देशभरात लाल दिव्याला ‘रेड सिग्नल’

0
119

– केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
– व्हीआयपी संस्कृतीवर सर्वात मोठा आघात
नवी दिल्ली, १९ एप्रिल 
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी ऐतिहासिक आणि आजवरचा सर्वात मोठा निर्णय घेताना व्हीआयपी संस्कृतीवर चाप लावला आणि केंद्रीय मंत्री व अधिकार्‍यांच्या वाहनांवरील लाल दिव्याला ‘रेड सिग्नल’ दिला. अर्थात, मंत्री व अधिकार्‍यांनी लाल दिवा वापरण्यावर कायमची बंदी घातली. या निर्णयामुळे आता पंतप्रधान देखील आपल्या वाहनावर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत. देशभरातच हा निर्णय लागू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची औपचारिक अधिसूचना लवकरच जाहीर होणार असून, येत्या १ मे पासून हा ऐतिहासिक निर्णय अंमलात येणार आहे. तथापि, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या यासारख्या आकस्मिक सेवा देणार्‍या वाहनांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीनंतर केंद्रीय भूपृष्ठ, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेत दिली.
सध्याच्या नियमानुसार केवळ ३२ केंद्रीय मंत्री आणि स्वतंत्र पदभार असलेल्या मंत्र्यांनाच लाल दिव्याची गाडी वापरता येत होती. पण, या व्हीआयपी संस्कृतीला विविध स्तरातून झाल्यानंतर, लाल दिव्याचा वापर बंद करण्यासाठी नितीन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेतला. लाल दिव्याची संस्कृती बंद करण्यात यावी काय, असा प्रश्‍न विचारून गडकरी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांचे मतही मागविले होते. गडकरी यांनी गेल्या आठवड्यात याच मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती.
विशेष म्हणजे, पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लगेच राज्यातून व्हीआयपी संस्कृती हद्दपार करण्याचा आणि मंत्री व अधिकार्‍यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय घेतला होता.
असा होता गडकरीं प्रस्ताव
नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांकडे या संदर्भात जो प्रस्ताव दिला होता, त्यात देशात घटनात्मक पदांवरील केवळ नऊ व्यक्तीच लाल दिव्याची गाडी वापरू शकणार आहेत. यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेतील सभापती आणि सरन्यायाधीश यांचा समावेश राहील. याशिवाय, राज्यपाल, मुख्यमंत्री, विधिमंडळाचे अध्यक्ष व सभापती यांनाही लाल दिवा वापरण्याची परवानगी राहील, असे स्पष्ट केले होते.

लाल दिव्याचे वाहन वापरणार नाही ः मुख्यमंत्री
मुंबई : लाल दिव्याचे वाहन वापरण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या महत्त्वाच्या पावलाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असून, आपणही लाल दिव्याचे वाहन वापरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कित्ता गिरवत, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनीही गाडीवरील लाल दिवा काढून टाकला आहे. प
गडकरींनी सर्वप्रथम काढला लाल दिवा
या निर्णयाची सर्वप्रथम अंमलबजावणी करताना नितीन गडकरी यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढून टाकला. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सामान्यांना त्रास होईल, असे कोणतेही काम सरकार करणार नाही, असे गडकरी यांनी जाहीर केले.