वेळ न पाळणे

0
185

खरंच सारे भारतीय वेळ पाळण्याच्या बाबतीत इतके उदासीन का असतात? ‘टाईम इज मोअर प्रेशस दॅन मनी,’ टाईम अमुक, टाईम इज तमुक… दिलेला शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही हे माहीत असूनही ‘इंडियन स्टँडर्ड टाईम’ म्हणून ‘वेळ एक न पाळणे’ हे सर्वांच्या वर्तनात इतकं का भिनलंय? हा गहन प्रश्‍न मला नेहमीच पडतो.

दररोज डायरी लिहिण्याची माझी सवय आहे. त्याप्रमाणे काल रात्री डायरी लिहायला घेतली अन् लक्षात आलं, ‘आजचा संपूर्ण दिवस किती खराब गेला… कारण काय तर इतरांचं वेळ न पाळणं.’ खरंच सारे भारतीय वेळ पाळण्याच्या बाबतीत इतके उदासीन का असतात? ‘टाईम इज मोअर प्रेशस दॅन मनी,’ टाईम अमुक, टाईम इज तमुक… दिलेला शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही हे माहीत असूनही ‘इंडियन स्टँडर्ड टाईम’ म्हणून ‘वेळ एक न पाळणे’ हे सर्वांच्या वर्तनात इतकं का भिनलंय? हा गहन प्रश्‍न मला नेहमीच पडतो.
दिवसाची सुरुवात आमच्याकडे प्रचंड गडबडीने, धावपळीनं होते… तशीच आजही झाली होती. एकीकडे पोळ्या लाटणं, एकीकडे ब्रेट ऑमलेट, एकीकडे दूध तापवणं, प्रत्येकाचे टिफीन भरणं… एक ना दोन हज्जार कामं. अशा वेळी मला अष्टभुजा असत्या तर कित्ती बरं झालं असतं, असा विचारही मनाला चाटून जातो. या कामांमध्ये भर म्हणून लेक बाथरूममधून ओरडली, ‘‘आई गं… प्लीज, माझ्या युनिफॉर्मला इस्त्री करून ठेव… मला खूप उशीर झालाय… होमवर्कही राहिलाय.’’
‘‘आई… माझ्या बुटांना पॉलिश…’ छोटे नबाब किंचाळले.
‘‘अगंऽऽ माझा रूमाल आणि सॉक्स कपाटातून काढून ठेव…’’ महाराजांनी वटहुकूम काढला.
अर्थात हेसुद्धा रोजचंच आहे. भाजी फोडणीला टाकून, वरणभाताचा कुकर लावून मी एकीकडे लेकीच्या युनिफॉर्मला इस्त्री करायला घेतली. इस्त्री तापेपर्यंत मुलाच्या बुटांना पॉलिश करून, यांचे सॉक्स, रूमालही काढून ठेवले. इथपर्यंत ठीक होतं… पण पोळ्या लाटता लाटता परत लेकीनं फर्मान सोडलं… ‘‘आईऽऽ माझ्या प्रोजेक्टचं सबमिशन आहे आज आणि माझे डायग्रॅम्स, बोर्डला चिकटवायचे राहिलेत. प्लीऽऽज दे नं चिकटवून… माझी स्वीट स्वीट मॉम…’’
‘‘हो का? म्हणजे स्वत: कुठलीच गोष्ट आधी वेळेवर करायची नाही. अगदी इलेव्हन्थ अवरला करायची. मग आई असतेच मदतीला आणि पोळ्या कोण करेल? तुझा काका? इतकी कशी गं बेजबाबदार तू?’’ एकीकडे तोंडाचा पट्टा चालवीत तिचा प्रोजेक्ट पूर्ण करून दिला. दरम्यान, पोळ्यांचा आकार बिघडला ते वेगळंच. शिवाय भाजी करपली. वरणही लागलं बुडाला. त्याबद्दल बोलणी खात खात, सारी घडी वळणावर आणता आणता नाकीनऊ आले माझ्या.
महाराज ऑफिसला आणि राजकन्या, राजपुत्र शाळेत गेल्यावर आरामात पेपर वाचायला घेतला, तोच लक्षात आलं, युटिलिटी, सिंकमधल्या खरकट्या भांड्यांचा ढिगारा नजरेसमोर नाचायला लागला. कामवाल्या बाईनं चार दिवस दांडी मारली होती. तिला मोबाईलवरून गाठलं. ‘‘सकाळी जाऊन संध्याकाळी येते म्हणून जी गेलीस त्याला चार दिवस झाले.’’ आवाजात ओढून ताणून मार्दव आणून विचारलं, ‘‘बाई उरूस होता न्हवं? आणि एकदा का म्हायेरी गेलं की, मामी, चुलती, आत्ती सगळ्यांकडे जावं लागतंच न? उद्या येतेच मी,’’ माझ्या उत्तराची अपेक्षा न करता फोन ठेवला तिनं हा स्थायीभावच आहे तिचा. खाड्यांसाठी दिलगिरी व्यक्त न करता, गोड शब्दात सफाई देऊन बया मोकळी झाली. वेळ आणि शब्द न पाळणं, हा तिचा नोकरीसिद्ध अधिकार होता आणि नोकरीवर असेपर्यंत ती तो सोडणार नव्हती, चोख बजावणार होती. मग भले मालकिणीचे किती का हाल होईनात. शेवटी दादापुता करून.. शेजारच्या कामवाल्या बाईकडून, दुप्पट पैसे देऊन सगळी कामं करवून घेतली, तेव्हा कुठे हुश्श झालं.
थोडं स्वस्थपणे पेपर वाचायला घेतला, तर फोनची रिंग खणखणली. माझ्या खास मैत्रिणीच्या अमेरिकेतल्या मुलाचं लग्न ठरल्याची बातमी तिनं दिली. मेंदी, हळद, संगीत, व्याहीभोजन, सीमांतपूजन, लग्न, रिसेप्शन, वरात, सत्यनारायण असे भरगच्च कार्यक्रम होते. मला खास निमंत्रण दिलं तिनं. लग्न म्हटल्यावर साड्या कुठल्या नेसायच्या याची मनोमन आखणी झाली आणि अचानक लक्षात आलं, चार भारी साड्या आणि त्यांचे ब्लाऊज टेलरकडून आणायचे आहेत. डिलीव्हरीची तारीख होऊन आठ दिवस लोटलेत. टेलर खूपच लांबचा… आमच्या जुन्या फ्लॅटजवळचा होता. दुपारच्या बसनं जावं म्हणजे गर्दी नसते म्हणून जेवणखाणं आवरून दुपारी एक वाजता निघाले. मेन बसस्टॉपवर गेलेे. मला ज्या बसनं जायचं होतं, त्याची वेळ लिहिली होती एक वाजून पंधरा मिनिटं, पावणेदोन, सव्वादोन वगैरे वगैरे. वेळेवर पोहोचलो याचा आनंद झाला. पण संपूर्ण बस स्टँडवर शुकशुकाट होता. पॅसेंजर्सही फारसे नव्हते. ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्स, लांब कुठेतरी दिसत होते. सव्वा वाजला, दीड, दोन वाजले तरी बस यायचं नाव नव्हतं. सारी सामसूमच. भक्ष्य खाऊन सुस्तावलेल्या अजगरासारख्या सार्‍या बसेस डेपोत हारीनं उभ्या होत्या. हळूहळू पॅसेंजर्स यायला सुरुवात झाली, पण बसचा पत्ताच नव्हता. माझी चुळबुळ सुरू झाली. शेवटी न राहवून मी टपरीवजा ऑफिसमध्ये गेले. तिथे बरेचसे बस ड्रायव्हर्स, कंडक्टर्स पान-तंबाखू खाण्यात, हास्यविनोदात दंग होते.
‘‘काय हो अमुक अमुक नंबरची बस केव्हा निघणार आहे?’’ मी शांतपणे विचारलं.
‘‘मॅडम… आता लंच टाईम आहे आमचा. इतक्यात कोणती बी बस निघणार न्हाई.’’ पानाची पिचकारी मारत ड्रायव्हर उत्तरला.
‘‘पण बस स्टॉपवर तर वेळा लिहिल्या आहेत. लंच टाईम वगैरे काही उल्लेख नाहीय.’’ मला रागावर कंट्रोल ठेवणं फार कठीण जात होतं.
‘‘लिहिलं म्हणून काय झालं? आम्ही काय लंच घ्यायचं न्हाई? उपाशी र्‍हायचं?’’ तो मलाच कोंडीत पकडत होता. ‘‘तसं नाही हो… पण दुसरे ड्रायव्हर्स-कंडक्टर ठेवून बसच्या वेळा पाळू शकता, पॅसेंजर्सचा खोळंबा टाळता येतो आणि…’’
‘‘ओ मॅडम… भाषणबाजी करू नका… काय कम्प्लेेंट करायची असेल ती मेन हाफिसात करा. आमचं डोकं नका पिकवू.’’ त्याचे ते बोल ऐकून माझ्या संतापाचा पारा पार वर चढला. तडक तिथून काढता पाय घेतला.
भारंभार भाड्याच्या बोलीवर ऑटोरिक्षा केली. त्या सगळ्या भानगडीत दीड तास आणि खिशाला चाट बसली ती वेगळीच. टेलरकडे गेल्यावर रिसीट दाखवली. ‘‘हॅ हॅ हॅ… बाई तयार नाहीत ब्लाऊज आणि साड्या.’’ स्वत:चे सीताफळाच्या बियांसारखे दात दाखवत तो म्हणाला. ‘‘तयार नाहीत? पण डिलिव्हरी डेट तर आठ दिवसांपूर्वीची होती. शिवाय आता गौरी-गणपती, दिवाळी किंवा लग्नाचा सीझन नाही मग?’’ मला क्रोधावर फारच संयम ठेवावा लागत होता.
‘‘हो… पण कारागीर गावी गेलाय, त्याची आजी मरण पावली म्हणून गावाकडे गेलाय, आठ दिवसांनी या… आणि फोन करून या म्हणजे हेलपाटा पडायला नको हॅ हॅ हॅ…’’ मी कपडे शिवायला टाकले की कसे, नेमके यांचे कारागीर सुट्टीवर जातात? एवढी काय दुश्मनी आहे यांची माझ्याशी? आता लग्नात जुन्याच साड्या नेसाव्या लागतील. नव्या साड्या नेसून मिरवता येणार नाही म्हणून मन खट्टू झालं. विचार कर करून मेंदूचा पार भुगा व्हायची पाळी आली होती. वेळ न पाळण्याचा या लोकांनी विडाच उचललाय का? माझ्या मनात आलं. कुठल्याही कार्यक्रमाची, पत्रिकेत छापलेली वेळ आणि प्रत्यक्षात तो सुरू होण्याची वेळ यात कमीत कमी दीड-दोन तासांचं अंतर असतंच. इलेक्ट्रिशियन, कारपेन्टर्स, गवंडी, प्लंबर्स, चांभार, लोहार यात एक्सपर्ट असतात. काम अर्धवट सोडून आठ-आठ दिवस खाडे करण्यात यांचा हात या भूतलावर कोणी धरू शकणार नाही. याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो.
विचारांच्या तंद्रीत बसनं प्रवास करून घरापर्यंत पोहोचले. आमच्या फ्लॅटच्या कॉरिडॉरमध्ये एक तरुणी उभी असलेली दिसली. मला पाहताच धावत माझ्याजवळ येऊन म्हणाली, ‘‘थँक गॉड आन्टी, बरं झालं तुम्ही आलात.’’ ‘‘सॉरी… तुम्ही माझी वाट पहात होता?’’ मी न राहवून विचारलं.
‘‘मी मिसेस… यांची मुलगी, तुमच्यासाठी कोकणचा मावा, नाचणीचे पापड, कुळथाचं पीठ आणि हापूस आंबे घेऊन आलेय… तुम्हीच ऑर्डर दिली होती नं?’’
आता शरमण्याची पाळी माझ्यावर होती. कारण मी स्वत:च वेळ पाळली नव्हती. ‘‘तुमचा फोन अनरिचेबल येत होता,’’ ती म्हणाली. ‘‘आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी…’’ मी मनातल्या मनात म्हटलं. ऍट लीस्ट मी रिग्रीट्‌स तरी दाखवले.
सो टेक इट इझी… वेळेचं वेळापत्रक कधीच वेळेवर चालणार नाही. खरं नं? घड्याळाचा काटा भलत्याच मार्गातून जातो.
– प्रीती वडनेरकर/९८२३९९४७९२