अजानबद्दलच्या ट्विटनंतर सोनू निगमची माफी

0
139

– मंदिरे व गुरुद्वारांविषयीही बोललो होतो
– विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप
मुंबई, १९ एप्रिल 
‘‘मी मुस्लिमविरोधी नाही. फक्त अजानबाबत बोललो नव्हतो तर मंदिरे, गुरुद्वारांच्या लाऊडस्पीकरबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा’, असे म्हणत गायक सोनू निगमने अजानप्रकरणी माफी मागितली.
‘मी मुस्लिम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावे लागते. भारतातील ही धार्मिक जबरदस्ती कधी संपेल, असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता.
सोनू निगमच्या या ट्विटनंतर मुस्लिम कट्टरतावाद्यांनी त्याच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यानंतर आज त्याने पत्रपरिषद घेऊन आपली बाजू मांडली.
अजानबद्दलच्या ट्विटनंतर सोनू निगमला एका मौलानाने टक्कल करून फिरवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सोनू स्वत: आपल्या डोक्यावरचे केस कापून माध्यमांसमोर हजर झाला.
सोनू पुढे म्हणाला, ‘मी एका सामाजिक प्रश्‍नाबद्दल बोललो, धार्मिक नाही. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. मी मोहम्मद रफी यांना वडील मानले आहे. माझा वाहनचालक मुस्लिम आहे. जे लोक मला मुस्लिमविरोधी समजतात तो माझा नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे.’
लाऊडस्पीकर ही धार्मिक गरज नाही. माझ्या मते, लाऊडस्पीकर गुंडगिरी आहे. धर्माच्या नावावर लोक दारू पिऊन नाचतात ही गुंडगिरीच आहे. मी स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतो. माझी चूक असेल तर मला माफ करा.
मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे. तसा तुम्हालाही माझे मत नाकारण्याचा अधिकार आहे. ट्विटरवर कमी शब्दात लिहावे लागते. त्यामुळेच मी मोहम्मद साहेब लिहिले नाही, असे सोनूने स्पष्ट केले. मंदिरात आरती गरजेची आहे, लाऊडस्पीकरची नाही. मी पहिले देशाचा नागरिक आहे, त्यानंतर कलाकार आहे. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असा आरोपही सोनू निगमने केला.
सोनू निगमचे जो मुंडन करेल त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस, बंगालच्या एका मौलवीने जाहीर केले होते. म्हणून सोनू निगम मुंडन करून पत्रपरिषदेत हजर झाला. आता मौलवींनी १० लाख तयार ठेवावे, असे आव्हान त्याने दिले.
(वृत्तसंस्था)