विनापरवाना मद्य प्राशन करणे भोवणार!

0
181

– पोलिस आयुक्तांकडून कारवाईचे संकेत
– वाईन शॉप, बीअर बारवर गर्दी
– पोलिसांची परिस्थितीवर करडी नजर
नागपूर १९ एप्रिल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राष्ट्रीय महामार्गावरील शहरी व ग्रामीण भागातील दारूची दुकाने बंद करण्यात आल्याने आता शहरांतर्गत आणि गल्लीबोळातील वाईन शॉप, बीअर बार व शॉपींवर सायंकाळच्या वेेळेस चांगलीच गर्दी जमू लागली आहे. दारू दुकानांसमोरील या गर्दीला पायबंद घालणे कठीण झाल्याने आता या दुकानांसमोरही सुरक्षारक्षक तैनात केले जात आहेत. दरम्यान, विनापरवाना मद्य बाळगणे व मद्य प्राशन करणे मद्यपींना भोवणार आहे. अशा मद्यपींवर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास ६०० हून अधिक सर्वच प्रकारच्या दारू दुकानांना कुलूप लागले आहे. यात शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या बार व दुकानांचा समावेश आहे. त्यामुळे आता मद्यशौकिनांना महानगरातील इतर क्षेत्रात असलेल्या किंवा गल्लीबोळात असलेल्या बीअर बार, शॉपी आणि देशी दारूच्या दुकानांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. सायंकाळ होताच या सर्वच प्रकारच्या दुकानांमध्ये दारूड्यांची अक्षरश: जत्राच भरते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बंद पडलेल्या मद्य सम्राटांना जेवढा बसला तेवढाच मद्यपींनादेखील बसला आहे. हायवेवरील सर्व बार बंद झाल्याने मद्यपींची पावले सायंकाळ होताच शहराच्या इतर भागांमधील दारू दुकानांकडे वळतात. नेहमी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असणारी दुकाने आज मात्र मद्यशौकिनांच्या गर्दीने फुलून जात असल्याचे चित्र आहे. ही गर्दी लक्षात घेऊन काही मद्यपी तर काऊंटरवरच खडे-खडे पेग रिचवून निघून जातात. तसेच दुकानांसमोरील वाढती गर्दी पाहता दुकान मालकांनी दुकानासमोर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. शहरांतर्गत वर्दळीच्या ठिकाणी दारू दुकानांसमोर होणार्‍या या गर्दीचा रस्त्याने जाणार्‍या महिलांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच त्या परिसरातील बालमनावर देखील वाईट संस्कार होत आहे. अचानक दारू दुकानांसमोर वाढलेली गर्दी हा बालकांच्याही कुतूहलाचा विषय ठरत असल्याने भविष्यात त्यांचीही पावले या दुकानांकडे सरकू नये, यासाठी आजच खबरदारी घेण्याची गरज आहे.
– ८७४ दारू दुकाने झालीत बंद
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीची परवाने रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ८७४ बीअर बार, वाईन शॉपी, देशी दारूचे दुकान तसेच बीअर शॉपी १ एप्रिलपासून बंद झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत न्यायालयीन आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे.
बार मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या विभागाकडून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असली, तरी बारच्या नावांचे फलक अद्याप तसेच आहेत. शहर व जिल्ह्यात ६८० बीअर बार रेस्टॉरेंटपैकी ५४३, ११५ वाईन शॉपपैकी ६३, २८९ देशी दारू दुकानांपैकी १९८ व १०४ बीअर शॉपींपैकी ६० शॉपी बंद करण्यात आल्या आहेत. महामार्गालगत असलेल्या ज्या शहरांची लोकसंख्या २० हजारांपेक्षा कमी आहे, तिथे महामार्गापासून बीअर बारचे अंतर २२० मीटर, तर जिथे २० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असेल, तिथे ५०० मीटर अंतराची अट आहे.
तस्करांनाही फटका
– सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा दारूबंदी असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील दारू तस्करांना देखील फटका बसला आहे. पूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील सेटिंग करून ठेवलेल्या दारूच्या दुकानांमधून दारू तस्कर सावधपणे अवैध दारूचा पुरवठा दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये करायचे. मात्र, आता महामार्गावरील दुकाने बंद झाल्याने नागपूर शहरातील गल्लीबोळातील दुकानांकडे या तस्करांनी आपली पावले वळविली आहे. परंतु, एकीकडे पोलिसांची भीती तर दुसरीकडे या दारू दुकानदारांशी या तस्करांची ओळख नसल्याने त्यांना ब्लॅकमध्ये दारू मिळणे कठीण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने बंद झाली. त्यामुळे महानगरांतर्गत असलेल्या दुकानांवर गर्दी वाढत असावी. परंतु, मद्य प्राशनासाठीही परवाना अनिवार्य आहे. विनापरवाना मद्य प्राशन करणे गुन्हा आहे. अशा तळीरामांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार असून, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. याहीपलीकडे जाऊन कारवाईबाबत कायद्यात आणखी काही तरतुदी आहेत काय, याचा शोध घेतला जात आहे. दारूच्या दुकानात गर्दी होत असल्यास त्याचा विपरित परिणाम त्या भागातील नागरिकांवर होणार नाही, याची काळजीही घेतली जाईल.

– डॉ. के. व्यंकटेशम्,
पोलिस आयुक्त