अंधार्‍या डोळ्यांच्या पापण्यात पेरतात प्रकाशाचे दूत

0
105

नीलेश जोशी
अकोला,१९ एप्रिल 
पाहणे आणि दर्शन घेणे यात फरक असतो. दिसते म्हणजे दृष्टी आहेच, असे नाही. पाहण्याने पार्थीवच दिसते त्रिमितित… दर्शनाने पार्थिवाच्या पलिकडचेही नुसते दिसत नाही तर ते जाणिवेच्या पातळीवर येते. दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या मेंदूत ज्ञानाचा प्रकाश असतो मात्र त्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते तेव्हा चर्मचक्षू असलेला मदनीस लागतो, हे जगाने मान्य केले आहे. अकोल्याच्या प्रा. विशाल कोरडे यांना केवळ मदतनीस नव्हे तर दृष्टीहिनांना आपले डोळे देणारा स्नेहीदेखील आवश्यक असतो, असे वाटले आणि मग त्यांनी असे ‘अंधसोबती’ तयार करण्याचे व्रतच स्वीकारले.
अंधार्‍या डोळ्यांच्या पापण्यात पेरतात प्रकाशाचे दूत कोरडे यांनी तयार केले असल्याने अकोल्यातून २५ पेक्षा अधिक अंध विद्यार्थी अशा सोबत्यांच्या मदतीने परीक्षा देत आहेत.
अंध विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देताना लेखनिक व वाचक घ्यावा लागतो. विद्यापीठाच्या नियमानुसार दर तासाला अतिरिक्त वीस मिनिटे दिली जातात. अशा अंध विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्यासाठी विद्यापीठाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आता विद्यापीठाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार परीक्षा केंद्रातील प्राचार्य व केंद्र संचालकांच्या पूर्व परवानगीनेच लेखनिक व वाचक घेता येतात व अंध परीक्षार्थीं आपले लेखनिक व वाचक सोबत आणू शकतात.
या लेखनिक व वाचकांना प्रशिक्षणाची गरज असते. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अकोल्यातील शिवाजी कॉलेज येथील प्रा. विशाल कोरडे निरंतर प्रयत्न करीत आहेत. दरवर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रा. विशाल कोरडे लेखनिक व वाचक यांना अंध विद्यार्थ्यांना मदत कशी करावी, यासाठी तयारी करून घेतात. त्यासाठी अंध विद्यार्थी व त्यांच्यात संवाद निर्माण करतात. या प्रशिक्षण आणि संवादासोबतच डोळस आणि अंध यांच्या भावनिक मैत्रीची गुंफणही करावी लागते. त्यांच्या या मैत्रीचा आधारावरच त्यांच्यातील संवादाची गती वाढते आणि पेपर सोडवायला या नात्याचा फायदा होतो.
अंधेरोंसे मेरा रिश्ता बहुत है
मै जुगनू हुं, मुझे दिखता बहुत है
हा जावदे मलिकजादा मंजुर यांचा मतला सार्थ करित कोरडे सरांनी यंदा लेखनिक व वाचक म्हणून गौरी शेगोकार, शुभम नारे, रोशन वारके, मांडवी पाटील, प्राजक्ता सवयी, रागिणी खोडवे, माधव जोशी, योगेश ठोमरे, उषा सावरकर या खर्‍या अर्थाने डोळसांना विठ्ठल नावाच्या वेड्या कुंभाराने डोळे देऊनही त्यासमोर अंधार निर्माण केलेल्या दृष्टीवंचितांची हा डोळसांशी मैत्री जुळवून आणली आहे.