कुठल्याही त्यागाची तयारी : उमा भारती

0
117

आंदोलनात सहभागी असण्याचा अभिमानच
नवी दिल्ली, १९ एप्रिल 
कट रचण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. मी जे काही केले, ते खुलेआम होते. राम मंदिर चळवळीत सहभागी होते, याचा मला अभिमानच आहे. अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी कोणताही त्याग करण्याची, इतकेच काय, तर प्राणाहुती देण्याचीही माझी तयारी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आज बुधवारी केले.
सर्वोच्च न्यायालयाने बाबरी विध्वंसप्रकरणी खटला चालविण्याचे आदेश दिल्यानंतर पत्रकारांनी उमा भारती यांना गाठले आणि प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आपली भूमिका अतिशय रोखठोकपणे विशद केली.
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणे हेच माझे स्वप्न आहे. त्याकरिता कारागृहातच काय, तर फासावर लटकण्याचीही माझी तयारी आहे. माझ्याकरिता जसा देश आणि गंगा नदी सर्वतोपरी आहे, तसेच राम मंदिरही आहे. मी आज रात्रीच अयोध्येला जाणार आहे. तिथे रामललांचे दर्शन घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राम मंदिर चळवळीत सहभागी होण्याची कुठलीही खंत मला नाही. उलट गर्वच वाटतो. कोणतीही पळवाट मी काढणार नाही. या आंदोलनासाठी न्यायालय देईल ती शिक्षा भोगण्याची माझी आताही तयारी आहे, असे सांगताना, बाबरी मशुद पाडण्याचा कोणताही कट आम्ही रचला नव्हता. जे काही केले, ते उघडपणेच केले. संपूर्ण विश्‍वासानेच मी आंदोलनात सहभागी झाले होते. तिरंग्याकरिता मी मुख्यमंत्रिपदाचाही त्याग केला हेाता. अयोध्येत राम मंदिर उभे राहण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशानंतर कॉंग्रेसने आपला राजीनामा मागितला आहे, याकडे लक्ष वेधले असता, कॉंगे्रसला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारच नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १० हजारावर शीख नागरिकांची हत्या करण्यात आली. त्याआधी देशावर आणिबाणी लादण्यात आली. त्यावर कॉंग्रेसने आधी भाष्य करावे आणि मगच माझ्या राजीनाम्यावर बोलावे, अशा शब्दात उमा भारती यांनी ठणकावले. (वृत्तसंस्था)