टेकडी गणेश मंदिराला मिळणार नवे प्रवेशद्वार

0
97

– भाविकांच्या अडचणी होणार दूर
– सेनादलाकडून मिळाली झेंडी
नागपूर, १९ एप्रिल
नागपूर शहरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या मंदिराला लवकरच नवे प्रवेशद्वार मिळणार आहे. त्यामुळे भाविकांच्या अडचणी दूर होणार आहे. हे प्रवेशद्वार आणि मधला मार्ग हा सेनादलाच्या मालकीच्या जागेवरचा असल्यामुळे त्यांच्या परवानगीची प्रतीक्षा होती. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मध्यस्थी फळाला आली आणि सेनादलाकडूनही या नवीन मार्ग आणि प्रवेशद्वाराला हिरवी झेंडी दाखविण्यात आली असल्याची माहिती आहे.
सध्या या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे रेल्वे स्टेशनच्या मार्गावर आहे. तेथे असलेला उड्डाण पूल आणि खाली असलेल्या मार्गावरील एकमार्गी वाहतूक यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करताना अतिशय त्रास होतो. चतुर्थीला या मंदिरात जणू यात्रेचे स्वरूप येते तेव्हा त्या चिंचोळ्या रस्त्यावरच अनेक जण पार्किंग करून वाहतुकीला खोळंबा असतात. काही जण टेकडी मार्गावरच वाहने ठेवून तेथून पायी मंदिरात जातात. हा त्रास दूर करण्यासाठी नितीन गडकरी यांनी स्वत: पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तेच या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी नवीन प्रवेशद्वाराबाबतची माहिती दिली होती आणि जागेसाठी संरक्षण विभागाकडून परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले.
सुभाष पुतळ्यापासून नवीन मार्ग
मानस चौकातील सुभाष पुतळ्याजवळ हे नवे प्रवेशद्वार व मार्ग राहणार आहे. या मार्गाच्या दुतर्फा पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरील पार्किंगची समस्या काही अंशी का होईना दूर होण्यास मदत होईल. या प्रवेशद्वार आणि नवीन मार्गासाठी आपली जमीन देण्याला संरक्षण विभागाने मान्यता दिली असल्यामुळे तो मार्गही मोकळा झाला आहे. हा नवीन मार्ग २० मीटर रुंद आणि २९० मीटर लांब राहणार आहे. सुभाष पुतळा ते हनुमान मंदिरच्या मागील जमीन देण्याविषयी देवस्थान समितीने एक प्रस्ताव तयार करून तो संरक्षण विभागाकडे सादर केला होता. त्यासाठी नितीन गडकरी यांनीही शिफारस केली होती. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संरक्षण विभागाने आपली जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. देवस्थानला आम्ही जेवढी जमीन देऊ तेवढीच जमीन तेवढ्याच किमतीत आम्हाला मिळावी, असे पत्र संरक्षण विभागाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना पाठविले असल्याची माहिती आहे. या मुद्यावरून उभय पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. शासनाकडून संरक्षण विभागाला जी जमीन मोबदल्यात दिली जाईल ती जमीन पसंत पडल्यानंतरच संरक्षण विभागात या मंदिराच्या जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करेल, असे कळते.

मूर्तींना संरक्षण
दरम्यान, मंदिर नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून हे काम करीत असताना मंदिरात असलेल्या गणपतीच्या दोन्ही मूर्तींसह इतरही मूर्तींना कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून आधी त्यांचे संरक्षण कवच दिले जाणार आहे. त्याचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. गणपतीच्या मुख्य मूर्तीच्या चारही बाजूला आठ लोखंडाचे पिलर उभे केले जाणार आहेत. त्यावर तीन एमएमची लोखंडी चादर टाकली जाणार आहे. बांधकाम करताना कोणतीही वस्तू मूर्तीवर पडू नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन योजनेनुसार गणपतीचे सिंहासन हे ५१ किलो सोन्याचे राहणार आहे. त्यादृष्टीनेही काम सुरू झाले आहे. गणेश मंदिराच्या नूतनीकरणासह महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारासह काही भागांच्या सौंदर्यीकरणाचेही काम हाती घेतले जाणार आहे.