गरजू शेतकर्‍यांनाच कर्जमाफी देणार ः चंद्रकांत पाटील

0
130

नवी मुंबई, १९ एप्रिल 
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे सरकारी धोरण असले तरी सरसकट सर्वांनाच कर्जमाफी देता येणार नाही. गरजवंत शेतकर्‍यांनाच कर्जमाफी देणार आहोत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नवी मुंबईतील माथाडी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्जमाफी दिल्यानंतर महाराष्ट्रातही शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष आणि शिवसेनेने लावून धरली आहे. कर्जमाफी हा एकमेव उपाय नसून कर्जमुक्तीसाठी सरकारने इतर पर्यायांवर अभ्यास सुरू केला आहे. यासाठी सरकारचा दोन कलमी कार्यक्रम आखण्याचा विचार आहे. पावसाळ्यापूर्वी यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतकर्‍यांना कोणत्या गोष्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते, त्याचा अभ्यास करून या गोष्टी सरकार स्वतः शेतकर्‍यांना खरेदी करून देऊ शकते किंवा दुसरा पर्याय म्हणजे शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव. राज्यातील २२ पिकांना सरकार स्वतः हमी भाव देण्याच्या विचारात आहे, अशी माहिती
आहे. (वृत्तसंस्था)