बुलेट राजा

0
108

सकाळी सकाळी ७.३० वाजता गादी थरथरायला लागली, फोन विव्हळत होता, जाग आली. उठा आता महाशय, खूप झाले लोळून, फटाफट तयार व्हा आणि मढला पोहोचा बरोबर ११ वाजता, पत्ता टेक्स्ट करतो… एका दमात सर्व सूचना म्हणजे दस्तुरखुद्द डॉ. गिरीश ओक.

१०.०० वाजता निघालो, धुवाधार पाऊस, रस्त्यांची वाट लागलेली, चारकोप ते मालवणी असा खड्डेमय प्रवास, गाडी चालवायची म्हणजे जिकिरीचं आणि स्कीलचंच काम, अशातच माझ्या पाठीमागून रोंरावत येऊन एका पांढर्‍या रंगाच्या बुलेटस्वाराने मला ओव्हरटेक केले आणि त्याचा ‘स्पीड आणि स्टाईल’ मला आकर्षित करून गेली… बाय डीफॉल्ट ही बिकेम माय नेव्हीगेटर… मग मी त्याला जरा निरखूनच बघायला लागलो… पावसामुळे नीटसं दिसत नव्हतं पण… बहुदा ‘टॉल, वेलबिल्ट, फेअर, हॅन्डसम’ असावा, ’ब्लॅक लेदर जॅकेट, पॅन्ट आणि हेल्मेट’ असा सगळा ‘बुलेटी सरंजाम’, ठराविक एक वेग राखल्याने ‘रॉयल एन्फिल्ड’चा जगप्रसिद्ध ढग… ढग… ढग असा एकसुरी आवाज, खड्डे शिताफीने चुकवत मार्ग काढायची त्याची ती ‘स्टाईल’ मोहवणारी होती. मला तर तो एखाद्या ‘बुलेट राजा’सारखाच भासला! त्याच्या त्या ‘ऍटइज ड्रायव्हिंग’मुळे तो ‘जवान’ कदाचित मस्तपैकी शीळ वगैरे घालत असावा असं मला आपलं उगीचंच वाटून गेलं… सिनेमाचं शूट वगैरे चालू आहे की काय म्हणून मी आजूबाजूला ‘कॅमेरा व्हॅन’ वगैरे दिसते आहे का? हेही बघून घेतलं… पण तसं काहीही नव्हतं… मी अकारण त्या ‘बुलेटराजा’च्या विचारांमध्ये जरी गुंतलो असलो तरीही त्याला याची गंधवार्ता असण्याची सुतराम शक्यता नसल्याने जरा… बरा रस्ता लागल्यावर तो ‘वार्‍याच्या वेगाने’ माझ्या नजरेआड झालादेखील… काहीही असो पण ‘बेटा’ लक्षात राहण्याजोगाच होता, यात काही वाद नाही!
मित्रांचा मित्र…
मढला पोहोचलो. इथल्या बहुतांशी बंगल्यात शूटिंगच सुरू असतं. गाडी पार्क करून चौकशी करू लागलो. इतक्यात फोन वाजलाच, कुठे आहेस? उत्सुकता, काळजी, चीड, उशीर यासह भेटीची ओढही गिरीशच्या आवाजात मला जाणवली… मी जागा सांगितली… तुझ्या अगदी समोर… ‘बलवंत’ बंगल्याच्या पोर्चमध्ये मी उभा आहे… दोनच क्षणात मी पोहोचलो, महाराज उभे होतेच, मग गळाभेट, हाताला धरून एका खोलीकडे नेताना चहाची ऑर्डर… खुर्चीत विसावतानाच, वेळेची मर्यादा ओळखून, अवांतर गप्पा टाळून आम्ही मुद्यावर आलो, फार दिवसांची राहिलेली ही भेट जरा जास्तच लांबली… दोन-अडीच तासाच्या मध्यंतरात दोनदा चहा बिस्कीट वगैरे…
पुन्हा बुलेट राजा
जरासं अवघडल्यासारखे वाटल्याने आम्ही बोलत बोलतच खोलीच्या बाहेर आलो, मोकळ्या हवेत. गिरीशने एक सिगरेट पेटवली, तोवर मी आजूबाजूचा परिसर न्याहाळत असतांना पार्किंग लॉटमध्ये उभी असलेली ‘पांढरी बुलेट’ बघताच… तो ‘बुलेट राजा’ इथेच कुठेतरी असावा… ‘‘कुणाची रे ही बुलेट?’’ मी गिरीशला विचारलं…. तेव्हा गिरीश चेहर्‍यावर एक हुकुमी हास्य ठेवत, माझ्याकडे एका वेगळ्याच मिजाशीत बघत म्हणाला… ‘‘कुणाची म्हणजे काय? माझीच…’’ ‘‘म्हणजे तू… बु… लेट वापरतोस?’’ हा माझा प्रश्‍न माझ्याही नकळत, अलगदपणे, आपसूक बाहेर पडला. त्यावर लगेचच पुनश्‍च साभिमानाने फुललेला चेहरा वदला ‘‘एनसी… माझ्या आयुष्यात ‘स्कूटर व मोटारसायकल’ यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’
एकदा एका पोलिसाने मला शिकवलं की, पिवळा दिवा हा वेग वाढवण्यासाठी नव्हे तर वेग कमी करण्यासाठी असतो. जेणेकरून लाल दिवा लागायच्या आत तुम्ही गाडी रेषेच्या अलीकडेच थांबवू शकता. साहेब १५ मिनिटे उशिरा पोहोचलात तरीही चालेल हो, १५ वर्षे आधी कशाला जावं माणसानं? तद्वतच आपल्या आयुष्यातही प्रत्येक चांगल्या-वाईट घटनांचे सिग्नल्स मिळत असतातच आपल्याला, परंतु आपलं अज्ञान आडवं येतं! तर असो! या स्कूटरमुळे मला माझ्या आयुष्याचं मर्म जाणून घेता आलं!
आज वयाच्या साठीजवळ पोहोचताना, ‘तारुण्यातील अपूर्ण इच्छा’ या बॅनरखाली ‘नवीकोरी बुलेट’ विकत घेतानाच ‘एकट्याने प्रवास बुलेटवरंच’ ही शपथही घेतली आणि स्वत:ला निक्षून बजावलेदेखील. त्यामुळे ‘मीरा रोड ते मढ’ हा २५ किलोमीटरचा प्रवास, मी एकटाच असल्याने मी आवर्जून बुलेट वापरतो, हे मला अतिशय अभिमानाने सांगावेसे वाटते!
अगेन्स्ट द विंड
मी त्याला ‘बुलेटराजा’विषयी काही बोललो नाही, पण गिरीशचं खूप कौतुक वाटलं… सकाळी माझ्या कार समोरचा ‘बुलेटस्वा’र’ हा ‘दस्तुरखुद्द गिरीशच’ होता, ही बाब मात्र अविश्‍वसनीय… पचनीच पडत नव्हती… आमच्या दोन-अडीच तासांच्या गप्पांमध्ये गिरीश त्याच्या जीवनाविषयी खूप खोलात जाऊन, पण मनमोकळेपणाने बोलत होता. गंभीर विषयांवरदेखील आमची विस्तृत चर्चा झाली. वार्‍याच्या विरुद्ध दिशेची निवड करून आपलं आयुष्य स्वत:च्या निवडीने, मर्जीने आखणारा, स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार, गत ४० वर्षांत नाटक, सिनेमा, मालिका, कथाकथन, कवितावाचन अशा अभिनयाच्या सर्व प्रकारात रंगमंचावर आत्मविश्‍वासाने वावरणारा हा ‘नटसम्राट’, एक उत्कृष्ट लेखक, मित्रांचा मित्र, अवघ्या महाराष्ट्राला प्रिय असणारा ‘नाना’ आणि सकाळी माझं लक्ष वेधून घेणारा ‘बुलेटराजा’ ही ‘एकच व्यक्ती’ असल्याची जाणीव मला सुखावणारी, अभिमानास्पद होती, पण विश्‍वासच बसत नव्हता, गिरीश तुस्सी ग्रेट हो यार…
रॉयल इन हिज फील्ड
माझी ही गोंधळलेली अवस्था त्याने बरोब्बर पकडली… म्हणून, अरे एनसी अजून एक सांगायचं राहिलंच… मी माझ्या मित्रांना एक मित्र म्हणूनच भेटतो, पण जेव्हा ते मला ‘सेलेब्रिटीची ट्रीटमेंट’ देतात तेव्हा मन जरा खट्टू होतं… या ४० वर्षांच्या दीर्घ प्रवासात ‘एका राजकुमाराचं आयुष्य’ झुगारून स्ट्रगलरचं आयुष्य स्वीकारलेला मी, अडीअडचणी, हालअपेष्टा, खाचखळगे, मानहानी या सगळ्या निगेटिव्हिटीची तयारी…, त्यावर मात करूनच आज या स्थानापर्यंत पोहोचलो आहे… यशस्वी आहे की नाही ते माहिती नाही, पण समाधानी निश्‍चितच आहे… या प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी ‘एक मार्गदर्शक’ होती आणि त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. आजवर अनेक मान्यवर संस्थांनी माझा व माझ्यातल्या कलाकाराचा यथोचित सन्मान केला आहे, त्यांचा मी ऋणी आहेच परंतु नासिकमध्ये ‘यू टर्न’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’ आणि ‘तो मी नव्हेच’ या नाटकांच्या माध्यमातून ‘एकाच दिवशी – तीन नाटकं- सात भूमिका’ केल्या होत्या… तेव्हा तुम्ही (तू, बाज्या (श्रीपाद देशपांडे), नंदू (नंदकिशोर कोठावदे) व शान्त्या (शंतनू कुलकर्णी), सीएल (चारुदत्त कुलकर्णी) व ओजी (डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी) या सर्वांच्या ऋणात सदैव राहण्यातच मला जास्त आनंद वाटेल…) नाशिककर मित्रांनी केलेला ‘नागरी सत्कार’ स्वीकारताना मी खरोखरच गहिवरून गेलो होतो… शब्दच सुचत नव्हते… कारण तो सन्मान माझ्या मित्रांनी केलेला होता… तो मला जास्त आनंददायी व महत्त्वाचा वाटतो…
आता मात्र त्याच्या या गहिवरल्या शब्दांनी माझ्या डोळ्यात आसवंच तरळली… आमच्या या भेटीदरम्यान त्याच्या आयुष्यातील अनेक चढउतार व चांगल्या- वाईट प्रसंगांवर मुक्तचर्चा झाली होती… त्या सगळ्याच गोष्टी इथे नमूद नसल्या तरीही जी परिस्थिती त्याने हाताळली… त्या वेळेचे प्रसंग, कथन करतानाचे शब्द, चेहरा, आर्तता, आवेश, राग, लोभ, भावभावना, कृतज्ञता याचा मी एकमेव साक्षीदार होतो… तेव्हापासून रोखलेले माझ्या मनातील भाव अश्रुरूपात बाहेर पडलेच… माझ्या परवानगीची वाटही न बघता… सॉरी गिरीश… या माझ्या उद्‌गारावर… चलता है यार… इसी का नाम जिंदगी है… असं काहीसं अर्धवट वाक्य टाकत तोही माझी नजर टाळंत… माझ्यासमोरून निघालादेखील… मुंबईला आलास तर फोन टाक… वेळात वेळ काढून भेटूच… असाच येत जा रे… मलाही ‘गिर्‍या’ म्हणणारे मित्र हवे आहेत… लेकोहो… मला सकाळचा ‘बुलेटराजा’ आता मात्र ‘रॉयल इन हिज फील्ड’ असा जाणवला, भावला… लई भारी…
– एनसी देशपांडे
९४०३४९९६५४