क्रीडा विकास विधेयक

0
73

वेध
कोणत्याही देशाची शक्ती किंवा क्षमता ओळखायची असेल तर ती त्या देशातील खेळाच्या कामगिरीवरूनच ओळखता येऊ शकते. आज जे देश महासत्ता किंवा महाशक्तिशाली म्हणून ओळखले जातात त्या देशांची विविध खेळांप्रमाणेच वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांमधील कामगिरीही जबरदस्त असते. आज रशिया, अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या महाशक्तिशाली समजल्या जाणार्‍या देशांनी विविध खेळांच्या स्पर्धांप्रमाणेच आशियाड आणि ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांवरही नुसतेच वर्चस्व गाजविले नसून ते कायम राखले आहे. या देशांचा क्रम पदकतालिकेत नेहमीच अव्वल पाचमध्ये राहिलेला आहे. ही कामगिरी मात्र आजपर्यंत भारताला करता आलेली नाही. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून खेळाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ऑलिम्पिक खेळाडूंच्या तयारीच्या दृष्टीने एक अभिनव योजनाही आणण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंना त्या योजनेचा लाभही झाला. मात्र, परिणाम पाहिजे तसे समोर आले नाहीत. कदाचित भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात आलेले राष्ट्रीय क्रीडा विकास विधेयक अजूनही प्रलंबित आहे. हे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात सादर केले जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी जाहीर केले आहे. हे विधेयक लागू करण्यात आल्यानंतर खेळाच्या राष्ट्रीय संघटनांना म्हणजेच महासंघांना केंद्र सरकारकडून काहीही मिळणार नाही. क्रीडा मंत्रालयातर्फे हे विधेयक तयार केले जात आहे. त्या आल्यानंतर आधी हे विधेयक मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवले जाईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. महासंघांच्या पदावर राजकीय व्यक्ती असावी की नसावी, हाही एक चर्चेचा विषय असला तरी गोयल यांच्या मते अशी व्यक्ती जर पारदर्शी असेल व तिच्या विरोधात कोणतेही मोठे गुन्हे नसेल तर त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा निश्‍चितच अधिकार आहे. एकदा का हे विधेयक सभागृहात पारित झाले तर सर्व महासंघांना आणि राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला त्याचे पालन करावेच लागणार आहे. नाही तर केंद्र सरकारच्या मदतीला मुकावे लागेल. केंद्र सरकार एका संरक्षकाच्या भूमिकेत असून, जबाबदारी महासंघांचीच राहणार आहे आणि ती त्यांनी स्वीकारायलाही हवी, असे गोयल यांचे मत आहे. क्रीडा विकासाच्या दृष्टीने सरकारतर्फे टाकण्यात येत असलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

बॅडमिंटनला ‘अच्छे दिन’
भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात गेला रविवार दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर जरी भारतीय खेळाडूंनी अजूनपर्यंत सोनेरी कामगिरी केली नसली तरी नुकत्याच पार पडलेल्या सिंगापूर खुल्या सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा दोन भारतीय बॅडमिंटनपटूंनी धडक दिली होती. हीच भारतीय बॅडमिंटनसाठी रविवारीची मोठी उपलब्धी ठरली. बी. साई प्रणिथ आणि किदाम्बी श्रीकांत हे दोन भारतीय खेळाडू यंदाच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जेव्हा दाखल झाले तेव्हाच भारताने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. दोन्ही भारतीय खेळाडूंमधील अंतिम सामनाही चांगलाच रंगला. या अंतिम लढतीचा निर्णय तीन सेट्‌सच्या संघर्षानंतर लागला आणि अखेर बी. साई प्रणिथ याने १७-२१, २१-१७, २१-१२ अशी बाजी मारली. जागतिक क्रमवारीत साईला ३० वे तर श्रीकांतला २९ वे मानांकन आहे. अशा परिस्थितीत श्रीकांत बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, साईने पहिला सेट गमावल्यानंतरही उर्वरित दोन सेटमध्ये संयम न गमावता खेळ केला आणि दोन्ही सेट्‌ससह विजेतेपदही खेचून आणले. कोणत्याही सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठून जेतेपद पटकाविण्याची साईची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एकाच देशाच्या दोन स्पर्धकांमध्ये अंतिम सामना खेळला जाण्याची स्पर्धेच्या इतिहासातील ही चौथी घटना ठरली. याआधी चीन, इंडोनेशिया व डेन्मार्कच्या खेळाडूंनी अशी कामगिरी बजावलेली आहे.
या स्पर्धेतील एक दुर्दैवी घटना म्हणजे ज्या पी. व्ही. सिंधूचा झालेला पराभव. कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मारिन हिला नमवून भारतात स्पर्धा जिंकल्यानंतर सिंगापूरला मोठ्या उत्साहात दाखल झालेल्या सिंधूचे आव्हान कॅरोलिनाने तिसर्‍याच फेरीत मोडून काढले. सिंगापूरचा अंतिम सामना खेळला जाण्याआधी काही तासांपूर्वी आणखी एका उदयोन्मुख बॅडमिंटनपटूने भारताचा झेंडा जकार्तात गाडला होता. या खेळाडूचे नाव आहे गायत्री गोपीचंद. दक्षिण जकार्तामध्ये झालेली २०१७ ची इंटरनॅशनल ज्युनियर ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धा भारतीय मुलींनी गाजविली. १५ वर्षाखालील गटात गायत्री गोपीचंद हिने जेतेपदासह सुवर्णपदक पटकाविले, तर सामिया फारुकी व कविप्रिया सेल्वम या भारतीय खेळाडू अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाच्या मानकरी ठरल्या. गायत्री ही एकेकाळचे दिग्गज बॅडमिंटनपटू आणि विद्यमान भारतीय बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांची कन्या आहे. अंतिम सामन्यात गायत्रीने आपल्या देशाच्या सामिया फारुकी हिला पराभूत केले. नंतर गायत्रीने सामियाच्या सहकार्याने दुहेरीचाही अंतिम सामना जिंकला. कविप्रिया व मेघना रेड्डी या महिला दुहेरीत विजेत्या ठरल्या. एकूणच कामगिरी पाहता भारतीय बॅडमिंटनला ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३