मनपाच्या सभेत आज पाणी पेटण्याची शक्यता

0
72

– परिवहन समितीला मिळणार सभापती

नागपूर, १९ एप्रिल
शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे आणि त्यामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. नगरसेवक बंटी शेळके गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीतही पाण्याचा मुद्दा गाजला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर उद्या महालस्थित टाऊन हॉलमध्ये होणार्‍या नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पेटले तर नवल वाटायला नको.
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर दोन सभा झाल्या आणि या दोन्ही सभांमध्ये विविध विषय समिती सदस्यांची आणि सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र, परिवहन समिती सदस्यांची व सभापतींची अजूनपर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही घोषणा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. विविध विषयांना आधी मंजुरी दिली जाणार असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून पाणी व वीज प्रश्‍नावरून सत्तापक्षाला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या विरोधी पक्ष सभागृहात विखुरलेला दिसत असला तरी प्रफुल्ल गुडधे आणि त्यांच्या समर्थकांनी याआधीच्या सभेत ज्या पद्धतीने गोंधळ घालून सभागृहाचे काम बंद पाडले होते तोच अनुभव सभागृहात उद्या पुन्हा घेता येण्याची शक्यता आहे. नगरसेवक बंटी शेळके गेल्या सहा दिवसांपासून उपोषणावर बसले आहे. पाण्याचे व्यवस्थापन पाहणारी ओसीडब्ल्यू, शहरातील काही भागात वीज मंडळाचा कारभार पाहणारे एसएनडीएल आणि कचर्‍याचे व्यवस्थापन करणारे कनक या संस्थांना हद्दपार करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. मनपा प्रशासनाच्या एकाही अधिकार्‍याने अजूनपर्यंत त्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली नसल्यामुळे हा मुद्दा विरोधी पक्षाकडून जोमाने मांडला जाण्याची शक्यता आहे. सभागृहात पाणी पेटण्याची शक्यता गृहीत धरूनच मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर नंदा जिचकार यांनी नुकत्याच विधानसभा क्षेत्रनिहाय काही भागांच्या बैठकी घेतल्या आहेत. त्यातून लोकप्रतिनिधींचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सभांमध्ये नगरसेवकांनी नागरिकांची समस्या, त्यांना येणार्‍या अडचणी मांडल्या असल्यामुळे हे मुद्दे पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेतही उपस्थित होण्याची शक्यता आहे.