सायरा बानो, विक्रम गोखले यांना जीवनगौरव

0
120

– जॅकी श्रॉफ, अरुण नलावडेही सन्मानित
– राज्य शासनाच्या पुरस्कारांची घोषणा
मुंबई, १९ एप्रिल 
महाराष्ट्र सरकारतर्फे प्रत्येक वर्षी दिला जाणार्‍या राजकपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची आज बुधवारी घोषणा करण्यात आली. यावर्षीचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी आपले आयुष्य वेचले व अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडली, अशा ज्येष्ठ व्यक्तींना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, तसेच राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विक्रम गोखले आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर करण्यात आला.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारांची घोषणा केली.
चेहर्‍यावरील हावभाव, डोळ्यांतून व्यक्त होणार्‍या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक शैली यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून विक्रम गोखले यांचा नावलौकिक आहे. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार, तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व होते.
५० वर्षे अभिनय क्षेत्रात योगदान देणारे विक्रम गोखले यांनी समाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला आहे. मिशन-११, समर २००७, हे राम, मुक्ता, हम दिल दे चुके सनम, बलवान, अग्निपथ, परवाना यासह ९० पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी आपल्या कसदार अभिनयातून भूमिकांना न्याय दिला आहे.
अरुण नलावडे हे मराठी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन मालिका या तिन्ही माध्यमातून अतिशय सकसपणे भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते आहेत. २००३ मध्ये त्यांच्या श्‍वास चित्रपटाने मराठी चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळवून दिले. वारसा, ताटवा या चित्रपटांचे दिग्दर्शन करीत त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक विषय हाताळण्यास विशेष महत्त्व दिले.हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपल्या अदाकारीने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सायरा बानो होय. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी हिंदी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९६१ मध्ये शम्मी कपूर यांच्यासोबत जंगली चित्रपटातून कारकीर्द प्रारंभ केली. या चित्रपटासाठी सायरा बानू यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९६० ते ७० च्या दशकातील अतिशय यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द रसिकांच्या विशेष स्मरणात राहिली. महाविद्यालयात असतानाच जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. देवानंद दिग्दर्शित स्वामी दादा या चित्रपटात खलनायक म्हणून कारकीर्द प्रारंभ केल्यानंतर सुभाष घई निर्मित हिरो चित्रपटाच्या यशाने जॅकी श्रॉफ खर्‍या अर्थाने स्टार झाले. जॅकी श्रॉफ यांच्या वाटचालीतील तेरी मेहरबानिया, अंदर-बाहर, रिर्टन ऑफ ज्वेल थिफ, काश, राम लखन, कर्मा या महत्त्वाच्या चित्रपटातून त्यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या.(वृत्तसंस्था)