मनाची शांती

0
108

मनुष्य जी कर्मे करतो त्याचा अंतिम उद्देश काय याचा विचार केला असता असे लक्षात येते की, आपण स्वत:च्या इच्छेने केलेल्या कोणत्याही शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक कर्माचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की, प्रत्येक कर्माच्या मुळाशी आपल्या आत्म्याची तृप्ती व्हावी असा आपला हेतू असतो.
आपण देहप्रवृत्तीनुसार मर्यादित किंवा अमर्यादित प्रमाणात विषयोपभोग सेवन करीत असतो. उच्च भावनानुसार उदात्तपणाची किंवा नीच भावनानुसार नीचपणाची कर्मे करीत असो, शरीराला किंवा मनाला सुखकारक किंवा दु:खकारक वाटणारी कर्मे करीत असो, सदसद्विवेक बुद्धीच्या निर्णयानुसार वागत असो किंवा तिच्या निर्णयाविरुद्ध वागत असो. थोडक्यात काय तर आपण कोणतेही कर्म स्वेच्छेने करीत असो ते आपण स्वत:च्या म्हणजे आपल्या आत्म्याच्या तृप्तीकरिताच करीत असतो.
आपला आत्मा कसा तृप्त होईल हेच प्रत्येकजण पाहत असतो. पण गंमत अशी की, सर्वांचा आत्मा एकाच गोष्टीने तृप्त होत नाही. आत्मतृप्तीचे प्रत्येकाचे साधन निरनिराळे असते व ते मनुष्याचा स्वभाव, संस्कृती, सवयी, शिक्षण, नैसर्गिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
काही लोकांच्या आत्म्याला स्वत:च्या देहाला व मनाला स्वाभाविकपणे सुखकारक वाटणारी कर्मे केल्याने तृप्त वाटते. काहींना सदसद्विवेक बुद्धीच्या निर्णयानुसार वागल्याने तृप्त वाटते. काहींना परोपकारक कर्मे केल्याने तृप्त वाटते आणि काहींना परपीडाकारक कर्मांनी तृप्ती वाटते. मनुष्याच्या आत्म्याला ज्या प्रकारच्या कर्मांनी तृप्ती वाटते त्यावरून त्या मनुष्याची किंमत ठरविली जाते. ज्यांना सदाचाराने वागण्याने व परोपकार करण्याने समाधान वाटत ते सच्छिल व महात्मे असतात. ज्यांना दुराचाराने व परपीडा करण्याने समाधान वाटते ते दु:शील व दुरात्मे असतात.
जेव्हा आपण शारीरिक किंवा मानसिक वेदना स्वत:च्या इच्छेनुसार सहन करतो तेव्हा त्या वेदना सहन करीत असतानाही आपल्या आत्म्याला एक प्रकारची तृप्ती किंवा समाधान वाटत असते. उदाहरणार्थ, स्वत:च्या कुटुंबाच्या पोषणाकरिता, समाजाच्या हिताकरिता, धर्मपालनाकरिता, देशाच्या रक्षणाकरिता किंवा स्वत:ला प्रिय वाटणार्‍या कोणत्याही कार्याकरिता मनुष्य अनेक प्रकारची शारीरिक व मानसिक दु:खे आनंदाने सहन करतो व प्रसंगानुसार हसत हसत फासावरही चढतो हे आपण व्यवहारात वारंवार पाहतो.
ज्या कर्मांनी आपल्या आत्म्याला तृप्ती वाटण्यासारखी नसते ती कर्मे आपण स्वच्छेने केव्हाही करीत नाही. ती केवळ दुसर्‍यांच्या सांगण्यास्तव किंवा अनिच्छेने करतो.
जी घटना घडावी अशी स्वत:ला इच्छा असते ती पुढे घडेल या कल्पनेने ती प्रत्यक्ष घडत असता व ती घडून गेल्यानंतर तिच्या आठवणीने आत्म्याला तात्पुरती का होईना पण तृप्ती वाटते. तसेच ती घटना घडू नये असे स्वत:ला वाटत असते ती पुढे घडेल या कल्पनेने ती प्रत्यक्ष घडत असता व ती घडून गेल्यानंतर तिच्या आठवणीने आत्म्याला क्लेश होतात.
आत्म्याला तृप्ती वाटणे किंवा क्लेश होणे हे कोणत्याही गोष्टीच्या स्वाभाविक स्वरूपावर किंवा गुणधर्मावर अवलंबून नसते. एखादी गोष्ट शरीराला व मनाला सामान्यत: सुखकारक असूनही स्वत:च्या इच्छेविरुद्ध होत असल्यास आत्म्याला क्लेशकारक वाटते व दुसरी गोष्ट शरीराला किंवा मनाला सामान्यत: दु:खकारक वाटणारी असूनही स्वत:च्या इच्छेनुसार होत असल्यास तिच्यामुळे आत्म्याला तृप्ती वाटते.
यावरून हेच लक्षात येते की, शारीरिक किंवा मानसिक सुख व आत्म्याची तृप्ती यांचा अभेद्य संबंध नाही. आत्म्याला तृप्त वाटणे किंवा क्लेश होणे सर्वस्वी स्वत:च्या इच्छेनुसार घटना घडत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते.
स्वेच्छेनुसार होणारे कर्म हे साधारणपणे दोन प्रकारचे असते. सदसद्विवेक बुद्धीच्या निर्णयानुसार व निर्णयाविरुद्ध अशी दोन्ही प्रकारची कर्मे स्वेच्छेने होऊ शकतात. सदसद्विवेकबुद्धीच्या निर्णयानुसार होणारी कर्मे सामान्यत: योग्य असतात, तर तिच्या निर्णयाविरुद्ध केली जाणारी कर्मे बहुधा अयोग्य असतात.
कर्म करताना किंवा केल्यानंतर प्रथम आत्मतृप्ती होऊन पुढे जे आत्मक्लेश होतात त्याला पश्‍चात्ताप असे म्हणतात.
आत्मतृप्ती राहून आत्मक्लेशाचा पूर्ण अभाव असणे म्हणजे आत्मशांती होय. आत्मशांती असता आत्मतृप्ती वाटत असते आणि आत्मा प्रसादयुक्त प्रसन्न व समाधानी असतो त्या त्या वेळी बुद्धीही साहजिकच प्रसन्न असते. बुद्धी प्रसन्न असल्याशिवाय आत्म्याला शांती लाभू शकत नाही. बुद्धी आणि आत्मा हे प्रसन्न असले म्हणजे मोठ्याही शारीरिक किंवा मानसिक दु:खाची बाधा मनाला होऊ शकत नाही. त्यामुळे मनालाही सुख वाटते. बुद्धी आणि आत्मा हे प्रसन्न असता मनाला जे अतिंद्रिय सुख वाटते ते सर्वोत्कृष्ट होय.
आत्म्याला क्लेश होत असतात तेव्हा मनाला सुख होऊ शकत नाही. मनाला सुख वाटण्याकरिता आत्म्याला शांती असावी लागते. म्हणूनच शांतीशिवाय सुख नाही असे म्हटले आहे.
आत्मशांती इतकी प्रिय आणि आत्मक्लेशाइतकी अप्रिय व असह्य जगात दुसरी कोणतीही गोष्ट नाही. प्रत्येक मनुष्याचा प्रयत्न आत्मशांती मिळविण्याकरिता चाललेला असतो. आत्मशांतीकरिता मनुष्य वाटेल त्या गोष्टीचा त्याग करण्यास तयार असतो.
पण वस्तुत: आत्मशांती मिळण्याकरिता हा देह किंवा हे जग सोडून कोठेच जावे लागत नाही. सत्कर्मांनी याच जन्मी व याच जगात अखंड आत्मशांती लाभू शकते आणि दुष्कर्मांनी याच जन्मी व याच जगात केव्हा ना केव्हा तरी आत्मक्लेश भोगावे लागतात.
मनुष्य कोणत्याही कर्मात पूर्णपणे मग्न असतो त्या वेळी व मग्न असतो तोपर्यंत आत्म्याला सतत संकल्प करावे लागतात. आत्म्याचे संकल्प होत राहिल्याशिवाय क्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे क्रिया चालू असेपर्यंत आपण संकल्पमग्न असतो. अशा वेळी आत्मशांतीचा अनुभव येतो.
परमेश्‍वराचे भजन-पूजन-कीर्तन-नामस्मरण, जप तप इ. धार्मिक कर्मे पूर्ण श्रद्धेने करीत असता जे त्यात तन्मय होऊन जातात, जे त्या कर्मात पूर्ण गढलेले असतात तोपर्यंत आत्मशांतीचा लाभ होतो.
आत्मशांतीच्या अशा अवस्थेत आत्मा प्रसन्न व समाधानी असतो. त्याला सुख-दु:खाची बाधा होत नाही. तो स्वत:ला विसरतो व एक प्रकारच्या अवर्णनीय आनंदाचा उपभोग घेतो. या आनंदाला आत्मानंद म्हणतात.
अनासक्त भावनेने आपले कर्तव्य करण्यात सतत मग्न राहिले म्हणजे आत्मशांती मिळेल.
– प्रा. डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर
९४२३७३३६३०