योगींच्या महाविद्यालयात मुस्लिम मुख्याधापक

0
120

लखनौ, १९ एप्रिल 
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमध्ये उभारण्यात आलेल्या महाविद्यालयात मुस्लिम मुख्याध्यापकाची नियुक्ती केली आहे. आफताब अहमद असे त्यांचे नाव असून, ते २०१४ पासून कार्यरत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी १९९९ मध्ये पौडी जिल्ह्यात महायोगी गुरु गोरखनाथ महाविद्यालयाची निर्मिती केली होती. उत्तराखंडमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये या कॉलेजचा समावेश करण्यात आला.
या संदर्भात आफताब अहमद यांनी सांगितले की, आमच्या संस्थेत जात, धर्म, रंगाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जात नाही. एकूण १५० विद्यार्थी शिकत असून, यात मुलींची संख्या जास्त आहे.२००५ रोजी कॉलेजचा एचएनबी गढवाल महाविद्यालयामध्ये समावेश करण्यात आला. कॉलेजात देशभरातील उत्तम शिक्षक शिकवतात. आफताब अहमद यांच्या कार्यालयात स्वातंत्र्य सैनिकांपासून ते हिंदू देवी-देवतांपर्यंत सर्वांचेच छायाचित्र आहेत. तरुणांना माणुसकी आणि सहिष्णुतेचे धडे देणे हा आमचा मुख्य उद्धेश आहे, असे आफताब यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
आता ‘मेक इन युपी’
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर आता ‘मेक इन युपी’ अभियान राबविण्याचे निश्‍चित केले आहे. याबाबत त्यांनी अधिकार्‍यांना नवे आर्थिक धोरण तयार करण्याची सूचना केली आहे.
अवसायानात गेलेल्या वा गुंतवणुकदारांचे पैसे अडवून बसलेल्या उद्योगांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशा उद्योगांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. डिफॉल्टर ठरलेल्या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. याशिवाय राज्यात जास्तीत जास्त बँकिंग सेवा निर्माण करण्याविषयी संबंधित विभागाला सूचित केले आहे. तसेच, नवे बँक अकाऊंट तयार करण्याबाबत मोहिम राबविण्यासही सांगितले आहे. राज्यातील १२ लाख पेन्शनर्सबाबत ते म्हणाले की, डिजिटल लाईफ प्रमाणपत्र आधारशी जोडण्यात येऊन दर महिन्याच्या एक तारखेला पेन्शन संबंधितांच्या बँक खात्यात पोहोचणे आवश्यक असून, त्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. याशिवाय अनुसूचित जाती-जमातींंना कर्ज वितरण आणि महिला सबलीकरणासाठी आर्थिक साहाय्य देण्यावर त्यांनी भर दिला.