उन्हामुळे अंड्यांच्या विक्रीवर परिणाम

0
110

– प्लॅस्टिकची अंडी केवळ अफवा
नागपूर,१९ एप्रिल
वाढत्या उन्हाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह अंड्यांच्या व्यवसायालाही बसत असल्याचे दिसून येते. सध्या प्लॅस्टिकची अंडी बाजारात असल्याच्या बातमीमुळे लोकांनी अंडी खाण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
प्लॅस्टिकच्या अंड्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अंडी खावी तरी कशी? असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. मात्र, प्लॅस्टिकची अंडी निव्वळ अफवा असल्याचे नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमेटीकडून सांगण्यात आले आहे. नागपूर शहरात अशा अफवांचा कोणताही परिणाम नसल्याचे महात्मा फुले मार्केट जनरल मर्चंट व वेल्फेअर असोसिएशनचे सचिव मोईझ बुराही यांनी सांगितले. मोईझ बुराही यांनी म्हटले की, प्लॅस्टिकची अंडी ही निव्वळ अफवा असून, त्यामुळे शहरात अंडी विक्रीवर कसलाही परिणाम झालेला नाही.
वाढत्या उन्हामुळे नेहमीपेक्षा सध्या अंड्यांच्या विक्रीमध्ये १० टक्के घट झाली आहे. नेहमी उन्हाळ्यात अंड्यांच्या विक्रीमध्ये थोडीफार घट होतच असते. ही साधारण बाब आहे. तसेच उन्हाळा सुरू होण्याअगोदर शेकडा ३०० रुपये दर होता. मात्र, आता २८० रुपये इतका दर आहे. नागपूर शहरात ९५ टक्के अंडी तेलंगणा व आंध्रप्रदेशमधून विक्रीसाठी आणली जाते. तर ५ टक्के अंडी स्थानिक पातळीवरून येते. सध्या अंड्यांची किंमत प्रतिअंडे २ रुपये ८० पैसे आहे. जर प्लॅस्टिकची अंडी तयार करायची असेल, तर त्याला कमीत कमी १५ रुपये खर्च येईल आणि हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे प्लॅस्टिकची अंडी ही निव्वळ अफवा असून, लोकांनी याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शहरातील अंडी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
अंड्यांमुळे हाडांमध्ये मजबुती येते, डोळे निरोगी ठेवण्यास अंडी मदत करते, त्वचा तजेलदार होते, शरीराची वाढ झपाट्याने होण्यास मदत मिळते तसेच शरीरातील चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आदी पोषणमूल्ये मिळतात. अंड्यांमध्ये सल्फर हा उष्ण घटक असल्याने ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांना अंडी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.