ट्रॅफिक जाम

0
93

मेट्रोतल्या बायका
कल्पना त्या स्वयंचलित दुचाकी वाहनांच्या अतिभव्य शोरूमसमोरच्या रांगेत उभी राहिली, तेव्हा तिच्या समोर किमान वीस- पंचवीस माणसं तरी आधीपासून उभी राहिलेली होती आणि तिच्या मागेही अवघ्या दहा मिनिटांत तेवढीच गर्दी झालेली होती. तिला गंमतच वाटली. ते शोरूम अद्याप उघडलं पण नव्हतं, मात्र आज आणि उद्या स्टॉक क्लिअरन्स सेल अंतर्गत त्या शोरूममध्ये उपलब्ध असलेल्या स्वयंचलित दुचाकी वाहनांवर घसघशीत दहा हजार रुपयांची सूट देऊ करण्यात आली होती. वर्तमानपत्रांत त्यासंबंधीच्या मोठाल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या, दुकानाच्या आजूबाजूलाही मोठाल्या होर्डिंग्जवर दहा हजार रुपयांच्या सवलतीबद्दलचा मजकूर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे जणू काही वाहनं फुकटच मिळत असल्यागत तिथे लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. तसंही मुंबईतल्या त्या रस्त्यावर खूप मोठ्या संख्येत मोटारगाड्यांच्या आणि मोटारसायकल, स्कुटर या स्वयंचलित दुचाकी वाहनांच्या अतिभव्य आणि एकमेकांशी प्रचंड स्पर्धा करणार्‍या शोरूम्स होत्या. साहजिकच तिथे निवड करण्यासाठी भरपूर वाव असल्यामुळे आसपासच्या उपनगरांतले लोक वाहन खरेदी करण्यासाठी तिथे धाव घेत असत.
कल्पनानं सहज म्हणून मागे वळून बघितलं, तर तिचा आपल्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना. ती ज्या रांगेत उभी होती, तिनं एव्हाना नागमोडी वळणं घेऊन आणखी दोनेकशे लोकांना तरी सामावून घेतलं होतं. एवढंच नव्हे, तर इतर शोरूम्सच्या समोरही लोकांच्या अशाच रांगा लागायला सुरुवात झाली होती. आजूबाजूच्या चहाच्या टपरीवाल्यांनीही तत्पर सेवा पुरवून लोकांचं रांगेत उभं रहाणं काही अंशी सुसह्य केलं होतं.
गेल्या पाच वर्षांत मुंबईतल्या वाहनांचा आकडा वीस लाखांवरून तीस लाखांवर गेलाय. मात्र मुंबईतल्या साधारण दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये फारशी वाढ झाली नाहीये. मुंबईत चारचाकी वाहनांचीच संख्या लाखांपेक्षा अधिक आहे, मात्र गाड्या उभ्या करायला, पार्किंगची जागा पुरेशी नाहीये. रांगेत उभं राहिल्यावर आपला नंबर येईतो काय करायचं म्हणून कल्पनानं मोबाईलवर इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली, तसा माहितीचा प्रवाह तिच्या पुढ्यात कोसळू लागला, दिल्लीचं क्षेत्रफळ १४८३ वर्ग किलोमीटर आणि लोकसंख्या एक करोड, एकाहत्तर लाख. ३३ हजार १९८ किलोमीटर लांबीचे दिल्लीचे रस्ते आहेत, तर ९६,३४,९७६ वाहनं त्या रस्त्यांवर धावतात. रोज बाहेरगावांहून ५ लाख सत्तर हजार वाहनं दिल्लीत प्रवेश करतात. दरवर्षी तेवढीच वाहनं दिल्लीत रजिस्टर केली जातात… ते सगळं स्टॅटिस्टिक्स बघितल्यावर आपण तरी आणखी एक वाहन विकत घेऊन मुंबईतल्या वाहतूक कोंडीत आणखी एका वाहनाची भर घालायला का निघालो आहोत, हा कल्पनाला प्रश्‍न पडला. तोवर त्या परिसरात प्रचंड ट्रॅफिक जाम झाला होता आणि काही वेळानं तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो की काय, अशी परिस्थिती येऊन ठेपली होती. सहज म्हणून तिनं त्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक सेल्फी आणि रांगांचे फोटो घेऊन सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपल्या अकाऊंटवर टाकले.
‘‘कल्पना, काय जबरदस्त फोटो घेतलेयस गं! मी याची बातमी तयार करते. त्यात हे तुझे काढलेले फोटो वापरले तर चालतील का?’’ लगोलग कल्पनाला एका लोकप्रिय वेब पोर्टलमध्ये काम करणार्‍या तिच्या पत्रकार मैत्रिणीचा फोन आला. चला, म्हणजे माझं हे रांगेत उभं रहाणं सत्कारणी लागलं तर! तिला फोटो वापरायची परवानगी आणि रांगेत तिच्या मागे-पुढे उभ्या असलेल्या लोकांच्या विचारांचं संकलन देऊन कल्पना त्या शोरूममध्ये शिरली, तेव्हा त्या भव्य शोरूममध्ये मोठ्या संख्येनं तैनात केलेल्या तत्पर सेल्समनपैकी एकाने तिला वाहन खरेदीसाठी आवश्यक ती सगळी मदत केली. दीड-दोन तासांनी आपल्या सुबक नेटक्या स्वयंचलित दुचाकी वाहनासह बाहेर येऊन तिनं फोटो घेऊन पुन्हा सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपल्या अकाऊंटवर टाकले, तेव्हा तिच्या त्या मैत्रिणीनं दिलेल्या बातमीबरोबरच्या फोटोंमुळे आणि लोकांच्या विचारांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तोवर तिचा बराच बोलबाला झालेला दिसत होता. अनेक लोकांनी ती बातमी आणि फोटो सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपापल्या अकाऊंटवर शेअर केले होते. ‘‘कल्पना, आमच्या वेब पोर्टलचे एडिटर खूप खूष आहेत तुझ्यावर. वाहन खरेदीसाठी लागलेल्या रांगांची इत्थंभूत माहिती, गर्दीचे फोटो आणि लोकांचं मनोगत आमच्याच वेब पोर्टलनं सर्वात पहिले दिली. ही ब्रेकिंग न्यूज खूप गाजतेय, एक लाखापेक्षा जास्त हिट मिळालेत त्या न्यूजला. ते विचारताहेत जॉईन करतेस का आमचं ब्रेकिंग न्यूज वेब पोर्टल? तुझा होकार असेल तर दहा मिनिटांच्या अंतरावरच आमचं ऑफिस आहे, तिथे ये त्यांना भेटायला!’’ त्या मैत्रिणीचा अनपेक्षित फोन आला, तशी घराच्या दिशेनं निघालेल्या कल्पनानं आपली स्वयंचलित दुचाकी त्या ऑफिसच्या समोर थांबवली. गाडीला हेल्मेट लावून तिनं साईड मिररमध्ये बघत आपले केस नीटनेटके केले आणि मनातल्या मनात वाहनांच्या संख्येची आणि माहितीची उजळणी करीत ऑफिसमध्ये प्रवेश केला.
***
खूप लोकांनी पल्लवीला लग्नाबद्दल अभिनंदनाचे मेसेजेस पाठवले आहेत. मात्र अनेक लोकांनी आपल्याला आपल्या नात्यातल्या लग्नाला जाणं आवश्यक असल्यामुळे आपल्याकडे येण्याबद्दल असमर्थता व्यक्त केलीये. दिल्लीत म्हणे आजच्या मुहूर्तावर वीस हजार लग्न होणारेत… पल्लवीच्या आईनं मोबाईलवरचा मेसेज वाचत पल्लवीच्या बाबांना सांगितलं. दिल्लीत त्या रात्री होऊ घातलेल्या त्या वीस हजार लग्नांपैकी एक लग्न खुद्द पल्लवीचंच होतं. दिल्लीत रात्रीच लग्नं लागतात. संध्याकाळी वर घोडीवर सवार होऊन अथवा बग्गीत बसून घरून विवाहस्थळी वाजत गाजत येतो, तिथे त्याचं आणि वराकडच्यांचं वधूपक्ष मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करतो. वधुवर एकमेकांना हार घालतात, त्याला जयमाला म्हणतात आणि मग उत्तररात्री विवाहाचे विधी, अग्नीला सात फेरे, कन्यादान इत्यादी बाकीचे विधी होऊन, सकाळी वधूची विदाई होऊन ती सासरी जाण्यासाठी निघते. पल्लवीच्या बाबांनी आणि आईने पल्लवीच्या लग्नाची जय्यत तयारी केली होती. घरी आलेले पाहुणे आणि नातेवाईकांचा नाश्ता चहा उरकून लगोलग ते सगळे विवाह समारंभ असलेल्या हॉलकडे सकाळीच रवाना होणार होते.
‘‘दुल्हेराजा, आज दिल्ली में बीस हजार शादियॉं हो रहीं हैं, कहीं ऐसा ना हो की पल्लवी दुल्हन बनी बैठकर अपने दुल्हेराजा का इंतजार कर रही हो और दुल्हेराजा समयपर पहुँचे ही ना!’’ पल्लवी मोबाईलवर लाडिकपणे आपल्या होऊ घातलेल्या पतीची रेशमी चिमटे काढत थट्टा करू लागली.
‘‘नाही गं, काळजी करू नकोस! मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना…’’ हसत हसत फिल्मी स्टाईलने पल्लवीचा दुल्हेराजा मोबाईलवरच गाऊ लागला, तशी पल्लवी लाजली.
‘‘आटपा बाईसाहेब, तुम्हा बायकांना तयार व्हायला खूप वेळ लागतो हां, तिकडे वर वेळेवर बारात घेऊन येईल आणि इकडे वधुमायचे नट्टेपट्टे संपता संपत नाहीयेत…’’ पल्लवीच्या बाबांनी पल्लवीच्या आईची फिरकी घेण्याची संधी हातची घालवली नाही, तशी उपस्थितांमध्ये खसखस पिकली. ‘‘चला, तुमचं आपलं काहीतरीच!’’ कृतक कोपानं पल्लवीची आई उद्गारली. अखेर सगळ्यांची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था झाल्यावर नवर्‍या मुलीसह तिचे आईबाबा, पाहुणे आणि आलेल्या नातेवाईकांना घेऊन भाड्यानं घेतलेल्या गाड्यांमधून समारंभस्थळी रवाना झाले, तेव्हा सूर्य चांगला माथ्यावर आला होता.
‘‘आज झालं काय आहे कोण जाणे, गाड्या पुढेच सरकत नाहीयेत, जीपीएसवर सगळे रस्ते लाल दाखवताहेत, ट्रॅफिक खूप स्लो चाललाय साहेब!’’ गाडीचालक पल्लवीच्या बाबांना म्हणाला. ज्या इप्सित स्थळी पोहोचायला एरवी तासभर लागला असता, तिथे दोन तास होऊन गेले तरी ते अर्ध्यातही पोहोचले नव्हते.
‘‘आहे, वेळ आहे आपल्या हातात भरपूर!’’ घायकुतीला आलेल्या पल्लवीच्या आईला दिलासा देऊन पल्लवीच्या बाबांनी व्याह्यांना वाहतुकीची कल्पना देण्यासाठी फोन लावला, ‘‘तुम्हीही भरपूर वेळ हाताशी ठेवून निघा बरं का, खूप ट्रॅफिक जाम आहे आत्ताच, संध्याकाळी तर कठीण आहे!’’
अखेरीस चार तासांनी दमून भागून मंडळी समारंभस्थळी पोहोचली आणि पल्लवीचे आईबाबा पुढच्या व्यवस्थेला लागले.
त्या संध्याकाळी दिल्लीत न भूतो न भविष्यति असा वाहतूक खोळंबा झाला. ऑफिसमधून निघालेले लोक आणि वीस हजार लग्नांना उपस्थित राहण्यासाठी निघालेले आमंत्रित यांची एकच गर्दी दिल्लीतल्या रस्त्यांवर झाली. वाहनं इंचभरही पुढे सरकेनात. वीस हजार वरांपैकी बहुसंख्य वर त्या ट्रॅफिक जाममध्ये अडकले होते. लग्नाचे मुहूर्त गाठणं कठीण झालं होतं.
‘‘देखो, मैंने आपसे कहा नहीं था?’’ पल्लवीनं आपल्या दुल्हेराजाला गुपचूप फोन लावला. त्यानं प्रत्युत्तरादाखल ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या, बग्गीत बसलेल्या त्याचे फोटो आणि सेल्फी तिला व्हॉट्सअपनं पाठवले.
‘‘लो, अभी कुछ समय तो हमारे लिये छोडो…’’ त्याच्या मित्रांनी त्याची फिरकी घेतली आणि लगोलग ते स्वतःही ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या वरातीचे आणि स्वत:चे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपापल्या अकाऊंटवर टाकू लागले. अगदी न्यूज वेबपोर्टल्सनी पण दिल्लीतल्या वीस हजार लग्नसमारंभाची आणि ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या वरातींची बातमी लगोलग झळकवली.
अखेरीस उत्तररात्री पल्लवीचा दुल्हेराजा वरात घेऊन समारंभस्थळी पोहोचला, तेव्हा कुठे तिच्या आणि तिच्या आईबाबांच्या जिवात जीव आला. सनईचौघडे वाजू लागले आणि एकमेकांना जयमाला घालणार्‍या त्या वधूवरांवर आकाशानं चांदण्यांच्या अक्षता उधळल्या.
***
‘‘आज लवकर घरी पोहोचा, म्हणजे आपल्याला त्या गाण्याच्या कार्यक्रमाला जाता तरी येईल!’’ कावेरीताईंनी आपल्या यजमानांना फोन केला, तेव्हा त्यांच्या हातात त्या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजांच्या मैफिलीची दोन तिकिटं होती.
‘‘अगं मी लाख लवकर निघीन ऑफिसमधून, पण हल्ली मुंबईतला हा ट्रॅफिक जाम बघते आहेस ना? करतो प्रयत्न बापडा!’’
‘‘मुंबईतल्या ट्रॅफिक जामवर तर अगदी ब्रह्मदेवाजवळ पण काही उपाय नसेल!’’ कातावून कावेरीताईंनी यजमानांना म्हटलं. ‘‘मी तयार राहीन. पण तुम्ही घरी लवकर या’’ त्यांनी पुन्हा त्यांना बजावलं, आणि त्या संध्याकाळी बाहेर गेल्यावर खाण्यासाठी जवळ असावेत म्हणून खाद्यपदार्थ, पाणी वगैरे तयारी करण्यात गुंतल्या.
‘‘तुम्हाला ना, कसली हौस म्हणून उरली नाहीये… पूर्वी आपण गाण्याच्या मैफिली कधी चुकवीत नव्हतो. ऑफिस सांभाळून तुम्ही धावतपळत येत होता… घर, मुलाबाळांचं सांभाळून मी तयार राहत होते… आता मुलं मोठी झालीत, नोकरीला लागलीत. आता कसले पाश नाहीत, तुम्हीही सेवानिवृत्त व्हायला आलात, मात्र इतक्या वर्षांत आपण गाण्याच्या एकाही कार्यक्रमाला गेलो नाहीये…’’ एक दिवस अचानक कावेरीताई आपल्या यजमानांना म्हणाल्या होत्या.
‘‘अगं मुद्दामहून थोडीच, मात्र झालंय खरं तसं! असं कर, या आठवड्यात कुठला चांगला कार्यक्रम असेल, तर तिकिटं काढून ठेव! जाऊया आपण!’’ झालेल्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी त्यांच्या यजमानांनी त्यांना म्हटलं होतं. सुदैवानं मुंबईत होणार्‍या दिग्गजांच्या त्या कार्यक्रमाची जाहिरात कावेरीताईंना दिसली आणि तिकिटांचीही व्यवस्था झाली.
वेळेवर घरी पोहोचलो आणि कार्यक्रमासाठी टॅक्सीनं वेळेवर निघालो या आनंदात कावेरीताईंचे यजमान असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. आपल्याला श्‍वास घ्यायला त्रास होतोय, छातीत दुखतंय आणि कळ हातापर्यंत जातेय, हे त्यांनी कावेरीताईंना सांगितलं, तसं वाहनांच्या समुद्रात वेढलेल्या आपल्या टॅक्सीवाल्याला घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या कावेरीताईंनी जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये टॅक्सी नेण्याची सूचना दिली.
‘‘ताई, जवळच मोठं हॉस्पिटल आहे. दहा मिनिटांचा रस्ता आहे, पण खूप ट्रॅफिक जाम आहे.’’
‘‘ड्रायव्हर, लवकर चला, कसंही करा, पण जवळच्या त्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचवा, यांना त्रास होतोय…’’ त्यांनी घाईघाईनं मुलांना फोन लावून त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचा, म्हणून सांगितलं.
रस्ताभर वाहनांची तुडुंब गर्दी इंचभरसुद्धा दुसर्‍या वाहनाला पुढे सरकण्याची मुभा देत नव्हती. कावेरीताई घायकुतीला आल्या होत्या. टॅक्सीवाला हतबल होता. अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्याला यश येत नव्हतं. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना नेमका शेवटच्या क्षणी नियतीनं घाला घातला होता. त्या थिजलेल्या वाहतुकीत अडकलेल्या टॅक्सीत यजमानांचा अचेतन हात हातात घेऊन कावेरीताई हुंदके देत होत्या.
महानगरातली वाहतूक व्यवस्था नित्याप्रमाणे कोलमडलेली होती. तिथली वाहतूक कोंडी फुटायची चिन्हंही नव्हती.
– रश्मी घटवाई
९८७१२४९०४७