क्रीडा विधेयक पावसाळी अधिवेशनात : गोयल

0
131

नवी दिल्ली, १९ एप्रिल 
विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी व त्यांच्या कारभारात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने राष्ट्रीय क्रीडा नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. त्याला आगामी पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले.
गोयल पुढे म्हणाले, क्रीडा संघटनांनी नियमावलींचे पालन केले नाही तर त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मागण्याचा अधिकार नाही. ही नियमावली तयार करण्यासाठी नऊ सदस्यांची शासकीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सर्व खेळांचा बारकाईने अभ्यास केला आहे व संबंधित सर्व घटकांशी सविस्तर चर्चाही केली आहे. त्यांच्याकडून लवकरच याबाबत अहवाल मिळणार आहे. या अहवालानंतर मसुद्याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल.
कोणत्याही खेळांच्या संघटनांच्या विविध पदांवर राजकीय नेत्यांनी काम करण्यास माझा व्यक्तिश: विरोध नाही असे सांगून गोयल म्हणाले, जेव्हा भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) विविध आरोपांखाली तुरुंगवास भोगलेल्या दोन क्रीडा संघटकांना आजीव अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला होता, तेव्हा आम्ही तत्परतेने त्यास विरोध करीत त्यांची ही नियुक्ती रद्द केली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आयओए व अन्य क्रीडा संघटनांना स्वायत्तता असण्यास आमचा विरोध नाही. मात्र आयओए व अन्य राष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या कारभारात पारदर्शकता पाहिजे व कोणत्याही कृतीचे या संस्थांनी उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे असे आमचे मत आहे.
तिरंदाजी व बास्केटबॉल या खेळांच्या राष्ट्रीय संघटनांबाबत निर्माण झालेली समस्याही लवकरच दूर केली जाईल. पदाधिकार्‍यांची वयोमर्यादा व मतदानाचे अधिकार हे दोन महत्त्वाचे मुद्दे विविध क्रीडा संघटनांना त्रासदायक वाटत आहेत. मात्र हे मुद्दे संघटनेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे गोयल यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)