सायकलयात्री ललित जोशी यांचा सत्कार

0
88

-अकराशे किमीची यात्रा पूर्ण करून परतले
धारणी, १९ एप्रिल
आकाशात सूर्याने धूम माजविलेली असताना वयाच्या ६२ व्या वर्षात ११०० किमीचा सायकलनने प्रवास करून मंगळवार, १८ रोजी परतलेले ललित जोशी यांचा येथे भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.
या साहसी उपक्रमासाठी योगामुळे शरीराला आणि मनाला शक्ती तथा प्रेरणा प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
बेटी बचाव, स्वच्छ भारत अभियान आणि करो योग-रहो निरोग या अभियानाच्या प्रचार, प्रसारासाठी ललित जोशी यांनी तापणार्‍या उन्हात गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशाची ११०० किमीपेक्षा जास्त सायकल यात्रा करून खेड्यापाड्यासह अहमदाबाद, आणंद, विद्यानगर, अलीराजपूर, बासवाडासह मार्गातील गावात शेतकर्‍यांसोबत चर्चा करून त्यांना प्रेरित केले.
धारणीत परतल्यावर ज्येष्ठ नेते नानासाहेब भिसे, रसिक पटेल, डॉ. पटेल, रवी नवलाखे, डॉ. मजित सौदागर, पंकज मोरे, क्षमा चौकसे, कन्हैयालाल परिहार, गुरू खंडारे, रतनलाल परिहार, मदन गंगराडे यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
शहराच्या सीमेपासून जोशी यांना एका रॅलीने सभास्थळापर्यंत आणण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना ललित जोशी म्हणाले, आपल्या धर्माप्रमाणे तीन ऋण फेडल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही आणि म्हणून मी माझ्या जीवनात तसे प्रयत्न करीत असतो. ऋषी ऋण फेडण्याचे म्हणजे समाजातील कुप्रथांना नष्ट करून विज्ञानावर आधारित परंपरा कायम ठेवणे व युवकांमध्ये त्याची आवड निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. स्वच्छ भारत आणि योग या दोन अभियानाला धारणीत राबविण्याची विनंती त्यांनी युवकांना केली. कार्यक्रमाचे संचालन श्याम गंगराडे तर आभार प्रदर्शन उमेश नवलाखे यांनी केले. (तभा वृत्तसेवा)