लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, डॉ. जोशींवर खटला चालणार

0
137

– अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल
– अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश खारीज
नवी दिल्ली, १९ एप्रिल
डिसेंबर १९९२ मधील अयोध्येतील बाबरीचा वादग्रस्त ढाचा उद्‌ध्वस्त केल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि इतरांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा खटला चालविण्यात यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिला. यामुळे देशातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या सर्व नेत्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आरोपमुक्त केले होते. या आदेशाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर काही सुनावण्या झाल्यानंतर न्या. पी. सी. घोष आणि न्या. आर. एफ. नरिमन यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आज सीबीआयची विनंती याचिका मान्य करीत, अडवाणी, डॉ. जोशी आणि उमा भारती यांच्यासह अन्य आरोपींवर खटला चालविण्याची परवानगी दिली.
त्याचवेळी न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात आरोपी असलेले कल्याणसिंह हे सध्या राजस्थानचे राज्यपाल असल्याने त्यांना घटनेनुसार संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द संपल्यानंतरच त्यांच्यावर खटला भरला जावा. अयोध्येत ज्यावेळी बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा उद्‌ध्वस्त करण्यात आला, त्यावेळी कल्याण सिंह हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
या प्रकरणी रायबरेली आणि लखनौ येथील विशेष न्यायालयांमध्ये वेगवेगळे खटले सुरू आहेत. ते सर्व एकत्र करण्यात यावे आणि केवळ लखनौमधील न्यायालयातच चालविले जावे. तसेच हा खटला दैनंदिन आधारावर चालविला जावा आणि दोन वर्षांत तो पूर्ण करण्यात यावा. हा खटला पूर्ण होऊन निकाल जाहीर होईपर्यंत लखनौमधील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
या खटल्यातील अन्य आरोपींमध्ये विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, सतीश प्रधान, चंपत राय बन्सल यांचाही समावेश आहे. या सर्वांवर प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप आहे. या भाषणांनीच प्रेरित होऊन कारसेवकांनी १९९२ मध्ये बाबरीचा विध्वंस केला होता, असा सीबीआयचा आरोप आहे.
अभ्यास केल्यानंतर प्रतिक्रिया : भाजपा
न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केल्यानंतरच कोणतीही प्रतिक्रिया देण्यात येईल, अशी भूमिका भाजपाने घेतली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती या नेत्यांविषयी आम्हाला अतिशय आदर आहे, असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
दोषींना शिक्षा व्हायलाच हवी : कॉंगे्रस
बाबरी मशिदीचा विध्वंस करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी कॉंगे्रसने केली. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. आता कायद्याच्या चौकटीत या सर्व आरोपींना आवश्यक ती शिक्षा व्हावी, असे कॉंगे्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. या देशातील कायदा सर्वांसाठी समान आहे, असेही ते म्हणाले.