त्यागाचा आरंभ अनासक्ती!

0
113

शतश्‍लोकी
शक्त्या निर्मोकत: स्वाब्दहिरहिरिव य: प्रव्रजन्स्वीयगेहात्‌| छायां मार्गद्रुमोत्थां पथिक इव मनाक्संश्रयेद्देहसंस्थाम्‌| क्षुत्पर्याप्तं तरुभ्य: पतितफलमयं प्रार्थयेद्भैक्षमन्नं| स्वात्मारामं प्रवेषुं स खलु सुखमय प्रजजेद्देहतोऽपि॥
आपल्या शक्तीच्या आधारे जसा साप कात टाकून बाहेर पडतो तसा जो स्वत:च्या घरातून बाहेर पडतो. वाटसरूने मार्गातील झाडाचा आश्रय घ्यावा त्याप्रमाणे जो देहाचा आश्रय घेतो, भुकेच्या शमनार्थ जो झाडावरून (गळून) पडलेल्या फळांचीच भिक्षा म्हणून अपेक्षा करतो तोच देहातूनही मुक्त झालेला (वैराग्यशाली) स्वात्मारामात सुखाने प्रवेश करण्याकरिता (खरोखरच सुयोग्य समजावा.)
अंतरी वैराग्य जागा झालेला साधक कसा जगतो त्याच्या वर्तनाची आचार्यश्रींनी येथे सुंदर मांडणी केली आहे. असा वैराग्यशाली सर्वप्रथम आपल्या शक्तीने घराचा त्याग करतो. या त्यागाकरिता आचार्यश्रींनी दिलेला दृष्टान्त आहे सर्पाच्या कात टाकण्याचा.
सर्प हा कातीसहच जगतो. अन्य समयी त्याची कात त्याच्या शरीराचाच भाग असते. मात्र तो जसजसा त्याच्या परिपक्वतेला येतो तसा तसा त्या कातेच्या त्यागाचा आरंभ करतो. ती कात त्याच्यासाठी त्याज्यच विषय ठरतो. तद्वत वैराग्यशालीसाठी हा देह त्याज्य विषय ठरतो. अर्थात सापाच्या कातेप्रमाणे याला असा दृश्य त्याग संभव नाही. मात्र सापासाठी कातीचे जे मूल्य असते तेच अशा वैराग्यशालीकरिता या देहाचेच असते एवढाच विचार महत्त्वाचा आहे.
साप जसा कातीचा त्याग करतो आणि मग त्या त्यजित बाबीची त्याला कसलीच अपेक्षा नसते त्याप्रमाणे वैराग्यशाली साधकाकरिता त्याच्या देहासक्तीच्या त्यागानंतर त्याची त्याच्या देहाप्रतीची भावना अशीच असते.
साप जेव्हा कात टाकतो त्या वेळी जणू त्याचा नवीन जन्म होतो. बरे या कातीचा त्याग केला म्हणून त्याच्या बाहेरून दिसण्यात काहीच फरक पडत नाही. अगदी हीच अवस्था वैराग्यशालीच्या देहासक्ती त्यागाची असते. या त्यागानंतर त्याचाही जणू नवीन जन्म झालेला असतो. संन्यास ग्रहणानंतर त्या साधकाला अन्य नावानेच संबोधिले जाणे याच स्वरूपातील नूतन जन्माचे प्रतीक आहे. अशा संन्यास स्वीकृतीनंतर, मानसिक देहासक्ती त्यागानंतर अशा संन्याशाच्या बाहेरून दिसण्यात कोणताच फरक वाटत नाही.
कारण हा फरक बाहेरून दिसणारा नसतोच. उलट बाहेरून तर त्या सापाची जशी तकाकी वाढते, चपलता वाढते तशी त्या देहासक्ताची कृतिशीलता अधिकच वाढते. साप जसा अधिक सुंदर दिसतो तसा तो साधकही अधिक प्रसन्न, समाधानी दिसतो. कारण आता त्याच्या कृतीला अपेक्षांची मलिनता उरलेली नसते.
असा साधक देहाच्या आश्रयाने राहात असला तरी त्याचे हे राहणे कसे आहे, हे सांगताना आचार्यश्रींनी पथिकाचा दुसरा दृष्टान्त दिला आहे.
एखादा पथिक म्हणजे वाटसरू मार्गाने जात असतो. जाताना रस्त्यात त्याला उन्हाचा त्रास होतो व थकवा येतो. अशा वेळी तो मार्गात दिसेल त्या झाडाचा आश्रय घेतो. थोडे बरे वाटले, ऊन ओसरले की पुढील प्रवासाला लागतो. अनेकदा तर ते झाड कशाचे होते हेही तो पाहात नाही. मग त्या झाडावर जीव लावणे तर फारच दूरची गोष्ट. अगदी त्याच स्वरूपात वैराग्यधारी साधक देहाकडे पाहात असतो. प्रारब्धरूप प्रवासातील हा एक टप्पा आहे एवढीच भूमिका. जसे पांथस्याचे ध्येय वेगळेच असते तशी वैराग्यशालीची अवस्था असते.
अर्थात देह आहे तोवर भूकही लागणारच. मग अन्न ग्रहणाचे काय? तर आचार्यश्री म्हणतात, तो झाडाने सोडलेली पळेच खातो. यात दोन मजेदार विषय आहेत. एक तर झाडाने सोडलेली फळे हा झाडाचा त्याग आहे. या त्यागीला त्या त्यागीच्या त्यागाचाच स्वीकार करावा वाटतो. दुसरी बाब म्हणजे आपल्या उदरनिर्वाहार्थ झाडाची फळेसुद्धा तो तोडत नाही. त्या तोडण्याचा वृक्षाला त्रास होणारच. आपल्यामुळे अगदी वृक्षालाही इतकाही त्रास नको ही त्याची वृत्ती अतिचिंतनीय आहे. झाडाचे फळ पूर्ण पक्व होते तेव्हा झाड फळ सोडते. सोडण्यात त्रास नाही. तोडण्यात आहे. सोडणे पूर्णत्वाचे, परिपक्वतेचे प्रतीक आहे. अंतरी वैराग्यपक्व झालेल्या साधकाला फळांचीही अशीच पक्वता आवडली तर त्यात आश्‍चर्य ते कोणते?
असा विवेक-वैराग्यसंपन्न साधकच सुखनैव आत्मारामात, आत्मानंदात प्रवेश करण्यास सुयोग्य होतो. वेगळ्या शब्दात अशा विवेक-वैराग्यविरहित दशेत प्रवेश केलाच या प्रांतात तर तो सुखकारक ठरत नाही. मन पुन्हा मागे ओढते. कारण काम, क्रोध आणि लोभ शेष असतात. कसे असतात ते? आचार्यश्री आगामी श्‍लोकात वर्णितात
– प्रा. स्वानंद गजानन पुंड