घराच्या घरपणाची गोष्ट

0
172

काही घरं अशी असतात की, तिथे नवखेपणा कधी वाटतच नाही. तिथले दरवाजे, खिडक्या, पडदे, फर्निचर अख्खी वास्तूच हसते, बोलते, अतिथींचं स्वागत करते. घरातील सारी माणसे आनंदी, प्रसन्न मनाने वावरत असतात. अशा घरातील खेळीमेळीचं वातावरण सार्‍यांना आपलंस करून घेतं. घरात चालणार्‍या हास्य-विनोदात, गप्पा गोष्टीत आनंदाचं कारंज थुईथुई नाचत असतं. बारा महिने आनंदाचा महोत्सव साजरा होतो.

परवा संध्याकाळी मैत्रिणीसोबत तिच्या दूरच्या एका जावेकडे जाण्याचा योग आला. आम्ही दोघी रोजच फिरायला म्हणून संध्याकाळी बाहेर पडतो. चांगली तासभराची चक्कर मारून परत येतो. त्यातच एखादीचं छोटं मोठं काम असेल तर तेही उरकून घेतो. तर काय….? परवा मैत्रिणीला काही महत्त्वाचा निरोप जावेला द्यायचा होता. आम्ही दोघी फिरत फिरत त्यांच्या कडे गेलो. मात्र जाताना वाटेतच मैत्रिणीने मला सांगून ठेवलं होतं की, बघ हं…फार मनावर नको घेऊस, पण जाऊबाईंचं काम जरा मूडी तर आहेच पण जरा वेगळंच वाटतं त्यांच्या घरात गेल्यावर आपण लौकरच सटकू तिथून.
माझ्या पोटात तर गोळाच उठला. त्या न बघितलेल्या जावेनी आणि वेगळं वाटणाार्‍या घरानी आपोआपच मला जरा अंतरावरच ठेवलं.
बोलत बोलत आम्ही जावेच्या घरी पोहचलो. ऐन संध्याकाळी पण घरातल्या अर्ध्या खोल्यांमधले दिवे बंदच होते. दरवाजा सुध्दा बंद होता. बेल वाजवल्यावर मैत्रिणीच्या जावेनीच दार उघडलं. मात्र चेहर्‍यावर कोणतेही भाव म्हणून नाहीत. या म्हणून हसून स्वागत तर दूरच….पण चेहर्‍यावर साधे ओळखीचे भाव सुद्धा नव्हते. उलट अतिशय मख्ख चेहर्‍याने दार उघडून त्या पाठमोर्‍या झाल्या. आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि स्वतः होऊनच सोफ्यावर बसून घेतलं. मैत्रिणीने माझी ओळख करून दिल्यावर शिष्टाचार म्हणून सुद्धा त्यांनी हसून नमस्कार नाही केला. मला कसंतरीच व्हायला लागलं. एकेक करत घरातील सर्व व्यक्ती येऊन आम्हांला बघून गेल्या. पण सगळे एकजात मख्ख चेहरे ! मला तर आतल्याआत घुसमटल्या सारखंच व्हायला लागलं. एकतर स्वतःची काही ओळख नसताना, मी मैत्रिणीसोबत म्हणून तिथे गेले होते आणि दुसरं म्हणजे काही कारण नसताना, कोणतंही वैर नसताना, एखाद्या व्यक्तीने आपल्याशी असं अपमानास्पद वागावं हे मनाला अजिबात न पटणारं होतं. शेवटी मैत्रिणीने द्यायचा तो निरोप जावेला दिला आणि घाईनेच आम्ही तेथून बाहेर पडलो अन् एकदाचा मोकळा श्‍वास भरभरून घेतला. साधं पाणी सुद्धा कोणी विचारलं नाही आम्हाला तिथे. घरी येईपर्यंत मग आम्ही याच विषयावर कितीतरी बोलत राहिलो. का बरं काही घरं, वास्तू, तेथील लोक असे असतात ? अनेक घरात, वास्तू मध्ये जातानाच काहीतरी वेगळं जाणवतं. जाऊच नये त्या घरात असं मनातून वाटत राहतं. कोणतंही जिवंतपणाचं लक्षण दिसत नाही अशा ठिकाणी. काहीतरी उदास, भकास, मनाला नैराश्य आणणारं असं काहीतरी शब्दात न सांगता येणारं ! अशा घरात कुणाची ये-जा , कुणाचा वावर, एखादा समारंभ, हास्यविनोद असं कधीही घडतच नसावं, असं वाटत राहतं. तसल्या घरात राहणारी माणसंही तशीच भावनांशी काही संबंध नसणारीच जशी घरातल्या सोफासेट, टीव्ही, फ्रीज, ओव्हन, मिक्सर, कूलर्स आणि इतर फर्निचर सारखी वस्तुरूपात असणारी अक्षरशः भावना रहित असावी तशी. कधी खळाळून हसणार नाहीत, भरभरून बोलणार नाहीत, कोणाकडे जाणार नाहीत, कोणाला घरी बोलावणार नाहीत, कधी कुणाच्या सुखदुःखात सामील होणार नाहीत, कुणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत, कुणाला आसपास फिरकू देणार नाहीत, आयुष्यात हौसमौज करणार नाहीत आणि कुणाला आनंद तर देणार नाहीतच पण स्वतः सुद्धा आनंद उपभोगणार नाहीत. उलट काही घरं अशी असतात की, तिथे नवखेपणा कधी वाटतच नाही. तिथले दरवाजे, खिडक्या, पडदे, फर्निचर अख्खी वास्तूच हसते, बोलते, अतिथींचं स्वागत करते. घरातील सारी माणसे आनंदी, प्रसन्न मनाने वावरत असतात. अशा घरातील खेळीमेळीचं वातावरण सार्‍यांना आपलंस करून घेतं. घरात चालणार्‌या हास्य विनोदात, गप्पा गोष्टीत आनंदाचं कारंज थुईथुई नाचत असतं. बारा महिने आनंदाचा महोत्सव साजरा होतो.
अंगणात वसंत फुललेला असतो. पौर्णिमेला आकाशातील चंद्राची शीतलता अशा वास्तूंना आपल्या सहस्त्र रेशमी किरणांनी लपेटून घेते. अशा लोकांच्या सहवासात आपणही प्रसन्नचित्त होऊन जातो.
परवाचा मैत्रिणीच्या जावेकडचा अनुभव उगाचच निराश करणारा आणि एक दिवस संध्याकाळी, घरी काम करणार्‍या, रखमीच्या नातीला बघायला म्हणून मी तिच्या घरी गेले होते. रखमी स्वतः मला घ्यायला आली होती . मी सोबत सगळा अहेर, बाळंतविडा असं साग्रसंगीत घेतलं. त्यांच्या घरी पोहोचताच, अंगणातील घंगाळ्यातील पाणी घेऊन तिने माझ्या पायावर घातले. लगबगीने स्वतः आत जाऊन, या आता ताई आत असं म्हणून तोंडभरून हसत स्वागत केलं. तिची सून उठून समोर आली. आतून मुलगा आला. दोघांनी जोडीने वाकून मला नमस्कार केला. चार सहा वाक्य बोलून मुलगा बाहेर गेला. रखमीने माझ्या हातात पाण्याचा पेला ठेऊन पटकन कूलर सुरू केला. सुनेनी तान्ह्या बाळाला माझ्या हातात दिलं.
रखमीची नात काळी सावळी पण गुटगुटीत होती. बसा ताई तुम्मी वाईच बोलत, मी आत्ता येतो म्हणून रखमी आत गेली. देवाजवळ दिवा आणि उदबत्ती लावली, तुळशीला दिवा ठेवला आणि तिने पटकन सांजा भाजायला घेतला. उदबत्तीच्या प्रसन्न सुवासात, कढीपत्ता, कांदा, मिरची, रव्याचा खरपूस वास घरभर दरवळला. तेवढा वेळ सूनबाई माझ्याशी अनेक विषयांवर बोलत बसली. रखमीने मला प्लेटभर सांजा आणि भला मोठा डिंकाचा लाडू आग्रहानी खायला लावला. माझ्यासोबत स्वतःही प्लेट घेतली. लगेच सुनेसाठी स्वयंपाक करून तिचं पान वाढून स्वतः नातीला घेऊन बसली. घरी कामाला येणार्‍या रखमीत आणि या रखमीत कित्ती फरक वाटला मला! मी साग्रसंगीत अहेर केला, तेवढ्यात रखमीने पानदानातून साहित्य जमवत मला बाळंतिणीचा विडा करून दिला. रखमीचं सारं घर आनंदी, हसरं, समाधानी होतं. सगळ्या घरदारावर एक तृप्तीची दाट साय पसरली होती. विडा चघळत मी घरी निघाले, रखमी फाटकापर्यंत आली. रखमीच्या घरातल्या तृप्तीचा, समाधानाचा परिणाम माझ्यावरही नकळत झाला होता. अजाणता माझ्या चेहर्‍यावर हसू पसरलं अन् मी विचारच करत राहिले, आयुष्यात एक घर असावं म्हणून मनुष्य जीवनभर मरमर करतो आणि मरताना जिवाला लागते, तिला घरघर म्हणतो, किती अजब आहे नं ? एरवी घरं तर सरसकट सगळी दगड विटा सिमेंटचीच बनली असतात. पण घरातील इतर व्यक्तींच्या वागण्या बोलण्याचे, स्वभावांचे , हसण्याचे आणि सकारात्मक विचारांचे सारे भाव त्या वास्तूतून प्रतिध्वनित होतात हे मात्र निश्‍चित! वास्तू बोलत असते हे खरंच आहे. पण वास्तू काय बोलते, हे त्या घरात वास्तव्य करणार्‍या व्यक्तींच्या आचार विचारांवर वागण्या बोलण्यावर अवलंबून असतं. नाहीतर भरपूर पैसा, दारात गाड्या, स्वतःच्या मालकीचा मोठा बंगला, परदेश वार्‍या , हॉटेलिंग, बड्या मंडळीत ऊठ-बस असं सारं असूनही, त्या वास्तूत सुख, शांती, समाधान का नांदत नाही ? का मन घुसमटून जातं काही घरांमध्ये गेल्यावर? का त्या वास्तूना जिवंतपणाचा स्पर्श जाणवत नाही? का कायम नैराश्यानी घेरल्यागत काही घरांची आणि तेथील लोकांची अवस्था असते? का खळखळून न हसता येण्याचा शाप असतो त्यांना ? तेच आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना, जेमतेम रोजची गरज भागेल इतपतच परिस्थिती असताना, मालकी हक्काची जागा, गाड्या, ऐशोआरामाशी दुरूनही संबंध नसलेले काही लोक असतात जे अतिशय सुखा समाधानात, आनंदात जीवन जगत असतात. केवळ स्वतःच जगतात असं नाही तर इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण करतात. याच लोकांची छोटी छोटी घरं तृप्तीने निथळून निघतात आणि अशा घरातील वास्तुदेवता काय तथास्तु म्हणत त्या घरावर आनंदाची बरसात करतात अशी घरं आनंदाचा प्रत्यय आणून देत सार्‍या अतिथींना आपल्या आनंदोत्सवात सामावून घेतात. शेवटी विमल लिमयेंच्या ओळीच मनात ’घर ’ करून वास्तव्य करतात….घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती ……
तिथे असावा प्रेम जिव्हाळा , नकोत नुसती नाती …..
शेवटी घराचं घरपण हे त्या घरात राहणार्‍या लोकांनीच जपायचं असतं हो नं ?
– मीनाक्षी मोहरील/९९२३०२०३३४