राहुल गांधी, केजरीवाल यांना शहाणपण कधी येणार?

0
115

दिल्लीचे वार्तापत्र
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला मिळालेले तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत हे विरोधी पक्ष अद्यापही पचवू शकले नाही. त्यामुळेच ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपाने हे यश मिळवल्याचा कांगावा हे विरोधी पक्ष करत आहेत. यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत.
••भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची द्विदिवसीय बैठक नुकतीच ओडिशाची राजधानी भुवनेश्‍वर येथे पार पडली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दर तीन महिन्यांनी नियमित बैठक घेणारा भाजपा हा एकमेव पक्ष असावा.
देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे काही ठरावही पारित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या बैठकीतून कार्यकर्त्यांना नवीन दिशा आणि कार्यक्रम दिला, त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या झटक्यातून देशातील समस्त विरोधी पक्ष अद्यापही सावरले नसल्याचे अजूनही दिसून येत आहे. आपला पराभव हा देशातील मतदारांनी नाही तर ईव्हीएमने केला असल्याचा समज या विरोधी पक्षांनी स्वत:च्या सोयीसाठी करून घेतला आहे. त्यामुळे आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये अहमहमिका लागली आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला मिळालेले तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत हे विरोधी पक्ष अद्यापही पचवू शकले नाही. त्यामुळेच ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपाने हे यश मिळवल्याचा कांगावा हे विरोधी पक्ष करत आहेत. यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असलेल्या केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये कशी छेडछाड करता येते हे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हानही दिले आहे. आपल्या लोकविरोधी धोरणांमुळे, भ्रष्टाचारामुळे तसेच अक्षम्य निष्क्रियतेमुळे देशातील मतदारांनी आपल्याला नाकारले, ही वस्तुस्थिती मान्य करण्याची कोणत्याच विरोधी पक्षाची तयारी नाही. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा समोर करून भाजपावर आगपाखड केली जात आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर विरोधकांच्या संयुक्त शिष्टमंडळाने कॉंग्रेसच्या नेतृत्वात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेत त्यांच्याकडे ईव्हीएम मशीनबाबत आपले गार्‍हाणे मांडले होते. याच मुद्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाचीही भेट घेतली होती. ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप आयोगाने फेटाळून लावला होता. ईव्हीएमची उत्पादक कंपनीही ईव्हीएममध्ये छेडछाड करू शकत नसल्याचा निर्वाळा आयोगाने दिला आहे. तरीसुद्धा विरोधकांचे समाधान झाले नाही आणि ते होणारही नाही. कारण विरोधकांनी स्वत:च्या सोयीसाठी तसा समज करून घेतला आहे. झोपलेल्याला जागे करणे सोपे असते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीण असते, असे म्हणतात. तशीच गत विरोधकांची झाली आहे. आपल्या पराभवाचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा ईव्हीएमवर त्याचे खापर फोडणे सोपे असल्याचे या स्तंभात याआधीही एकदा म्हटले होते.
विरोधकांनी या मुद्यावरून न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या मुद्यावर निवडणूक आयोग तसेच केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. त्याचे उत्तर केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोग देईलच. मात्र तत्पूर्वीच ईव्हीएममध्ये छेडछाड करून दाखवण्याचे खुले आव्हान निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि संघटनांना दिले आहे. या आव्हानाचा स्वीकार याच मुद्यावर वारंवार डरकाळी फोडणार्‍या केजरीवाल यांच्यासह देशातील एकाही राजकीय पक्षाने केला नाही. कारण ईव्हीएममध्ये छेडछाड करता येत नाही, याची असा आरोप करणार्‍यांनाही खात्री आहे.
त्यांना फक्त या मुद्यावरून देशातील जनतेची दिशाभूल करायची आहे आणि निवडणूक आयोगाविरुद्ध संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे आहे. आयोगाची देशात आणि जगात बदनामी करायची आहे. याच मुद्याकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भुवनेश्‍वर येथील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन करताना लक्ष वेधले आहे. ईव्हीएमवर शंका घेणे म्हणजे निवडणूक आयोगाचा अवमान करण्यासारखे आहे, असे अमित शाह या बैठकीत म्हणाले. ते शंभर टक्के बरोबर आहे.
ईव्हीएममध्ये छेडछाड करता आली असती तर भाजपा-अकाली दलाचा पंजाबमध्ये पराभव झाला नसता. पंजाबमध्ये कॉंग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने पंजाबमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यामुळे त्याला बहुमत मिळाले, असा आरोप करायचा का? कॉंग्रेस त्याची वाट पाहात आहे का? गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाने राजकीय चपळाई दाखवत सरकार स्थापन केले असले तरी त्या ठिकाणी कॉंग्रेसने भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत, त्या ठिकाणीही कॉंग्रेसने ईव्हीएमध्ये छेडछाड करत भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्या का? भारतात कॉम्प्युटर आणण्याचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आहे. आज देशात संगणकीय क्रांतीचा तसेच त्याच्या सर्व क्षेत्रातील फायद्याचा अनुभव देशातील जनता घेत आहे. देशाला अत्याधुनिक युगात नेण्याचे स्वप्न पाहणार्‍या राजीव गांधी यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष राहुल गांधी भारताला पुन्हा बैलगाडीच्या युगात नेण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच निवडणुकांत ईव्हीएमचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिकांचा उपयोग करण्याची मागणी कॉंग्रेस करत आहे. नेता हा कधीही दूरदृष्टीचा, देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेणारा हवा असतो. राहुल गांधी यांची वागणूक ही दूरदृष्टीची नाही तर लघुदृष्टीची आणि बालबुद्धीची असल्याचे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येत आहे. देशातील जनता मोदींच्या नेतृत्वावर भरभरून प्रेम करत असताना, त्यांना सढळ हाताने कौल देत असताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसला का नाकारत आहे, याचे उत्तर त्यांच्या वागणुकीतूनच दिसून येत आहे. कोणत्याही नेत्याने आपल्या पक्षाच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. आत्मपरीक्षणातूनच पराभवाच्या कारणांचा बोध होत असतो आणि त्यातून आपल्या चुका दुरुस्त करत पुढचा मार्ग काढता येत असतो. आपल्या पराभवाच्या कारणाचे ईव्हीएमवर खापर फोडण्यातून राजकीय नेत्यांना तात्कालिक समाधान निश्‍चित मिळत असले तरी त्यातून ते स्वत:चे आणि आपल्या पक्षाचे दीर्घकालीन नुकसान करून घेत असतात. कारण यातून ते देशातील जनतेच्या मनातूनही उतरत असतात. लोकांनी दुसर्‍या पक्षाला दिलेल्या जनादेशाचा यातून अपमान होत असतो. आपल्या जनादेशाचा अपमान कोणत्याही देशातील जनता कधीच खपवून घेत नाही. दुसर्‍या पक्षाला दिलेल्या जनादेशातून ज्याच्याविरुद्ध जनादेश देण्यात आला आहे, त्या पक्षाने धडा घ्यावा, आपल्या वागणुकीत सुधारणा करावी, लोकहिताच्या धोरणांचा पुन्हा स्वीकार करावा, अशी जनतेची अपेक्षा असते. या दृष्टीने कोणत्याची राजकीय पक्षाने आपल्या वागणुकीत सुधारणा केल्या तर दुसर्‍या निवडणुकीत जनता त्याचा पुन्हा स्वीकार करते,
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७