व्हर्टिकल गार्डन मुख्य चौकांमध्येच राहणार

0
124

-सीताबर्डी परिसरात वाहतूक वळविणार
-टिकेकर मैदानावर नि:शुल्क पार्किंग व्यवस्था
-ग्राहक सेवा केंद्राचा शुभारंभ

नागपूर, १९ एप्रिल
मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा खापरी ते सीताबर्डी या मार्गावरील जवळपास सर्व पिलरची उभारणी झाली असून खापरी ते विमानतळ परिसरातील पिलरवर व्हर्टिकल गार्डनची रचना करण्यात आली आहे. ही व्यवस्था सर्व पिलरवर राहणार नसून शहरातील मुख्य चौकांमधील पिलरवर करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोचे प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
सीताबर्डी इंटरचेंज स्थानकाजवळ स्थापन करण्यात येणार्‍या भव्य २० मजली इमारतीच्या उभारणीची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येत असून तत्पूर्वी याठिकाणी होणार्‍या गैरसोयींबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचनांवर विचार करण्यासाठी टिकेकर मार्गावर ग्राहक सेवा केंद्राचा आज बुधवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी ब्रिजेश दीक्षित बोलत होते.
व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना नागरिकांना आवडली असून त्याचे प्रारूप केवळ उभे केले आहे. निर्जीव पिलरला सजीव करणारी ही संकल्पना आम्ही राबवीत आहोत. ती प्रमुख चौकांमधील पिलरवर राबविण्यात येईल. तसेच पिलरच्या खाली जागा असल्यास त्याठिकाणी लॅण्ड स्केपिंग तसेच रंगीत दिव्यांची रोषणाई देखील करण्याचा मानस आहे. जागतिक स्तरावरील सर्व संकल्पना याठिकाणी राबविण्यात येणार आहे.
येत्या काळात सीताबर्डी येथे काम सुरू होईल. सध्या अर्थवर्कचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला जागा सोडली असून रस्त्याचे रुंदीकरण केले असून काही भागात डांबरीकरण देखील केले आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेष वाहतूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच येत्या जून महिन्यात सेंट्रल एव्हेन्यूवरील काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला संचालक महेशकुमार, उपमहाप्रबंधक शिरीष आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.