भगवद्‌गीता सकारात्मकता शिकवते

0
91

– विनय पत्राळे यांचे प्रतिपादन
नागपूर, १९ एप्रिल
भगवद्‌गीता सकारात्मकता शिकवते. मात्र माणसाची वृत्ती अनेकदा पूर्वग्रहानुसार काम करायला लावते. गीता अर्जुनाला केवळ युद्ध करण्यासाठी सांगितलेली नसून, त्यातून माणसातील कर्तव्यपरायणता जागृत करण्याचा संदेश मिळतो. हाच संदेश अभियंत्यांना लागू पडतो. अभियंता नेतृत्व करणारा असतो. व्यवस्थापक असतो व त्याच विचारातून तो दुसर्‍याकडून काम करून घेतो. पण यापेक्षा सोबतीला असलेल्यांची प्रवृत्ती ओळखून त्याप्रमाणे नियोजन, व्यवस्थापन अभियंत्याचे असावे, असे प्रतिपादन विनय पत्राळे यांनी केले.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सतर्फे बुधवारी संस्थेच्या सभागृहात ‘भगवद्गीता फॉर इंजिनीअर्स’ या विषयावर विनय पत्राळे यांचे व्याख्यान आयोजिण्यात आले होते. यावेळी पत्राळे यांनी भगवद्गीतेमधील विविध पैलू उलगडले. अध्यक्षस्थानी श्रीनिवास वर्णेकर होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप मसे, सतीश रायपुरे, एम. डी. दाते, मिलिंद पाठक उपस्थित होते.
विनय पत्राळे म्हणाले, आपले काम पूर्ण निष्ठेने करणे हाच खरा धर्म आहे. हाच धागा पकडून अभियंत्याचे काम असायला हवे. अचूकता देखील गीतेमध्ये अंतर्भूत असून, अभियंत्यामध्ये ती सुद्धा असणे आवश्यक आहे. बांधकाम आपला जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यानुसार आपण रोजच काम करतो. पण त्यासोबतच सुधारणा करण्याचा विचारही आपण केला पाहिजे. गीतेमध्ये ज्ञानाची उपासना आहे, संघभावना (टीमवर्क) आहे आणि यामुळेच आपल्याला चालना मिळत असते. ही उपासना, चालना सतत सुरू राहिली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन करून विनय पत्राळे यांनी आपले व्याख्यान संपविले.
अध्यक्षीय भाषणात श्रीनिवास वर्णेकर म्हणाले, गीता प्रत्येकासाठीच आहे. माणसाने आनंदाने जगावे हे गीता शिकवते. सूक्ष्माकडून अतिसूक्ष्माकडे नेतानाच अतिसूक्ष्म कसे विशाल आहे, याचेही दर्शन गीतेमध्ये होते. अनुभूतीचे शास्त्र म्हणूनही गीतेकडे पाहिले जाऊ शकते. श्रद्धा देखील गीताच शिकवते. त्यामुळे ही श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला मूळज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कार्यक्रमाचे संचालन करून मिलिंद पाठक यांनी पत्राळे यांचा परिचय करून दिला. डॉ. दिलीप मसे यांनी शब्दसुमनांनी वक्त्यांचे स्वागत केले.