चंद्रपुरात ५७ टक्के मतदान

0
104

तिन्ही महानगरपालिकांतील मतदान शांततेत
मुंबई, १९ एप्रिल 
चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान शांततेत पार पडले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५७ टक्के, परभणीत ७० टक्के तर लातूरमध्ये ६० टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली.
त्याचबरोबर अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ४७.५७ टक्के, तर आकोट पंचायत समितीच्या कुटासा मतदार संघात ५०.१८ टक्के मतदान झाले.
चंद्रपूर, परभणी, लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०१ जागांसाठी १ हजार २८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणी शुक्रवारी २१ एप्रिल रोजी होणार आहे.
लातूर महानगरपालिकेत ७० जागा, परभणी महानगरपालिकेत ६५, तर चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ जागांसाठी मतदान झाले.
तिन्ही महापालिकेत एकूण १२५ उमेदवार कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे, तर ६४ उमेदवारांची गुन्हेगारी पृष्ठभूमी आहे. विशेष म्हणजे, १ हजार २८४ उमेदवारांपैकी एकूण ८०६ उमेदवार अल्पशिक्षित असल्याचे समजते.
या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने ४४, कॉंग्रेसने ३१, राष्ट्रवादी कॉंग्रेसने १९, शिवसेनेने १५ कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण ५० लाखांच्या संपत्तीचा मालक आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई, पुण्यासह दहा महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याची जनतेला उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)