केंद्रीय विद्यालयात दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य

0
91

नवी दिल्ली, १९ एप्रिल 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी निगडीत शाळा आणि केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य होण्याचे संकेत आहेत. या संदर्भातील संसदीय समितीच्या शिफारशींना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाला हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारबरोबर चर्चा करून एक नीती बनवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राष्ट्रपतींच्या आदेशात म्हटले आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाला अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी गंभीर प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी पहिले पाऊल म्हणून सीबीएसई आणि केंद्रीय विद्यालयांना दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य केला पाहिजे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक नीती बनवली पाहिजे, अशा प्रकारच्या शिफराशी राजभाषा बाबतच्या संसदीय समितीच्या सन २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या नवव्या अहवालात म्हटले आहे.
सीबीएसईने मागील वर्षी तीन भाषांचे सूत्र अवलंबले होते. यात इंग्रजी आणि दोन इतर भारतीय भाषा नववी आणि दहावीसाठी लागू करण्याची शिफारस केली होती. मात्र, अद्याप मंत्रालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
आजच्या घडीला देशात सीबीएसईच्या १८ हजार ५४६ शाळा, तर केंद्रीय विद्यालयांची संख्या एक हजार ११७ इतकी आहे. (वृत्तसंस्था)