तेज बहादूर बीएसएफमधून बडतर्फ

0
76

नवी दिल्ली, १९ एप्रिल 
निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून देशभरात खळबळ निर्माण करणारे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे जवान तेज बहादूर यांना आज बुधवारी बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तेज बहादूर दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
जवानांना अधिकार्‍यांकडून निकृष्ट जेवण मिळते, अशी तक्रार करणारा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तेज बहादूर यांनी अधिकार्‍यांकडून आपला प्रचंड छळ होत असल्याचा नवा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. बीएसएफने तेज बहादूर यांचे आरोप चुकीचे असल्याचा दावा केला. खोटी तक्रार करून बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप तेज बहादूर यांच्यावर ठेवण्यात आला आणि या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले. यात तेज बहादूर यांच्या युनिटमधील सर्व जवानांची चौकशी झाली असता, कोणीही निकृष्ट जेवण दिले जात असल्याची तक्रार केली नाही.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर तेज बहादूर यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून बीएसएफची बदनामी आणि प्रतिष्ठा मलिन केली असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवून बीएसएफने त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याचा आदेश दिला.  (वृत्तसंस्था)