‘सरफरोशी की तमन्ना’ बाळगणारे सिल्ली गाव

0
100

छोट्या गावातील २६ तरुण सैन्यात
विजय निचकवडे
भंडारा, २० एप्रिल
सलमान खानच्या कुठल्याशा चित्रपटात एक संवाद होता, अर्थात उत्तर प्रदेशच्या संदर्भात होता, ‘हमारे प्रदेसमे घरमे तीन लडके हो तो एक डाकू बनता है, दुसरा राजनेता और तिसरा पुलीसमे जाता है’ भंडारा जिल्ह्यातील सिल्ली (‘सिली’ नव्हे; कारण हे गाव शहाण्या तरुणांचे आहे) या गावासंदर्भात हाच डायलॉग, ‘हमार गांव मे घरमे जितने लडके हो, सबको सैनिकही बनना है…’ असा घ्यावा लागेल. दोन-अडीचशे कुटुंबाच्या या गावातील २६ तरुण सैन्यात आहेत. उरलेले संधीच्या शोधात कसरती करतानाच दिसतात.
‘तरुणांनी सैन्यात दाखल झाले पाहिजे. देशासाठी बलिदानही दिलेच पाहिजे, मात्र ते शेजारच्या घरी. आमच्या कुलदीपकाने डॉक्टर नाहीतर इंजिनीयर होऊन वार्षिक १२-१५ लाखाच्या पॅकेजची नोकरीच केली पाहिजे’ अशी भंपक मानसिकता असलेल्या काळात शेतकर्‍यांची ही मुलं ‘जय जवान, जय किसान’ असा वांझोटा नारा देण्याच्या काळात लष्कर भरतीच्या इर्षेने झपाटलेली आहेत. कर्जापोटी आत्महत्या करण्यापेक्षा राष्ट्रऋणातून उतरायी होण्यासाठी देशासाठी बलिदान करण्याची मनीषा बाळगणार्‍या या तरुणांना सलामच केला पाहिजे.
सकाळ, संध्याकाळी या गावात तालिम सुरू असते. काहींनी पोलिस दलाचा मार्ग स्वीकारला तर बरेच जण सैन्यातून निवृत्त होऊन उत्साही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
भंडारा जिल्ह्यातील सिल्ली या अडीचेक हजार लोकवस्तीच्या गावात प्रत्येक दहा घरांत एकजण सैन्यात आहे. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केवळ जिद्द आणि गावातीलच निवृत्त सैनिकांनी दिलेल्या प्रशिक्षणाच्या भरोशावर तरुणाई सैन्यात भरती होण्यासाठी तयार होत असते. निव्वळ नोकरी, पैसा हाच त्यामागचा उद्देश नाही, हे स्पष्ट आहे.
बौद्धिक शहारे आणणारे शहरी ‘घट्ट वरण-भात’ छापाचे तरुण आयआयटी, जेईई, वैद्यकीय प्रवेश परीक्षा यातच गुंतले असताना गावखेड्यातील तरुणांत देशाची गरज ओळखून सैन्यात जाण्याची अहमहमिका आहे. सिल्लीच्या निमित्ताने ही गोष्ट स्पष्ट होते. आज या गावातील तब्बल २६ तरुण भारतीय सैन्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. एवढेच नाही तर अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही गावातील या तरुणांचा वाटा महत्त्वाचा आहे. श्रीनगर, चीन, नेपाळ यासारख्या सीमारेषेवर तैनात असलेले या गावातील तरुण नक्कीच गावाचा गौरव वाढवित आहेत.
पोलिस दलात असलेले मुरलीधर माकडे यांच्या प्रोत्साहनातून तरुणांना दिशा मिळाली. गावात असलेल्या पटाच्या दाणीवर सैन्य भरतीसाठी आवश्यक असलेल्या कसरती सुरू झाल्या. आवश्यक असलेले सामानही माकडे यांनी उपलब्ध करून दिले. याचा सकारात्मक परिणाम म्हणून हळूहळू गावातील तरुण भारतीय सैन्य सेवेत दाखल होऊ लागले. अनेक वर्षापासून हे चक्र सुरू आहे. काही सेवानिवृत्तही झाले. जे सेवेत गेले त्यांनी इतर तरुण घडावेत म्हणून आपल्या परीने शक्य तेवढी मदत केली. आज सिल्ली येथील पटाचे मैदान प्रशिक्षण केंद्रापेक्षा कमी नाही. मुलांप्रमाणे मुलीही यात अग्रेसर आहेत. गावात सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारला तर व्यायाम आणि कसरतीचे चित्र पहायला मिळते.
अशा वीरपुत्रांचा आणि त्यांच्या पाल्यांचा काही दिवसांपूर्वी गावातच कौतुक सोहळा झाला. गावात सुटीवर आलेल्या सैनिकांचा व कर्तव्य बजावित असलेल्या सैनिकांच्या मातापित्यांचा सन्मान करून गावाने जणूकाही त्यांचे ॠण फेडले.
राष्ट्रीय सणांना देशप्रेमाचे उद्दाम प्रदर्शन करणार्‍या बाईकबाजीराव तरुण पिढीसाठी सिल्ली गावातील तरुण एक आदर्श ठरू पाहत आहेत. अशा तरुणांच्या पाठिशी राहून त्यांना थोडीफार मदत झाल्यास देशसेवेच्या त्यांच्या या कार्यात इतरांचाही हातभार लागू शकेल…