सन्मित्र सभेची संगीतमय ‘अद्वैताची गाथा’

0
123

– वसंतोत्सवानिमित्त सादरीकरण
नागपूर, १९ एप्रिल
वसंत ऋतू म्हणजे नव्याची सुरुवात. जुनी पाने गळून नवी पालवी उमलायला लागते. जुन्याची कास सोडून नव्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा हा ऋतू. अशा ऋतूच्या स्वागतासाठी सन्मित्र सभेतर्फे ‘अद्वैताची गाथा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी सन्मित्र सभेतर्फे चैत्र वर्षाच्या स्वागतासाठी अशा विविध कार्यक़्रमांचे सादरीकरण करण्यात येते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अर्चना अलोणी, विशाखा बागडे, शैलजा झाडे, साहू आणि डॉ. कल्पना तिवारी- उपाध्याय यांच्या हस्ते गौरीपूजनाने करण्यात आली. तसेच यावेळी अद्वैताची गाथा या कार्यक्रमाच्या गीतकार, संगीतकार, निर्मात्या मनीषा लिमये यांचा सत्कार करण्यात आला. मैफिलीची सुरुवात ‘हेरंब स्तुती’ ने करण्यात आली. त्यानंतर ‘हरिनामाचे बीज’, ‘श्री हरीचे अवतार’, ‘श्रावणातल्या कृष्णाष्टमीला’, ‘जय जय रघुवीर’, ‘जे सावळे गोजिरे’, ‘कल्पवृक्ष’, ‘मुरलीचे स्वर’, ‘मीठ मोहर्‍या फुलांनी’, ‘श्रीरामाचे नाम मुखी घ्या’, ‘उंच स्वरी गजर हा’, ‘रामा रघुनंदना’, ‘राम नाम की महिमा भारी’ आणि ‘मयूरपिच्छ धारी मुरारी’ यासारखी गाणी सादर करण्यात आली.
ही गाणी अपूर्वा घुसे, राजश्री पत्की, मंजूषी केळकर, अर्चना वकील, स्वाती ठोंबरे, स्नेहल बाबतीवाले यांनी सादर केली. त्यांना संवादिनीवर कृष्णा भोयर तर तबल्यावर प्रमोद बावणे यांनी साथ दिली. कार्यक्रमात प्रभाकर बेलसरे यांनी सन्मित्र गीत सादर केले. संचालन डॉ. कल्पना तिवारी-उपाध्याय तर निवेदन ज्योती आगवण यांनी केले.