अझलन शाह स्पर्धेत बचाव निर्णायक ठरेल : रुपिंदर

0
89

बंगळुरू, १९ एप्रिल 
सुलतान अझलन शाह स्पर्धेला सुरवात होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी बाकी असताना भारतीय संघातील प्रमुख ड्रॅॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंग याने संघातील नवोदित खेळाडू आव्हान पेलण्यास सज्ज झाले असून, भक्कम बचाव अझलन शाह स्पर्धेत निर्णायक ठरू शकतो, असे मत येथे व्यक्त केले.
स्पर्धेत मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड आणि जपान या अन्य देशांचा सहभाग आहे. रुपिंदर म्हणाला, स्पर्धेपूर्वी झालेल्या ४० दिवसांच्या सराव शिबिरात प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील भारतीय खेळाडू तंदुरुस्त आहेत. संघाला नव्याने ऍनालिटिकल प्रशिक्षक मिळाल्याने नियोजनात थोड बदल करण्यात आला आहे. बचावावर अधिक भर देण्यात आला असून, हे नियोजन शंभर टक्के मैदानात उतरले तर आम्हाला सामने जिंकण्यास त्याचा फायदाच होईल.
स्पर्धेस मलेशियात इपोह येथे २९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून, भारतीय संघ मलेशियासाठी २२ एप्रिलला रवाना होणार आहे. हरमनप्रीत, गुरिंदर, प्रदीर मोर आणि सुरेंदर कुमार या नवोदित खेळाडूंसह अनुभवी रूपिंदरवर भारतीय बचावाची खरी मदार आहे. रूपिंदरने देखील हे मान्य केले. तो म्हणाला, नक्कीच माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. मला संघातील युवा खेळाडूंना देखील दिशा द्यायची आहे. पण, त्यांची तयारी पूर्ण असल्याची मला खात्री आहे. आपल्याला कशी कामगिरी करायची आहे आणि जबाबदारी काय आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून शंभर टक्के योगदान अपेक्षित आहे.(वृत्तसंस्था)