स्वाईन फ्लूचा प्रकोप; १३ रुग्ण दगावले

0
49

– बुधवारी आणखी एकाचा मृत्यू
-४४ पैकी ४१ रुग्ण पॉझिटिव्ह
-काळजी घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
नागपूर, १९ एप्रिल
उपराजधानीतील ४५ अंशाच्या तापमानातही स्वाईन फ्लू आजाराचा प्रकोप वाढला असून ४४ पैकी ४१ रुग्णांचे रक्त नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मार्च ते एप्रिल या दीड महिन्यात तब्बल १३ रुग्ण या आजाराने दगावले आहेत. आज बुधवारीही एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज पत्रपरिषदेत केले आहे.
स्वाईन फ्लू आजाराविषयी अधिक माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे म्हणाले, स्वाईन फ्लू हा जीवघेणा आजार आहे. २००० साली या आजाराचे रुग्ण जगात आढळून आले. नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून स्वाईन फ्लू संदर्भात ४४ रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ४१ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या आजाराने दीड महिन्यात १३ रुग्ण दगावले. यात नागपूर शहर व जिल्ह्यातील सात तर अमरावती येथील ४ व छिंदवाडा येथील एका रुग्णांचा समावेश आहे. या आजाराची अ, ब, क अशा तीन भागात विभागणी करण्यात आली. अंग दुखणे, खोकला, ताप, घशाला खवखव, सर्दी, पडसे, डोके दुखणे ही या आजाराची लक्षणे आहेत. सर्दी, पडसे, खोकला आणि ताप असल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा. मेयो आणि मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तर इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात रक्त नमुने तपाण्याची सोय आहे. याशिवाय सर्व शासकीय तसेच इतरही रुग्णालयात स्वॅप नमुने घेवून तपासणीसाठी पाठवावे, अशा सूचना डॉ. उमेश नवाडे यांनी केल्या.
स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, मधुमेही रुग्णांना आहे. पहिल्या सात दिवसात विशेष खबरदारी घ्यावी व तपासणी करावी. स्वाईन फ्लू आजारासाठी आवश्यक असलेल्या टॅमीफ्लू हे औषध जिल्ह्यातील १९ औषधी दुकानांमध्ये उपलब्ध आहे. औषधावरील एमआरपीपेक्षा अधिक रक्कम घेतली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. स्वाईन फ्लू संदर्भात मेयो हॉस्पिटल परिसरातील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७५४२१ हा आहे. या दूरध्वनी क्रमांकावर या आजाराबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले.
या दुकानात मिळणार टॅमीफ्लू
दंगा केअर फॉर्मसी, सिपला लिमिटेड वाडी नागपूर (डेपो), कुकरेजा एजन्सी गांधीबाग नागपूर (थोक विक्रेता), नीता एजन्सी गांधीबाग नागपूर, हेटरो डर्ग्स (डेपो), अबोट व्हॅक्सिन (डेपो), किरकोळ विक्रेत्यांमध्ये कमल मेडिकल ऍण्ड जनरल स्टोर्स खामला नागपूर, श्री मेडिकल ऍण्ड जनरल स्टोर्स वर्धा रोड, बॉम्बे मेडिकोज धंतोली, म्यूर मेमोरियल हॉस्पिटल ऍण्ड जनरल स्टोर्स सीताबर्डी, तारा न्युरो धंतोली, वसंत मेडिकल स्टोर्स रामदासपेठ, बॉम्बे मडिकल स्टोर सीताबर्डी, जयअंबे मेडिकल ऍण्ड जनरल स्टोर्स जलालखेडा (नरखेड), लता मंगेशकर डिगडोह, सचिन मेडिकोज प्रतापनगर, वोक्हार्ट मेडिकल आणि जयझुले मेडिकोज या दुकानांत औषध उपलब्ध आहे.
आणखी एक बळी
– खाजगी रुग्णालयात सर्वाधिक मृत्यूची नोंद
– चार स्वाईन फ्लूबाधित अत्यवस्थ
नागपूर, १९ एप्रिल
स्वाईन फ्लूच्या मृत्युसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आता उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. तर विविध खाजगी रुग्णालयात चार जण अत्यवस्थ स्थितीत असून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. स्वाईन फ्लूच्या मृतांचा आकडा १३ वर पोचला आहे. विशेष असे की स्वाईन फ्लूच्या १३ रुग्णांपैकी ८ रुग्णांचा मृत्यू हा खाजगी रुग्णालयात झाला आहे.
पोलिस लाईन टाकळी परिसरातील रहिवासी असणार्‍या महिलेवर लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. त्यांच्यामध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी एसआरएल डायग्नोस्टिक या खाजगी लॅबमध्ये पाठविण्यात आले. दरम्यान त्यांना १८ दिवसांपासून टॅमीफ्लू गोळ्यांचा डोज देण्यात आला. आतापर्यंत स्वाईन फ्लूची लक्षणे असणार्‍या ८०० संशयितांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चालू वर्षात ५४ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात अवघ्या तीन महिन्यांत ११७ हून अधिक रुग्ण दगावले आहेत.