेत…!
श्याम पेठकर